लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : रिझर्व्ह बँकेने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला (पीएफसी) गुजरातमधील ‘गिफ्टसिटी’मध्ये वित्त कंपनी स्थापन करण्यास मंगळवारी मंजुरी दिली. यातून पीएफसीला निधी उभारणीसाठी जागतिक मंच खुला होणे अपेक्षित आहे.गुजरातस्थित इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर येथे एक उपकंपनी स्थापण्याची ‘पीएफसी’ योजना आखत आहे. त्या आधारावर कंपनीला रिझर्व्ह बँकेकडून ९ जानेवारी २०२४ रोजी ना हरकत पत्र प्राप्त झाले.
आयएफएससीमध्ये प्रवेशामुळे ‘पीएफसी’ला नवीन व्यवसायाच्या संधी आणि जागतिक दालन खुले होईल, असे पीएफसीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात सूचित केले. पीएफसी ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने बाजारातून सुमारे १.०५ लाख कोटींची कर्ज उभारणी केली आहे. कंपनीने रोखे, डिबेंचर्स, मुदत कर्जे, बाह्य वाणिज्यिक कर्जे आणि सार्वजनिक किंवा खासगी प्लेसमेंटच्या माध्यमातून कर्ज उभारून, विविध वीजनिर्मिती प्रकल्पांना वित्तपुरवठा केला आहे.