
नवीन कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत शेअर बाजार निर्देशांकाप्रमाणेच ‘माझा पोर्टफोलियो”ची कामगिरीदेखील समाधानकारक नाही. ११,२३८ रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य ६९० रुपयांच्या तोट्यासह १०,५४८ रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत २५ टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मात्र केवळ ५.१० टक्क्यांचा तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने फक्त ५.३४ टक्के परतावा दिला आहे. नवी आर्थिक वर्ष २०२५-२६ कसे असेल? याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया, अमेरिकेची व्यापार धोरणे आणि निर्बंध, महागाई, जागतिक बाजारपेठेतील अस्थैर्य आणि अर्थात परदेशी गुंतवणूकदारांचा समभाग विक्रीचा वाढता जोर अशी अनेक कारणे या निराशाजनक वातावरणाला देता येतील.
अर्थात शेअर बाजारातील किंवा म्युच्युअल फंडातील केवळ दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरत असते, हे आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. या सदरातील शेअर हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजार निर्देशांक रोज नवीन धक्के देत असतानाच गुंतवणूकदारांनी सतर्क राहून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल अभ्यासून बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. तसेच वेळोवेळी नुकसान प्रतिबंध अर्थात ‘स्टॉप लॉस’ पद्धत अवलंबून तोटा मर्यादित राखणे अपेक्षित आहे.
Stocksandwealth@gmail.com
– माझा पोर्टफोलिओ अंतर्गत सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
– माझा पोर्टफोलियोअंतर्गत विवेचन केलेले शेअर हा आर्थिक सल्ला अथवा शिफारस नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या मदतीने करावी.