(भाग दुसरा) / डॉ. आशीष थत्ते
‘गेम थेअरी’मध्ये एक फार सुंदर प्रमेय आहे आणि त्याचा प्रत्यक्षात वापरदेखील केला जातो. त्या प्रमेयाला कैद्यांचा पेचप्रसंग (प्रिझनर्स डायलेमा) म्हणतात. म्हणजेच दोन चोरांना पकडल्यानंतर त्यांची चौकशी करताना वेगळे बसवून चौकशी करतात आणि त्यात दोघा कैद्यांना माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली जाते. म्हणजे जर खरेच गुन्हा घडला असेल तर खोटे बोलणाऱ्याला मोठी शिक्षा होऊ शकते आणि दोघे ही खरे बोलले तर दोघांना एकसमान शिक्षा होऊ शकते. खरे बोलावे की खोटे बोलावे हा पकडलेल्या कैद्यांसमोर पेचप्रसंग असतो. कारण एका कैद्याने केलेल्या कृतीइतकीच दुसऱ्याची कृती त्याची शिक्षा ठरवते. मात्र अखेर खरे बोलणेच फायद्याचे असते. पण जर नियमाला फाटा दिला तर कथा रंजक होऊ शकते. जसे की आपण अजय देवगणचा ”दृश्यम १” सिनेमा बघितला असेलच, ज्यात सर्व खोटे बोलतात. आता बघू दुसऱ्या भागात तरी खरे बोलतात का?
‘गेम थेअरी’चे अजून पण काही उपप्रकार आहेत आणि खूप वेळा ते आपण अजाणतेपणे वापरतो. आपण आयुष्यात बऱ्याच शैक्षणिक परीक्षांना सामोरे जातो, त्यात काही परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तराला उणे गुण असतात. तेव्हादेखील आपल्याला माहीत नसले तरी उत्तर लिहितो. कारण कदाचित उत्तर बरोबर आले तर अधिक गुण मिळू शकतात. तुम्ही कुठलाही शहरात किंवा गावात जा, त्याच्या मध्यभागी दागिन्यांची किंवा भरजरी, महागड्या कपड्यांची दुकाने असतात ती एकाच रस्त्यावर किंवा एकाच ठिकाणी असतात. याला ‘गेम थेअरी’च कारणीभूत असते. अगदी रस्त्यावरच्या खरेदीची दुकाने किंवा खाऊगल्ल्यादेखील एकवटलेल्या असतात. गिऱ्हाईक जेव्हा वस्तू विकत घ्यायला जातो तेव्हा फार जास्त ठिकाणी फिरू शकत नाही म्हणून सर्व दुकाने त्यांच्या नफा (पे ऑफ) वाढवण्याच्या दृष्टीने एकत्र येतात. जेव्हा आपली कृती आणि दुसऱ्याची कृती आपला नफा बदलू शकते तेव्हा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपसूकच आपण ‘गेम थेअरी’ वापरतो.
राजकारण किंवा निवडणूक एक खेळच असतो. सरकार कर वसूल करताना किंवा व्यापारी वर्ग कर बचत करताना याच ‘गेम थेअरी’चा वापर करतात. जगातील तेल बनवणाऱ्या आखातातील कंपन्यांना जेव्हा स्पर्धा निर्माण झाली तेव्हा तेसुद्धा ‘गेम थेअरी’चा वापर करून किंमत ठरवू लागले आहेत. १९९५ पासून जेव्हा अल्कोहोल विकणाऱ्या कंपन्यांवर जाहिरात करण्याची बंदी घातली, तेव्हा एकापाठोपाठ सर्वच कंपन्यांनी प्रच्छन्न किंवा लपूनछपून जाहिरात सुरू केली. याचे कारण म्हणजे एका कंपनीने जाहिरात केल्याने दुसरीला नक्की तोटा होणार होता. हाही एक ‘गेम थेअरी’चा उपप्रकार आहे.
मोठ्या दुकानांमध्ये वस्तूंवर कायम काहीतरी सवलत चालू असते. यामुळे आपल्याला कुठून काय वस्तू घायची हे ठरवायचे असते. म्हणजे या खेळामध्ये एका खेळाडूने/ व्यापाऱ्याने आपला नफा ठरवला असतो. पण हेच जर रस्त्यावर भाजीवाल्याकडून खरेदी करायची असेल तर गृहिणी घासाघीस करतात आणि विशेष म्हणजे सौदा फिस्कटला तरी ”बेहेनजी ३० रुपयेमे लेके जाओ” म्हटल्यावर जेव्हा दोन्ही खेळाडूंना नफ्याची (पे ऑफ) स्थिती निर्माण होतो, तेव्हा तो सौदा निश्चित होतो. घर खरेदी-विक्री करताना, नोकरीमध्ये पगाराची बोलणी करताना, सट्टेबाजीत, लिलावात ‘गेम थेअरी’चा वापर केल्यास फायदा होऊ शकतो.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत
ashishpthatte@gmail.com
ट्विटर @AshishThatte