नावात जरी ‘सत्य’ असले तरी सगळे ‘असत्या’चे सर्व उद्योग या कंपनीमध्ये झाले. देशाच्या इतिहासात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात एवढा मोठा घोटाळा तोपर्यंत उघडकीस आला नव्हता. त्यामुळेच की काय, या स्तंभातून घोटाळ्यांची मालिका सुरू करताना, त्याची सुरुवात म्हणून हीच निवड योग्य ठरावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक दिवशी अचानक सत्यमचे सर्वेसर्वा रामलिंगम राजू यांनी आपल्या पापाची कबुली एका पत्राद्वारे दिली आणि देशात अक्षरशः गदारोळ उडाला. त्या आपल्या कृष्णकृत्यांची कबुली राजू याने ७ जानेवारी २००९ ला दिल्यावर ८ तारखेची वर्तमानपत्रे अक्षरशः या विषयांनी भरलेली होती. या विषयाचे जाणकार असणाऱ्यांना काहीतरी होणार आहे किंवा काहीतरी शिजतंय याची कुणकुण डिसेंबर २००८ पासूनच लागली होती. जागतिक बँकेने त्या महिन्यात सत्यमला काळ्या यादीत टाकले. कारण बँकेशी व्यवहार करण्यासाठी ज्या कागदपत्रांची गरज होती ती सत्यम देऊ शकली नव्हती. त्याच सुमारास रामलिंगम राजू यांनी स्थापन केलेली कंपनी मत्यास म्हणजे सत्यमचे बरोबर उलटे नाव करून बनवलेली कंपनीच्या अधिग्रहणाला संचालक मंडळाने नकार दिला. या सगळ्यांमुळे भागधारकांच्या मनात थोडीसी चलबिचल होतीच. त्यातच एका जागल्याने निनावी पत्राद्वारे संचालकाला या घोटाळ्याविषयी सांगितले आणि त्याची चौकशीसुद्धा केली गेली. अंतिमत: मग ७ जानेवारी २००९ ला ‘लेटर बॉम्ब’ फुटला. राजू यांनी आपला गुन्हा एका पत्राद्वारे मान्य केला आणि ते पत्र जगाला खुलेसुद्धा केले. सुरुवातीच्या काही तासांमध्ये याची फारशी चर्चा झाली नाही पण संध्याकाळ होता होता हा विषय मोठा होत गेला आणि मग लक्षात आले की, आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे.

हेही वाचा : Money Mantra : आर्बिट्राज फंड काय असतो?

घोटाळा आणि त्यामधील पैशांच्या सहभागापेक्षा ज्या पद्धतीने हा घोटाळा झाला त्याची चर्चा वित्तीय जगतात मोठ्या प्रमाणात झाली. भारतीय कॉर्पोरेट जगताचे भांडे त्या निमित्ताने फुटले आणि नुसते फुटले नाही तर अक्षरशः वितळून खाक झाले. हा घोटाळा उघडकीला येण्यापूर्वी सत्यम कंपनीने सुशासनाचे (कॉर्पोरेट गव्हर्नन्स) देश-विदेशात अनेक पुरस्कार पटकावले होते. देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावलौकिक मिळविला होता आणि फॉर्च्युन ५०० या यादीतील कित्येक नामांकित कंपन्या त्यांच्या ग्राहक होत्या.

हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण- कोटक ब्लूचिप इक्विटी फंड

राजू याच्या म्हणण्यानुसार २००३ पासूनच कंपनीचे ताळेबंद तो चुकीच्या पद्धतीने मांडत होता. जसे की, जादा विक्री म्हणजे बनावट विक्री दाखवणे म्हणजे त्यामुळे अधिकचा नफा दाखवणे शक्य होते. जो अर्थातच बनावट होता. पण जर बनावट विक्री झाली तर तेवढाच बनावट नफादेखील होईल म्हणून काही खर्चसुद्धा खोटे करून दाखवणे गरजेचे होते. जेणेकरून वाढत्या नफ्यावर संशय नको. राजू महाशय आपल्या वैयक्तिक संगणकावर काही खोटे कर्मचारीसुद्धा बनवून कंपनीच्या ताळेबंदात घालत होता आणि नफा झाल्यावर तो बँकेत असल्याचे दाखवत होता. बरे हे सगळे शे-दोनशे रुपयांचे नसून तब्बल ७,००० कोटी रुपयांचे होते. मत्यासच्या अधिग्रहणामागे हाच उद्देश होता की खोटा नफा या स्वत:च्याच अन्य कंपनीत घालून सत्यमच्या ताळेबंदातून तो नष्ट करायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा घोटाळा किती खोल होता. असो पुढील भागात बघूया घोटाळ्याचे पुढे काय झाले ते.

X @AshishThatte

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramalinga raju satyam scam the story of india s biggest corporate scam print eco news css