या आठवड्यातील बाजारातील प्रमुख घडामोडींमध्ये अर्थातच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घडामोड म्हणजे भारतीय रिझर्व बँकेची मॉनिटरी पॉलिसीची घोषणा हीच ठरली. रिझर्व बँकेने आपल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पॉलिसी रेट्स अर्थात व्याजदर साडेसहा टक्क्यावर कायम ठेवले आहेत. बाजारातील रोकड / पैशाची उपलब्धता लक्षात घेता रिझर्व बँकेने सी आर आर अर्थात रोख तरलता निधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे समजा सी. आर. आर. दहा टक्के असेल तर बँकांकडे उपलब्ध असलेल्या ठेवीतून आलेल्या पैशांपैकी दहा टक्के पैसे बँकेला रोख स्वरूपात ठेवावे लागतील आणि त्यातून कोणतेही कर्ज देता येणार नाही. म्हणजे बँकेसाठी तो पैसा अडकून राहिला आहे. याचा परिणाम बाजारावर झालेला दिसला. निफ्टी५० इंडेक्स ०.४५% घसरला. याउलट बाजारातील अन्य दोन ब्रॉडर इंडेक्स वाढलेले दिसले.
आणखी वाचा: Money Mantra: हार्वेस्टिंग मशीनचं पीक
निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स आणि निफ्टी स्मॉल कॅप २५० इंडेक्स यांनी अनुक्रमे ०.८% आणि ०.५% एवढी वाढ नोंदवली. बाजारात चमकदार आकडे ज्या क्षेत्रांनी दर्शवले त्यामध्ये या वेळेला वेगळी क्षेत्र होती. निफ्टी मीडिया, निफ्टी कन्स्युमरेबल्स आणि निफ्टी आयटी हे निर्देशांक वाढले. यातील निफ्टी मीडियामध्ये तब्बल साडेसात टक्क्याची वाढ दिसून आली. मीडिया आणि इंटरटेनमेंट या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये होत असलेल्या खरेदी विक्रीमुळे हा निर्देशांक चांगलाच वर गेला. याउलट निफ्टी बँक, निफ्टी रियल इस्टेट आणि निफ्टी फायनान्शिअल सर्विसेस या निर्देशांकामध्ये घट दिसून आली. बाजारातील परदेशी वित्त संस्था आणि म्युच्युअल फंड यांची खरेदी नेहमीप्रमाणेच कायम राहिली. जुलै महिन्यात म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण खरेदी अधिक आणि विक्री कमी नोंदवली गेली. इक्विटी योजनांमध्ये साडेसात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे बाजारात आले. बाजारात काही कंपन्यांमध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. किर्लोस्कर ऑइल इंजिन या कंपनीचा शेअर शुक्रवारी नऊ टक्के वाढला. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या कंपनीचा शेअर तीन टक्के वाढला व याचे मुख्य कारण कंपनीचा वाढलेला नफा असे सांगण्यात येत आहे. कंटेनर कॉर्पोरेशन या कंपनीचा शेअर तीन टक्के घसरून ६७८ रुपयावर स्थिरावला. जून महिन्याच्या अखेरीस आलेल्या निकालांमुळे ही घट दिसली आहे.
आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?
शुक्रवारी भारताची औद्योगिक प्रगती दाखवणारा आयआयपी डेटा प्रसिद्ध झाला. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यामध्ये उत्पादनातील वाढ नकारात्मक दिसून आली . मे महिन्यात हा वाढीचा दर ५.२% होता तो आता अवघा ३.७ % इतका झाला आहे. एप्रिल ते जून २०२२ या मागच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीशी तुलना करता यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत हाच दर साडेबारा टक्क्यावरून घसरून साडेचार टक्क्यावर आला आहे. जून महिन्यातील या घटलेल्या दराचे प्रमुख कारण उत्पादन क्षेत्रात झालेली घट होय. या निर्देशांकातील दुसरे घटक असलेल्या खाणकाम आणि विद्युत निर्मिती उद्योगात वाढ दिसून आली. खाणकाम उद्योगातील एकूण उत्पादन ६.४% दराने मे महिन्यात वाढले होते ते जून मध्ये ७.६% या दराने वाढलेले दिसले. विद्युत निर्मिती मे महिन्यातील ०.९ % या तुलनेत जून महिन्यात ४.२ % एवढी वाढलेली दिसली. देशाच्या निर्यातीसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या वस्त्रोद्योग आणि तयार वस्त्र प्रावरणे या उद्योगांमध्ये उत्पादन घटलेले दिसले. भांडवली वस्तूंचे उत्पादन मे महिन्यात 8.1% या दराने वाढले होते. जून महिन्यात ती वाढ फक्त २.२ % टक्के एवढी दिसून आली. सोमवारी बाजार सुरू होताना या सर्व घटकांचा विचार करावा लागेल.