कमॉडिटी बाजारातच नव्हे शेअर बाजारातील गुंतवणूकदार देखील सध्या एकाच गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. ते म्हणजे सोने. ते प्रति तोळा एक लाख रुपयांची पातळी ओलांडणार का? तेजी कायम राहणार की सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार असे अनेक प्रश्न सध्या गुंतवणूकदारांच्या मनात आहेत. स्वतःचीच आधीची उच्चांकी पातळी मोडीत काढणारे सोने हे आता एक लाख रुपयांच्या टप्प्याजवळ येऊन थांबले आहे. वास्तविक यातील अनेकांचे सोन्याच्या भावाशी काही देणेघेणे देखील नसते. मात्र आजपर्यंत कधीच अशी अभूतपूर्व तेजी पहिली नसल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
विक्रमी किंमत-विक्रमी परतावा
गेल्या आठवड्यात भारतात सोन्याने ९७,५०० ते ९८,००० रुपये प्रति दहा ग्रॅम अशी पातळी नोंदवली असून आकडेवारीत बोलायचे तर करोनानंतरच्या चार वर्षात सोन्याने गुंतवणुकीवरील परताव्यांचे अल्प, मध्यम आणि दीर्घ कालावधीसाठीचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचे दिसून येत आहे. उदाहरण द्यायचे तर मागील चार वर्षात सोन्याची रुपयांमधील किंमत दुप्पट झाली आहे. तर २०२२ आणि २०२३ मधील वार्षिक परतावा सरासरी १५ टक्के, २०२४ मध्ये २१ टक्के तर २०२५ मधील पहिल्या चार महिन्यात आतापर्यंत सुमारे २५ टक्के एवढा परतावा मिळाल्याचे दिसून येते.
त्यामुळेच सोन्याबाबत एवढी उत्सुकता निर्माण होणे साहजिकच आहे. परंतु सोन्यासाठी ग्राहकांची मागणी निश्चितच कमी झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ मध्यवर्ती बँका आणि काही प्रमाणात संस्थात्मक ‘ईटीएफ’ खरेदीमुळे सोन्याचे भाव अक्षरश: पळताना दिसत आहेत. यामुळेच प्रत्येकाला सोन्याचा बाबतीत अनेक प्रश्न पडले आहेत.
रिझर्व्ह बँकेची सोनेखरेदी
भारतीय मध्यवर्ती बँकेने या वर्षातदेखील सोने-खरेदी चालू ठेवली असली तरी मार्चमध्ये त्याचा वेग काही प्रमाणात मंदावला असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारीत शून्य खरेदीनंतर मार्च महिन्यात रिझर्व्ह बँकेने सुमारे ६० टन सोने खरेदी केली आहे, असे बँकेने प्रसारित केलेल्या साप्ताहिक आकडेवारीत दिसून येत आहे. त्यामुळे देशाच्या तिजोरीत आता सुमारे ८८० टन सोने जमा झाले असून ते एकूण परदेशी गंगाजळीच्या १२ टक्के एवढे झाले आहे. मागील संपूर्ण कॅलेंडर वर्षात भारताने ५७.५ टन सोने खरेदी केले होते.
‘बुल’ आणि ‘बेअर’च्या पलीकडे…
साधारणपणे प्रत्येक गुंतवणूकयोग्य मालमत्तेत तेजी आणि मंदीवाले यांची एकमेकांशी स्पर्धा चालू असते. त्यामुळे बाजारात किमती मागणीपुरवठा समीकरणानुसार कमी-अधिक होत असतात. या संपूर्ण बाजाराधिष्ठित प्रक्रियेत मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषकांची जमात वेळोवेळी किमतीचे कल ठरवण्यात मोलाची भर घालत असते. त्यामुळे बाजार कधी ‘बुल’ (तेजीवाले) तर कधी ‘बेअर’च्या (मंदीवाले) अधिपत्याखाली राहतात. परंतु सोन्यातील किमती आता ‘बुल’ आणि ‘बेअर’ स्पर्धेपलीकडे गेल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. किंबहुना, मागील तीन महिन्यांतील किमतीतील तेजीला ‘शॉर्ट कव्हरिंग’मुळे अधिक हवा मिळाल्याचे बोलले जात आहे.
