एखादी सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे ब्रीदवाक्य हे ‘सस्मित सेवा तत्पर सेवा’ असू शकते, पण निफ्टी निर्देशांकाने मार्चच्या पूर्वार्धात २१,९६४ ते २३,८६९ अशी १,९०० अंशांची वाढ अवघ्या १४ दिवसांत करून गुंतवणूकदारांनाही सस्मित / आश्चर्याने थक्क करणारी अनुभूती दिली. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर जी १,९०० अंशांची ‘भूमिती श्रेणीतील’ वाढ झाली आहे ही ‘क्षणिक की शाश्वत’ हा प्रश्न सर्व गुंतवणूकदारांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर १,९०० अंशांच्या तेजीचे अंतरंग आज आपण जाणून घेऊया.
तेजी टिकाऊ ठरण्यासाठी एप्रिल महिन्यांत निफ्टी निर्देशांकाने एखाद्या हलक्याफुलक्या घसरणीत २३,१५० ते २२,९०० चा स्तर सातत्याने राखणे नितांत गरजेचे आहे. असे घडल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २३,८०० ते २३,९५० तर, द्वितीय वरचे लक्ष्य २४,३०० ते २४,८०० असे असेल.
निफ्टी निर्देशांकावरील अल्पावधीतील १,९०० अंशांची ‘भूमिती श्रेणीतील’ तीव्र वाढ ही ‘अतिघाई संकटात नेई’ स्वरूपाचीही ठरू शकेल. ती तशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २२,९०० ते २२,६०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २२,३०० असेल.
थोडक्यात ही तेजी शाश्वत, दीर्घ मुदतीच्या स्वरूपात टिकताना पाहायची असल्यास निफ्टी निर्देशांकाने २२,३०० चा स्तर सातत्याने राखणे नितांत गरजेचे आहे. भविष्यात निफ्टीने २२,३००चा स्तर राखल्यास या निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,२०० ते २४,८०० असे असेल. मात्र २२,३००चा स्तर राखण्यास तो सातत्याने अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २२,००० ते २१,८०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २१,५०० देखील दिसू शकेल.

बातमीतील समभाग

मूलभूत उद्योगांना जो प्रमुख कच्चा माल लागतो त्यात तांब्याचा (कॉपर) प्रामुख्याने समावेश होतो. या दृष्टीने सरलेल्या सप्ताहात आंतरराष्ट्रीय स्तरावरील धातू बाजाराचा मानदंड असलेले लंडन धातू बाजारात – ‘लंडन मेटल एक्सचेंज – एलएमई’मध्ये तांबे धातू खरेदीच्या सौद्यांची वाढीव मागणीची नोंद झाली. येणारी दोन ते तीन वर्ष या धातूला अतिशय चांगली मागणी असल्याचा कयास असून, या धातूभोवती तेजीचा फेर पकडू शकतो अस मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर तांबे धातू क्षेत्रातील कंपन्याचे समभाग हे आपले आजचे ‘बातमीतले समभाग’ असणार आहेत.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड

२८ मार्चचा बंद भाव – २२०.७९ रु.

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २३० रु.

वरील बातमीच्या सकारात्मक परिणामातून समभागाकडून २३० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य २४५ रुपये, द्वितीय लक्ष्य २८० ते ३२५ रुपये गाठले जाईल. अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग २३० रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १९० रुपयांपर्यंत घसरेल.

हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

२८ मार्चचा बंद भाव – ६८२.४५ रु.

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७१५ रु.

वरील बातमीच्या सकारात्मक परिणामातून समभागाकडून ७१५ रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य ७७० रु., द्वितीय लक्ष्य ८५० रुपये असे असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग ७१५ रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत ६४० रुपयांपर्यंत घसरेल.

वेदांन्त लिमिटेड

२८ मार्चचा बंद भाव – ४६३.४० रु.

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४५० रु.

वरील बातमीच्या सकारात्मक परिणामातून समभागाकडून ४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४७५ ते ५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५२५ रुपये असे गाठले जाईल. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग ४५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४२५ रुपयांपर्यंत घसरेल.

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:-शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’आणी इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.