बांद्रयाच्या महाविद्यालयाजवळील रॉयस्टन कॅफेमध्ये आज जवळजवळ २० वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. सॅम थकल्यासारखा दिसत होता. राम आणि सॅम महाविद्यालयात एकत्र असल्यापासूनची मैत्री होती. दोघांनी एकत्रच अभियांत्रिकीमध्ये शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळविली होती. मात्र काही वर्षांनंतर दोघांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. आज दोघेही ठरवून भेटले. खूप गप्पा झाल्या आणि मनाच्या सुगंधी कुपीत ठेवलेल्या जुन्या आठवणींचा दरवळ कॅफेत भरून राहिला.
वर्ष २५
अभियांत्रिकीचे शिक्षण संपवून दोघेही चांगल्या नोकरीत रुजू झाले होते. दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी ‘मध्यमवर्गीय’च होती. पण अर्थसंस्कार वेगळे होते. दोघांचेही पैशासोबतचे नाते वेगवेगळे जुळत गेले. पहिला पगार रामने आई-वडिलांना दिला होता तर सॅमने त्याच्या सर्व मित्रांना घेऊन मौजमजा करण्यात पहिला पगार घालवला. राम विचारी तर होताचा पण त्याला खूप सुरुवातीलाच जाणवले की, आयुष्यात चांगली संपत्तीनिर्मिती करायची असेल तर व्यवसाय केला पाहिजे. परंतु चांगल्या नोकरीतून बाहेर पडणे त्याकाळी शक्य झाले नाही. त्याने दुसरा मार्ग निवडला, जे चांगले व्यवसाय करत आहेत त्यांच्या कंपनीचे समभाग विकत घेतले. त्याचवेळेस समभागसंलग्न म्युच्युअल फंडाविषयी त्याला कळले. तो नियमितपणे हळूहळू चांगले समभाग आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करत गेला. आयुष्यात खर्च माफक ठेवला. यथावकाश त्याचे लग्नही झाले.
हेही वाचा – बाजाररंग : पडझड आणि संधी
सॅमचे विचार वेगळे होते. भविष्याचा फारसा विचार न करता आलेला दिवस मजेत घालवायचा असे ठरवले होते. उंची राहणीमानाचे त्याला खूप आकर्षण होते. मित्रांसमवेत गाडी काढून सुटीच्या दिवशी फिरून येणे आणि अर्थातच त्यामुळे हॉटेलमधील जेवणावरील त्याचा खर्च वाढत राहिला. चांगली नोकरी असल्यामुळे मित्र देखील मदत म्हणून पैशांची मागणी करायचे. सॅमच्या याच दातृत्वामुळे सगळ्यांचा ‘जानी दोस्त’ होता तो. शेअर बाजाराबद्दल त्याच्या मनात एक अढी होती. एका ‘पेनी स्टॉक’मध्ये गुंतविलेले पैसे बुडाल्याने पुढे तो त्या वाटेला फिरकलाच नाही.
वर्ष ३५
राम निगुतीने पैसे गुंतवत गेला. भांडवली बाजारात संयमाची परीक्षा अनेक वेळा द्यावी लागली. मात्र तो डगमगला नाही. काही चुका झाल्या देखील. मात्र आर्थिक ध्येय आणि मार्ग ठरलेला होता. सॅमने येणारा दिवस खरा मानला. उधळपट्टी चालूच होती. नाही म्हणायला बँकेत थोड्याफार ठेवी होत्या. सुरक्षित म्हणून बँकेतच ‘आरडी’ चालू होती. केरळमध्ये एक ‘सेकंड होम’ म्हणून घर घेतले होते. तिथे वर्षातून तो तीन चारदा जायचा. सॅम आई-वडिलांच्या घरात राहायचा, लग्नाचे वय निघून गेलेले. तर दुसरीकडे रामने स्वतःच्या पैशातून मुंबईत घर घेतले. आई वडिलांना रामचा अभिमान होता.
हेही वाचा – Money Mantra: शेअर बाजाराचा ‘यू टर्न’, पडझडीतून सावरणार का? कसे?
वर्ष ४५
रामने आतापर्यंत नियमितपणे भांडवली बाजारात गुंतवणूक सुरूच ठेवली होती. त्याची फळे त्याला दिसायला लागली होती. छोट्याशा रोपट्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले होते. बाजारातील एक सूत्र म्हणजे चक्रवाढीची ताकद अर्थात ‘पॉवर ऑफ कंपाऊंडिंग’मुळे गेल्या २० वर्षांत केलेल्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य स्तिमित करणारे होते. दरम्यानच्या काळात सॅमची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. काही कारणांमुळे नोकरी गमवावी लागली. वाढलेले वय, त्याच्या अनुभवाला साजेशी नवीन नोकरी मिळत नसल्याने तो अधिकच खचत गेला. उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आणि महागाईची झळ देखील जाणवायला लागली. केरळमधील घर विकावे लागले. सर्व गुंतवणूक पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये असल्यामुळे पैशांची वाढ मर्यादित राहिली. आज कॅफेत सॅमला बोलताना गहिवरून आले. रामने त्याला धीर दिला आणि त्याच्या ओळखीतून एके ठिकाणी सॅमसाठी शब्दही टाकला. ही कथा खरी आहे. अर्थात नावे फक्त बदलली आहेत. सॅम हा ‘क्षणिक आनंद’ आहे, राम हा ‘संयमानंतरचे समाधान’ आहे, हा बोध आजच्या तरुणांनी यातून घेतला पाहिजे. ‘द रोड नॉट टेकन’ ही रॉबर्ट फ्रॉस्ट या अमेरिकी कवीची एक गाजलेली कविता आहे, त्यातील काही ओळींनी आपण शेवट करूया.
Two roads diverged in a wood, and I,
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
तर मित्रांनो, तुम्ही यातील कोणती वाट निवडणार आहात?
समभागसंलग्न म्युच्युअल फंडामधील एसआयपी
कालावधी | एसआयपी २५,००० रुपये दर महिना | एसआयपी टॉपअप २५,००० रुपये दर महिना (दर वर्षी १० टक्के वाढ केल्यास) |
१० वर्षे | ५८.०८ लाख | ८४.३५ लाख |
१५ वर्षे | १.२६ कोटी | २.१७ कोटी |
२० वर्षे | २.४९ कोटी | ४.९७ कोटी |
* वरील उदाहरणात वार्षिक वृद्धीदर १२ टक्के गृहीत धरला आहे.
लेखक मुंबईस्थित वित्तीय समुपदेशक आहेत.
sameernesarikar@gmail.com