गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!
प्रश्न (रमेश साखरकर): ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए ) म्हणजे काय?
आपल्या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज ज्या एकाच खात्यात इलेक्ट्रोनिक स्वरुपात रीपॉझिटरीमध्ये ठेवता येतात अशा खात्याला ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए ) असे म्हणतात.
हेही वाचा… Money Mantra : बाजाराकडून निकालाचे स्वागत; बाजार पुन्हा तेजीकडे!
या खात्यात ज्याप्रमाणे आपण आपले विविध कंपन्याचे शेअर्स आपल्या डी-मॅट अकाऊंटमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ठेवतो त्याप्रमाणे आपल्या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज (लाईफ इंश्युरंस, मेडिक्लेम, व्हेईकल इंश्युरंस ई.) एकत्रित ठेवता येतात. यातील कोणतीही पॉलिसी आपण हवी तेव्हा वापरू शकतो.
प्रश्न (सौरभ करंदीकर) : इन्शुरन्स रीपॉझिटरी म्हणजे काय ?
ज्याप्रमाणे एनएसडीएल किंवा सीडीएसएल या कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपन्या आहेत व ज्या सेबीच्या मार्गदर्शनानुसार भांडवल बाजारात काम करतात त्याचप्रमाणे आयआरडीएच्या मार्गदर्शनानुसार विमा क्षेत्रात रीपॉझिटरी काम करत असतात व याही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपन्या आहेत. सध्या खालील रीपॉझिटरीज कार्यरत आहेत.
- एनएसडीएल नॅशनल इन्शुरन्स रीपॉझिटरी(एनएसडीएल पुरस्कृत)
- सीडीएसएल इन्शुरन्स रीपॉझिटरी लिमिटेड (सीडीएसएल पुरस्कृत)
- कार्वी इन्शुरन्स रीपॉझिटरी लिमिटेड
- सीएएमएस इन्शुरन्स रीपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड
प्रश्न (प्रथमेश डबीर): ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए ) काय फायदे आहेत?
विविध इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स संभाळून ठेवण्याची गरज नाही , तसेच एखादी पॉलिसी हरविण्याची किंवा फाटण्याची भीती नाही. गरजेनुसार हवी ती पॉलिसी सहजगत्या उपलब्ध होते व तिचा वापर करता येतो. आपला पत्ता अथवा नॉमिनी यात काही बदल करावयाचा झाल्यास एकाच ठिकाणी म्हणजे ई-इन्शुरन्स अकाऊंटमध्ये असा बदल करू घेतल्याने हा बदल अपोआप खात्यात असलेल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये केला जातो. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला स्वतंत्रपणे कळवावे लागत नाही. खाते विनामूल्य उघडता येते.
प्रश्न (शैलजा): ई-इन्शुरन्स अकाऊंट कसे उघडता येते?
ई-इन्शुरन्स अकाऊंट ऑन लाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उघडता येते. यासाठी वरीलपैकी कोणत्याही रीपॉझिटरीच्या साईट फॉर्म उपलब्ध असतो आपण तो ऑन लाईन भरून सोबत केवायसी साठीच्या पूर्तेतेची कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करून खाते उघडता येते किंवा फॉर्म डाउनलोड करून तो पूर्ण भरून सोबत केवायसीसाठीच्या पूर्तेतेची कागदपत्रे जोडून आपल्या कोणत्याही एका इन्शुरन्स कंपनीकडे किंवा वरील पैकी ज्या रीपॉझिटरीकडे आपल्याला खाते उघडावयाचे आहे त्यांचे कडे सुपूर्द करावा.