वसंत माधव कुळकर्णी
जेव्हा अर्थव्यवस्थेत व्याजदर शिखरावर असतात, तेव्हा गुंतवणूकदारांना दहा वर्षांच्या किंवा अधिक कालावधीसाठी निश्चित उत्पन्न पर्यायांमध्ये (बॉण्ड्स) गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. भारतीय गुंतवणूकदारांसाठी, अशा दहा वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करण्यास मर्यादित गुंतवणूक साधने उपलब्ध आहेत. सामान्य गुंतवणूकदार दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसारखे लोकप्रिय पर्याय निवडतात. या पर्यायात तुमचे पैसे १५ वर्षांसाठी गुंतवावे लागतात. तुमच्या अडचणीच्या वेळी काढता येत नाहीत. ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ मंचावर सरकारी रोखे (जी-सेक) खरेदी केल्यास, तुम्हाला फक्त नियमित उत्पन्न मिळते. व्याजाच्या रूपाने हे उत्पन्न मिळते. हे व्याज तुमच्या उत्पन्नात मिळविले जाते आणि तुमच्या प्राप्तिकराच्या कर कक्षेनुसार व्याजावर कर आकारणी होते. तुम्ही मुदतपूर्ती पूर्वी या रोख्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा परतावा कमी होतो. निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्यसारखा दीर्घ-कालावधीचे डेट फंड दहा वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीतील उद्दिष्टांसाठी गुंतवणूकदारांना, तीन वर्षांनंतर रोकड सुलभता आणि गुंतवणुकीवर कर कार्यक्षम पर्याय उपलब्ध करून देणारा हा फंड आहे. व्याजावर दरवर्षी कर द्यावा लागतो तर या फंडाच्या युनिट्सची विक्री केल्यावर कर लागू होतो. गुंतवणूक केल्यापासून पाचव्या वर्षांत युनिट्सची विक्री केल्यास भांडवली लाभ त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न समजून त्यावर कर भरावा लागेल.
निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य हा गुंतवणुकीस कायम खुला असलेला (ओपन-एंडेड) फंड आहे. हा फंड फक्त दीर्घ मुदतीच्या (२० वर्षं ते २५ वर्षांची उर्वरित मुदत असलेल्या) केंद्र सरकारच्या रोख्यांत गुंतवणूक करतो. या फंडाचे ‘मॅकॉले ड्युरेशन’ नेहमीच सात वर्षे आणि त्याहून अधिक असते. फंड सक्रियपणे कालावधी व्यवस्थापित करतो (ॲक्टिव्ह ड्युरेशन मॅनेजमेंट) या फंडाच्या खर्चाचे प्रमाण स्पर्धक सक्रिय व्यवस्थापित गिल्ट फंडांपेक्षा कमी असून रेग्युरल प्लानचा टीईआर (एकूण खर्चाचे प्रमाण) ०.५३ टक्के तर डायरेक्ट प्लानचा टीईआर ०.१६ टक्के आहे. दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांचा पोर्टफोलिओ असूनही, रोजच्या ‘एनएव्ही’नुसार फंडाच्या युनिट्सची खरेदी विक्री होते. या फंडातून पहिल्या तीन वर्षात रक्कम काढल्यास १ टक्का निर्गमन शुल्क लागू होते. पहिल्या तीन वर्षांत, गुंतवणूकदारांना त्यांच्या २० टक्के युनिट्सची विक्री कोणत्याही अधिभाराशिवाय करता येते. तीन वर्षांच्या मुदतीनंतर सर्व युनिट्सची विक्री कोणत्याही अधिभाराविना करता येते.
दीर्घ मुदतीच्या रोख्यांत खूप अस्थिरता असते. युनिट्सची अल्प-मुदतीत खरेदी विक्रीला पायबंद घालण्यासाठी हा निर्गमन अधिभार लागू केलेला असू शकते. कारण दीर्घ मुदतीचे रोखे अतिशय रोकडसुलभ असल्याने मोठ्या गुंतवणूकदारांच्या विक्रीला पायबंद घालणे आवश्यक आहे.
