लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये सुरू असलेल्या विक्रीचा मारा आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने ‘सेन्सेक्स’मध्ये गुरुवारी ३५९ अंशांची घसरण झाली, तर निफ्टी २१,४०० अंशांच्या खाली स्थिरावला.
बुधवारी ६९० अंशांनी उसळलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने गुरुवारी सत्रारंभापासून नकारात्मक कल दर्शवला. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स ३५९.६४ अंशांनी घरंगळून ७०,७००.६७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ७४१.७२ अंश गमावत ७०,३१९.०४ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०१.३५ अंशांची घसरण झाली आणि तो २१,३५२.६० पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>>Money Mantra : पोस्ट ऑफिसची सर्वाधिक व्याज देणारी जबरदस्त योजना, तुम्हाला दरमहा २००५० रुपये कमवता येणार
अमेरिकी अर्थव्यवस्थेची समाधानकारक वाटचाल सुरू असल्याच्या संकेतांमुळे, तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपात विलंबाने सुरू होईल, अशी शक्यता बळावली आहे. जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये त्यामुळे निराशेचे वातावरण आहे. देशांतर्गत भांडवली बाजारावरदेखील त्याचे गुरुवारी प्रतिकूल परिणाम उमटले. दुसरीकडे अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर वाढल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारात समभाग विक्रीचा मारा कायम ठेवला आहे. आखातातील भू-राजकीय तणाव, देशांतर्गत पातळीवर वाढलेले समभागांचे मूल्यांकन आणि वायदे बाजारातील करारांच्या सौदापूर्तीमुळे बाजार सकारात्मक पातळीवर टिकून राहण्यास अयशस्वी ठरला, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>Money Mantra : सामान्य करदात्याला बजेटकडून किती अपेक्षा? अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून काय निघणार?
सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, नेस्ले, टाटा स्टील आणि मारुती या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली. तसेच सरलेल्या तिसऱ्या तिमाहीतील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यात अयशस्वी ठरल्याने या क्षेत्रातील समभाग घसरले. विप्रोचा समभाग १.६८ टक्क्यांनी, एचसीएल टेक १.५४ टक्क्यांनी, टीसीएस १.०३ टक्क्यांनी आणि इन्फोसिस ०.२२ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात ६,९३४.९३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्स ७०,७००.६७ -३५९.६४
निफ्टी २१,३५२.६० -१०१.३५
डॉलर ८३.११ -१
तेल ८०.९६ १.०२