मुंबई : रिझर्व्ह बँक नियम ठरविताना इतर मध्यवर्ती बँकांचे अनुकरण करीत नाही आणि आभासी चलनाला (क्रिप्टोकरन्सी) विरोधाबाबत जगाचा सूर काहीही असला तरी रिझर्व्ह बँक आणि माझ्या वैयक्तिक भूमिकेत कोणताही बदल संभवत नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. अमेरिकेतील नियामकांनी आभासी चलनावर बेतलेल्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडांना (क्रिप्टो-ईटीएफ) परवानगी दिली असून, त्याला सुस्पष्ट विरोध दर्शवणारी दास यांनी ही भूमिका मांडली.
विकसनशील बाजारपेठा आणि एकंदर जगालाही आभासी चलनाचे वेड परवडणारे नाही, असे सांगून दास म्हणाले की, ‘दुसऱ्या बाजारपेठेसाठी चांगली असलेली गोष्ट आपल्यासाठी चांगली असेलच असे नाही. त्यामुळे आभासी चलनाच्या विरोधातील रिझर्व्ह बँक आणि माझ्या यापूर्वीच्या भूमिकेतही सातत्य आहे. विकसनशील आणि विकसित अर्थव्यवस्थाही आभासी चलनाकडे वळत आहेत. यामुळे खूप मोठा धोका निर्माण होत असून, भविष्यात तो नियंत्रणात आणणे खूप अवघड ठरेल.’
हेही वाचा >>>Money Mantra : ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर कायद्यात कोणत्या सवलती मिळतात?
तुम्हाला त्या मार्गाने वाटचाल का करावयाची आहे, तुम्हाला त्यातून काय मिळणार आहे, असे प्रश्नही दास यांनी उपस्थित केले. वित्तीय स्थिरतेला आभासी चलन हे धोकादायक असल्यामुळे रिझर्व्ह बँक आणि दास यांनी त्याला विरोध करण्याची भूमिका वारंवार घेतली आहे.
हंगामी अर्थसंकल्पावर महागाईचा दबाव नाही
हंगामी अर्थसंकल्पावर महागाईचा कोणताही दबाव असणार नाही. सरकारकडून पुरवठ्याच्या पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजना रशिया-युक्रेन युद्धापासून सुरू आहेत. तेव्हापासून वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असेही दास यांनी नमूद केले.