वसंत माधव कुळकर्णी
एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक गोपाल अग्रवाल यांना वाणिज्य वृत्त वाहिनीकडून मागील आर्थिक वर्षातील सर्वात यशस्वी निधी व्यवस्थापक म्हणून गौरविण्यात आले. एचडीएफसी डिव्हिडंड यील्ड आणि एचडीएफसी मल्टीकॅप, एचडीएफसी लार्ज अँण्ड मिडकॅप, एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड या प्रमुख फंडांचे ते निधी व्यवस्थापक आहेत. त्यांच्याशी नुकताच संवाद साधला. या संवादाचा हा संपादित अंश…
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या सहामाहीसाठी बाजारासंबंधी तुमचा दृष्टिकोन कसा आहे?
– मागील वर्षाच्या तुलनेत जिनसांच्या किमतीत झालेली घसरण आणि उपभोगात झालेली वाढ अर्थव्यवस्थेसाठी सुचिन्ह आहे. आश्वासक वित्तीय धोरणांच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारताच्या विकासदराबद्दल आशावादी आहोत. तेलाच्या कमी किमती, वाढलेली सेवा निर्यात यामुळे चालू खात्यातील वित्तीय तूट मर्यादेत राहण्याची अपेक्षा आहे. जागतिक कठोर रोकड सुलभता पाहता भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीबाबत काहीशी साशंकता वाटते. मध्यम कालावधीत, भारतीय अर्थव्यवस्थेला अनुकूल धोरण वातावरण, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनपर लाभ (पीएलआय) योजनांचा फायदा, जागतिक पुरवठा साखळीतील बदलामुळे भारतासाठी उपलब्ध झालेल्या संधी, पायाभूत सुविधांच्या खर्चावर सरकारचा जोर याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होत आहे.
हेही वाचा >>> प्राप्तिकराचा परतावा…, ‘रिफंड’ कसा मिळतो?
बाजाराचे मूल्यांकन अजूनही सरासरीपेक्षा जास्त असले तरी उच्चांकी मूल्यांकनावरून कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाल्याने भविष्यातील धोका कमी झाला आहे. जीडीपीतील पुनर्प्राप्ती, निरोगी सुदृढ कॉर्पोरेट आणि बँकिंग ताळेबंद यांच्या संदर्भात मूल्यांकन धोकादायक आहे असे वाटत नाही. कंपन्यांच्या नफ्यातील सुदृढ वाढ लक्षात घेऊन आम्ही मध्यम ते दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीबाबत सकारात्मक आहोत. व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे दिसत असल्याने, आणि रिझर्व्ह बँकेने रोकडसुलभता कमी करण्यासाठी योजलेले उपाय, विकसित अर्थव्यवस्थांतील मंदी आणि चलनवाढ कमी होण्याची अद्याप चिन्हे दृष्टिपथात नसणे आणि देशांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील पुनर्प्राप्तीतील विलंब हे नजीकच्या काळातील समभाग गुंतवणुकीतील महत्त्वाचे धोके आहेत.
आगामी काळात तुम्हाला गुंतवणुकीची चांगली संधी दिसणारी उद्योग क्षेत्रे कोणती?
– मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी भारताच्या विकासाच्या विविध क्षेत्रांमधील संधी उपलब्ध आहेत, जसे की उपभोग (कंझम्प्शन), उत्पादन, सेवा आणि पायाभूत सुविधा यांचा आम्ही गुंतवणुकीसाठी विचार करीत आहोत. एक थीम म्हणून निर्मिती क्षेत्र आकर्षक परतावा देऊ शकेल. पीएलआय योजना, कॉर्पोरेट कर कपात, यामुळे आपली उत्पादने अधिक स्पर्धात्मक बनतील. लॉजिस्टिक क्षेत्रातील उपाययोजना, इत्यादीसारख्या विविध उपायांच्या घोषणांमुळे उत्पादन क्षेत्राला सुगीचे दिवस दिसतील. सरकारचा जोर पुढील दशकात किंवा त्याहून अधिक काळ उत्पादन/ निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा असेल. सरकारच्या धोरणांमुळे भारताची लोकसंख्या आणि कमी खर्चात उपलब्ध असणारे मनुष्यबळ लक्षात घेता, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भौगोलिक विविधता आणण्याचा पर्याय म्हणून उदयोन्मुख बाजारपेठांकडे पाहात आहेत.
