अलीकडच्या आठवड्यात बाजार निर्देशांक नवीन उच्चांक बनवत आहेत आणि उंचावलेल्या मूल्यांकनांबद्दल चिंता वाटावी अशी परिस्थिती असूनदेखील तेजी अबाधित राहिलेली दिसते आहे. गेल्या वर्षभरात मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्मिती केली असल्याने मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक आहे.
व्यापक बाजारातील तेजी गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर असू शकली, तरी अशा परिस्थितीत, लार्ज-कॅपकडे कललेला फ्लेक्झीकॅप फंड गुंतवणूकदारांची जोखीम कमी करू शकेल. ‘३६० वन फ्लेक्झीकॅप फंडा’ची सुरुवात ७ जुन २०२३ रोजी झाली. लहान फंड घराणे असूनदेखील १४ महिन्यांत फंडाच्या मालमत्तेने १,००० कोटींचा टप्पा ओलांडला. दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड एक चांगली फंडाची निवड ठरू शकते. फंडाने कमी कालावधीत आश्वासक कामगिरी केली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात एसआयपी मार्ग अवलंबवणे संपत्ती निर्मितीसाठी उचित ठरू शकते. ‘३६० वन फ्लेक्झीकॅप फंडा’ची गेल्या वर्षभरातील कामगिरी आश्वासक वाटल्याने या फंडाची निवड केली आहे. मागील सोळा महिन्यांच्या कालावधीत, फंडाने पॉइंट-टू-पॉइंट आधारावर ४२ टक्के परतावा दिला असून फंड गटात हा फंड, ३९ फंडांपैकी सहाव्या स्थानी आहे . मागील पाच तिमाहींत या फंडाने, या फंडाचा बीएसई ५०० टीआरआय मानदंड असून गेल्या पाच तिमाहींत मानदंडसापेक्ष किमान ३ ते ६ टक्के अधिक परतावा मिळविला आहे. गेल्या पाच तिमाहींत त्रैमासिक चलत सरासारी आधारे या फंडाने ९९.९७ वेळा (दिवशी) फंडाने त्याच्या मानदंड असलेल्या ‘बीएसई ५०० टीआरआय’ला मागे टाकले आहे. याच कालावधीत या फंड गटात त्रैमासिक चलत सरासरी मानदंडसापेक्ष अधिक परतावा मिळवण्याची सरासरी ८७ टक्के आहे. फंड अस्तित्वात आल्यापासूनचा कालावधी कमी असल्याने कदाचित आताच निष्कर्ष काढणे आततायी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – बाजारातली माणसं: मंदीचा सदा सर्वदा नायक – शंकर शर्मा
मागील १६ महिन्यांच्या कालावधीत फंडाने ४८ टक्के परतावा दिला आहे. या फंडाचा मानदंड असलेल्या ‘बीएसई ५०० टीआरआय’च्या ‘एसआयपी’ने याच कालावधीत २९.२२ टक्के परतावा दिला आहे. (सर्व आकडे फंडाच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार आहेत.) फंडाचा ‘अपसाइड कॅप्चर रेशो’ १०२.०७ असून या फंडाच्या हा फंड तेजी दरम्यान बेंचमार्कपेक्षा अधिक वाढते. ‘डाऊनसाइड कॅप्चर रेशो’ ८६.२२ असून घसरणी दरम्यान हा फंड दुसऱ्या स्थानी असल्याने अधिक जोखीम संभवते. या फंड जोखीम घेऊन अधिक परतावा मिळविणारा फंड आहे. ही कामगिरी जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२४ कालावधीतील उपलब्ध आकडेवारीवर आधारित आहे.
बँका आणि आर्थिक सेवा, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार ही फंडाची गुंतवणूक असलेली प्रमुख उद्योग क्षेत्रे राहिली आहेत. फंडाच्या सुरुवातीला, फंडाच्या कामगिरीला बँकांची साथ लाभली असली, तरी बँकांच्या समभागांचे भाव शिखरापासून ३३ टक्के घसरले आहेत. हा फंड संपूर्ण बाजारमूल्य साखळीत, समभाग आणि समभागसंबंधित गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करून आणि रोकड सुलभता राखण्यासाठी उरलेला भाग रोखे आणि मनी मार्केट साधनांत गुंतवून दीर्घकालीन भांडवली लाभ प्राप्त करणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. ‘मॉर्निंगस्टार’ने ‘३६० वन फ्लेक्झीकॅप फंडा’ची जोखीम मध्यम आणि परतावा अपवादात्मक असा आहे. फंडात सप्टेंबर अखेरीस ३.१८ टक्के रोकड आहे. फंडाच्या आघाडीच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे.
हेही वाचा – माझा पोर्टफोलियो, घसरणीच्या काळातील आरोग्यवर्धन: ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड
फंडाचा पोर्टफोलिओ पहिल्यापासून लार्ज-कॅप केंद्रित असून पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅपची मात्रा किमान ३८ टक्के तर कमाल ४८ टक्के मानदंड असलेल्या निर्देशांकात लार्जकॅपची मात्रा ८० टक्के आहे. फंडाने साधारण जुलै २०२३ पासून लार्जकॅपमधील मात्रा कमी करून स्मॉल-कॅप समभागांमधील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने वाढवली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पोर्टफोलिओत स्मॉलकॅपचे प्रमाण २४ टक्के आहे. एकंदरीत, चांगल्या तेजीमुळे आणि लार्जकॅपचे प्रमाण योग्य राखल्याने फंडाने गेल्या काही महिन्यांत बाजारातील व्यापक तेजीचा फायदा उठवला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ४४ ते ४८ कंपन्यांचा समावेश असतो. कंपन्यांच्या निवडीत व्हॅल्यू आणि ग्रोथ शैली दोन्ही नांदताना दिसतात. गेल्या वर्षी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या वाढत्या गुंतवणुकीनंतर फंडाने नंतर वाऱ्याची दिशा ओळखून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक कमी केली. पोर्टफोलिओ सक्रिय व्यवस्थापित असल्याने अलीकडच्या काही महिन्यांत, फंडाने नव्याने सूचिबद्ध झालेला बजाज हाऊसिंग आणि एसबीआय कार्ड्सचा नव्याने गुंतवणुकीत समावेश केला तर ॲक्सिस बँक आणि ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (जेएफएल) यांना गुंतवणुकीतून वगळले आहे.
एकंदरीत, विचार करता दीर्घकालीन स्थिर कामगिरी असलेल्या फंडाच्या शोधात असलेल्या आणि सरासरीपेक्षा जास्त जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी हा एक एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी फंड एक चांगला पर्याय आहे. हा फंड कोअर इन्व्हेस्टमेंट या गटात मोडणारा नसल्याने फंडाच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते. आणि गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती पत्रक सखोल अभ्यासावे हा वैधानिक इशारा लक्षात घ्यायाल हवा.