भारतातील मागील व्याजदर आवर्तनात १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचे कमाल उत्पन्न ८.००-८.५० टक्क्यांपर्यंत गेले होते. सध्याच्या व्याजदर आवर्तनात केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न किमान २७ जुलै २०२० रोजी ५.५४ टक्के, तर कमाल २५ ऑक्टोबर २०२२ रोजी ७.७८ टक्के इतके होते. सध्याचे उत्पन्न सुमारे ७.१६ टक्के असून सध्याचे उत्पन्न व्याजदर शिखराच्या जवळ आहे. साधारणपणे, व्याजदर आवर्तनाच्या शिखराजवळ दीर्घ मुदतीची गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होतो. कारण भविष्यात व्याजदर कमी झाल्यास रोख्यांच्या किमती वाढून भांडवली नफा होण्याची शक्यता असते. व्याजदर आवर्तनाचे शिखर निश्चित करणे आणि त्यावेळी गुंतवणूक करणे खूप कठीण असते. परंतु सध्याचे दहा वर्षे मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न पाहता पुढील वर्षभरात दहा वर्षे मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न ७.४५-७.५० टक्क्यांदरम्यान राहील. म्हणून दीर्घ-मुदतीच्या कर्जरोख्यांत एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली संधी आहे. सध्याचे दहा वर्षे मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न लक्षात घेता जे गुंतवणूकदार एकरकमी मोठी रक्कम गुंतवू शकत नाहीत त्यांच्यासाठी पाच वर्षाची ‘एसआयपी’ करण्याची चांगली वेळ आहे.
दहा वर्षे मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न सप्टेंबर २०१८ मधील ८ टक्क्यांवरून जुलै २०२० मध्ये ५.५० टक्क्यांपर्यंत घसरल्यानंतर आता ते वाढून पुन्हा ७.३० टक्क्यांवर आले आहे. यामुळे निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्यने गेल्या एका वर्षात ४.३ टक्के आणि तीन वर्षांत ६ टक्के परतावा दिला आहे. फंडातील गुंतवणूकदारांनाही या व्याजदर वाढीचा मोठा फटका बसला आहे. फंडाच्या स्थापनेपासूनची एप्रिल-जून २०२२ ही सर्वात वाईट तिमाही होती. या तिमाहीत फंडाच्या ‘एनएव्ही’त ४.४ टक्के तर सर्वात वाईट वर्षात (जून २०२१ ते जून २०२२) २.९ टक्क्यांची घसरण झाली. (कारण व्याजदर वाढल्यावर रोख्यांच्या किमतीत घसरण होते) म्हणून या फंडाची शिफारस आठ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.
हा फंड स्थिर उत्पन्न गुंतवणूक करणारा असला तरी हा खूप अस्थिर फंड आहे. असे म्हणतात की ‘क्रेडिट रिस्क इज पर्मनन्ट, बट ड्युरेशन रिस्क इज टेम्पररी’ त्यामुळे ही अस्थिरता व्याजदर वाढीच्या वेळी असते. हा फंड दीर्घ मुदतीच्या रोख्यांत व्याजदर वाढण्याचा धोका पत्करून गुंतवणूक करतो म्हणून याचा परतावा अन्य रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांपेक्षा अधिक आहे.
या फंडाची सुरुवात ५ जुलै २०१८ रोजी झाली. प्रशांत पिंपळे या फंडाचे स्थापनेवेळी निधी व्यवस्थापक होते. ३१ मार्च २०२१ पासून विद्यमान निधी व्यवस्थापक म्हणून प्रणय सिन्हा यांची नेमणूक झाली. डेट फंडांच्या ‘लाँग ड्युरेशन’ फंड गटात एक वर्षे मुदतीत ८.०८ टक्के आणि पाच वर्षे मुदतीत ८.९५ टक्के परतावा देणारा हा फंड दोन्ही कालावधीत अव्वल स्थानी आहे. दोन्ही कालावधीत आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किमान १ टक्का अधिक परतावा या फंडाने दिला आहे. मालमत्ता क्रमवारीत हा फंड अव्वल स्थान अबाधित राखून आहे. हा फंड ६,२८० कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. या फंड गटात सर्वात कमी खर्चाचे प्रमाण असणारा आणि सर्वात अधिक परतावा देणारा हा फंड आहे. म्हणूनच या फंडाला ‘केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू’ असेच संबोधावेसे वाटते.