आम्हाला विश्वास आहे की भारत पुढील दहा वर्षांत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता बाळगून आहे. यामुळे केवळ उत्पादनालाच चालना मिळेल असे नाही तर येत्या काही वर्षांत दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने उपभोगाची भूमितीय वाढ (जिओमेट्रिक प्रोग्रेशन) होऊ शकते. लोकसंख्येचा मोठा हिस्सा कमावत्या वयातील व्यक्तींचा असणे, वाढते दरडोई उत्पन्न आणि वस्तू आणि सेवा यांचा विस्तार या सारख्या संरचनात्मक बदलांमुळे भारताच्या उद्योगजगताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या उद्योग क्षेत्राबाबत विचार करायचा तर, आम्ही ग्राहकांच्या विवेकी खरेदी (कन्झ्युमर डिसक्रीशनरी) वाहन आणि वाहन पूरक उद्योग आणि सेवा या बाबतीत सकारात्मक आहोत. आकर्षक मूल्यांकनांमुळे, एल निनो परिस्थितीमुळे आगामी काळात विजेच्या मागणीत वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरात वीज निर्मिती आणि वीज वितरण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या सुधारणा या क्षेत्रासाठीही सकारात्मक आहेत, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नफा क्षमतेत (मार्जिन) सामान्यीकरणामुळे आयटी क्षेत्रातील कमाईत होणारी घसरण संपुष्टात आली आहे.
तुम्ही व्यवस्थापित करत असलेल्या फंडांपैकी एक महत्त्वाचा फंड – एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड. आज मूल्यांकन शिखरावर असताना तुम्हाला या फंडासाठी नवीन संधी दिसत आहेत का?
– म्युच्युअल फंडाचे सुसूत्रीकरण केल्यानुसार फंडाचे फेर-वर्गीकरण केले गेले आहे. संभाव्य कमाई किंवा कंपनीचे मूल्यांकन, भविष्यातील रोकड निर्मितीची क्षमता, तोट्यातून नफ्यात येण्याची शक्यात असलेल्या कंपन्या, तात्पुरत्या कठीण परिस्थितीतून गेलेले परंतु मूलत: चांगले व्यवसाय, ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांनी आमचा ६० टक्के पोर्टफ़ोलिओ व्यापला आहे. उर्वरित पोर्टफोलिओ निफ्टी ५०० हा या फंडाचा मानदंड असल्याने निफ्टी ५०० च्या मीडियन पीई किंवा मीडियन पीबी (किंमत/बुक व्हॅल्यू) पेक्षा कमी मूल्यांकन असलेल्या किंवा पाच वर्षांच्या स्वतःच्या मागच्या पीई किंवा पीबी पेक्षा कमी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांनी व्यापला आहे. बाजार उच्चांकी मूल्यांकनावर असल्याने, काही विशिष्ट उद्योगक्षेत्रे आणि कंपन्यांच्या मूल्यांकनाचा अतिरेक झाला आहे. अशा कंपन्यांचे मूल्यांकन त्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त असले तरी, काही क्षेत्रांमध्ये अजूनही गुंतवणूक संधी उपलब्ध आहेत. या फंडाचे उद्दिष्ट अशा संधींची ओळख करून देणे आणि दीर्घकालात संपत्ती निर्मिती हा गुंतवणुकीचा उद्देश आहे. ‘मार्जीन ऑफ सेफ्टी’चा विचार करून गुंतवणूक केल्याने बाजारात घसरण झाली तरी फारसे नुकसान होणार नाही.
मागील काळात एचडीएफसी लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाची कामगिरी उत्साहवर्धक आहे. जेव्हा तुम्ही या फंडाच्या पोर्टफोलिओची रचना कशी केली आहे?
– कंपन्यांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करणे ही आमची रणनीती आहे आणि यामुळेच आमच्या फंडांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. आम्ही आमच्या फंडांचे मानदंडात असलेल्या उद्योग क्षेत्रांच्या बाबतीत जागरूक राहिलो आहोत आणि आम्ही कधीही एखाद्या उद्योगक्षेत्रीय गुंतवणूक करीत नाही. तसेच, कंपन्यांच्या निवडीसाठी आमचा दृष्टिकोन अज्ञेयवादी आहे, ज्यामध्ये आम्ही वाढ, मूल्य आणि ‘टर्नअराऊंड’ यामध्ये संधी शोधतो.
जोखीम व्यवस्थापनावर कायम लक्ष केंद्रित करून आम्ही फंडाचे व्यवस्थापन भूतकाळात केले होते, त्याच पद्धतीने करत आहोत. जेव्हा आम्हाला बाजारातील काही कंपन्यांच्या बाबतीत मूल्यांकनात टोकाचा अतिरेक आढळतो, तेव्हा आम्ही त्या टप्प्यात गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते बदल वेळोवेळी करीत असतो. परतावा मिळविण्यासाठी कधीही अतिरिक्त जोखीम घेत नाही. गुंतवणूक ही जोखीम व्यवस्थापित करणे असते, परताव्यावर नसते. आम्ही चांगल्या प्रकारे जोखीम व्यवस्थापित करतो. या फंडाच्या पोर्टफोलिओचा ५१ टक्के हिस्सा लार्ज कॅपमध्ये, ३६ टक्के मिडकॅपमध्ये आणि १० टक्के स्मॉल कॅपमध्ये गुंतवला आहे.
shreeyachebaba@gmail.com