तांत्रिक म्हणेजच टेक्निकल विश्लेषकांनी डॉलरमध्ये मांडलेल्या प्रतिऔंस २९८०, ३०००, ३१४०, ३१८० आणि ३२०० डॉलर या सर्व लक्ष्य पातळीवर सोन्यात नरमाई येईल या नेहमीच्या अनुभवाप्रमाणे सोने-सटोडियांनी देशांतर्गत आणि अमेरिकी वायदे बाजारात सोने विक्री केली असावी. परंतु किमती खाली न जाता एखादा क्षणिक विक्रीचा मारावगळता सतत वरच जात राहिल्याने या सटोडियांना सतत विक्री केलेले सोने पुन्हा पुन्हा खरेदी करत राहावे लागल्यामुळे तेजी अधिक धारदार झाली असल्याचे झवेरी बाजारात ऐकायला मिळत आहे. प्रचंड तोटा झाल्यामुळे आता ही जमात सध्या सोन्यात ना तेजी-ना मंदी पवित्रा घेऊन राहिली आहे.
सोने नेहमीच्या मूलभूत आणि तांत्रिक घटकांपासून दूर गेले असून जगात सध्या चाललेले व्यापारयुद्ध, चीन-अमेरिका यांचे ‘ईगो’ युद्ध, आणि त्यातून अमेरिकी डॉलरला निर्माण झालेला धोका हे नवीन मूलभूत घटक सोन्यात एकतर्फी तेजी आणत असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे अमेरिकेला शरण आणण्यासाठी त्यांचे डॉलर विकून सोने घ्यायचे हे आर्थिकदृष्ट्या धारदार शस्त्र वापरत असल्यामुळे सोन्यातील एकतर्फी तेजी आल्याचे दिसून येत आहे.
हे युद्ध नजीकच्या काळात थांबेल असे वाटत नसल्यामुळे सोन्यात नवीन लक्ष्य देणे सध्या कठीण आहे. तर अमेरिका आणि चीन या दोघांना केव्हा शहाणपण सुचेल हे सांगणे कठीण आहे. तरी या युद्धात दोघांनाही फटका बसणार आहे, याची कल्पना असल्यामुळे शेवटी काहीतरी तोडगा निघेलच. तेव्हाच सोन्यात कलबदल होईल असेही आता म्हटले जात आहे. त्याबरोबरच ब्रिक्स (BRICS) समूहाची स्वतंत्र चलन विकसित करून डॉलरला आव्हान देण्याची छुपी तयारीदेखील सोन्यातील तेजीला मदत करत असल्याचे म्हटले जात आहे.
या समूहाचा सभासद असलेल्या भारताने याचे खंडन केले असले तरी अप्रत्यक्षपणे असे प्रयत्न होतच आहेत. दीर्घ कालावधीत ते देशाला तारकच ठरतील. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकांनी सोन्याचे सुधारित लक्ष्य ३००० डॉलरवरून ३२०० डॉलर केले होते. त्यांनी आता ते ३७०० डॉलरपर्यंत वाढवून सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात सांगायचे तर सोने आता १०० डॉलरवर, २०० डॉलर खाली परत तेजी अशा जीवघेण्या चढउतारावरून प्रवास करेल, असे म्हटले जात असल्याने ते कुठे जाऊन थांबेल हे कळणे अवघड झाले आहे.
‘गोल्ड-टेन काँट्रॅक्ट’ – एक विश्वासार्ह साधन
या स्तंभातून यापूर्वी आपण एमसीएक्स वायदे बाजारातून सोने खरेदी करणे कसे उत्तम आहे, याची कारणे बघितली होती. एमसीएक्स या कमॉडिटी एक्स्चेंजवर १ ग्रॅम, ८ ग्रॅम आणि १०० ग्रॅम सोने खरेदीची वायदे अर्थात कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध असल्याने १० ग्रॅम या सर्वपरिचित परिमाणात खरेदी करणाऱ्या ग्राहकाला संभ्रम पडत असे. परंतु आता या बाजार मंचावर गोल्ड-टेन या १० ग्रॅम काँट्रॅक्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात संपणाऱ्या या पहिल्याच काँट्रॅक्टला जोरदार प्रतिसाद मिळाला असून अक्षयतृतीयेला या सोनेखरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या मुहूर्तावर पहिली सोने डिलिव्हरी दिली जाणार आहे. १० ग्रॅम गोल्ड बिस्किट केवळ ३०० रुपये मजुरी आकारून ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला सोने खरेदीसाठी आणि ट्रेडिंगसाठी एक विश्वासार्ह साधन उपलब्ध झाले आहे.
© The Indian Express (P) Ltd