सलील उरुणकर
नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर नवउद्योजकांना अनेक प्रकारचे साहाय्य लागते. स्टार्टअप संस्थापकांसह कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानिमित्त लागणाऱ्या कार्यालयाच्या जागेपासून ते प्रयोगशाळा किंवा तंत्रज्ञानाधारित सोयी-सुविधा, तसेच तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन, व्यवसाय विस्तारासाठी लागणारे भांडवल, ग्राहक व गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावे लागणारे नेटवर्किंग, अशा सेवा देणाऱ्या मात्र कॉर्पोरेट ऑफिससारखी रचना आणि शिस्त असलेली संस्थात्मक रचना म्हणजे ‘इन्क्युबेटर’.
स्टार्टअप कंपन्यांचे यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. सुमारे ९० टक्के स्टार्टअप्स या पहिल्या दोन ते पाच वर्षातच बंद पडतात, असे जगभरातील संस्था व तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मुळातच नावीन्यपूर्ण आणि अपारंपरिक पद्धतीने व्यवसायपद्धती विकसित करण्याच्या प्रयत्नांमुळे हे अपयश येत असते, मात्र त्यातून नवउद्योजकांना शिकायला खूप मिळते. काही चुका टाळण्यासारख्या असतात तर काही अनावधनाने होतात. ज्या चुका टाळता येतात त्यासाठी कोणीतरी अनुभवी व्यक्ती किंवा संस्थेचे पाठबळ नवउद्योजकांना लागते. असे पाठबळ देणारी आणि स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी यंत्रणा म्हणजे बिझनेस इन्क्युबेटर्स. त्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय आर्थिक विकासालाही इन्क्युबेटर्स एकप्रकारे हातभार लावत असतात.
इन्क्युबेटर्समध्येही काही प्रकार असतात. तुम्ही ऐकले किंवा वाचले असेल की काही शैक्षणिक संस्थांमध्ये इन्क्युबेटर्स असतात तर काही संस्थात्मक गुंतवणुकदार, खासगी कंपन्या किंवा उद्योजकांनी इन्क्युबेटर्स सुरू केलेले असतात. सरकारी असो कि शैक्षणिक अथवा खासगी, इन्क्युबेटर्सचे मूळ उद्दिष्ट नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठीची विशिष्ट संसाधने उपलब्ध करून देणे.
हेही वाचा… Money Mantra: पर्सनल लोन घेऊन फायदेशीर गुंतवणूक करता येते का?
विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या स्टार्टअप इक्युबेटर्सला सध्या खूप वाव मिळत आहे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून किंवा अन्यथाही विद्यार्थी काही प्रोजेक्ट्सवर काम करू शकतात. ही प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जर त्यामध्ये व्यावसायिकदृष्टीने काही उत्पादन किंवा सेवा विकसित करण्याची क्षमता असेल तर त्याबाबत काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊ शकणाऱ्या प्रकल्पांना बीजभांडवल देण्याची व्यवस्था हे इन्क्युबेटर करतात. तसेच कंपनी स्थापन करणे, त्याची नोंदणी स्टार्टअप इंडिया योजनेमध्ये करणे, अन्य कर सवलती प्राप्त करणे तसेच ग्राहकवर्ग आणि अन्य खासगी गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्क्युबेटरशी संबंधित तज्ज्ञ मंडळी मदत करतात.
खासगी किंवा कॉर्पोरेट इन्क्युबेटर्स हे नावाप्रमाणेच काही उद्योग-व्यवसायांच्या गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेले असतात. म्हणजे मोठ्या कंपनीतील उत्पादन किंवा सेवांव्यतिरिक्त ज्या नव्या सेवा किंवा उत्पादनांवर काम करायचे असेल तर ते इन्क्युबेटरच्या माध्यमातून स्टार्टअप्सकडून केले जाते. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या बहुतांश संसाधनांचा फायदा नवउद्योजकांना होतो. उदाहरणार्थ गुगलसारखी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवसंकल्पनांवर काम करण्यास प्रोत्साहन देते. गुगलमध्ये असलेल्या ‘एरिया १२०’ या इन्क्युबेटरमध्ये १२० टीम विविध प्रकल्पांवर काम करत असतात.
कोणता इन्क्युबेटर आपल्या स्टार्टअप किंवा व्यवसायाच्या दृष्टीने चांगला असेल याचा विचार करून नवउद्योजकांनी निर्णय घेतला पाहिजे. स्टार्टअप कंपन्यांची संख्या लाखोंमध्ये असली तरी इन्क्युबेटर हे मर्यादित संख्येनेच उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्याही इन्क्युबेटरमध्ये प्रवेश मिळवायचा झाल्यास काही प्रमाणात स्पर्धात्मक वातावरण असते. इन्क्युबेटर्सलाही चांगल्या स्टार्टअप्सचा शोध असतोच. त्यामुळे एकमेकांना पूरक अशा गोष्टी साधल्या तर स्टार्टअप आणि इन्क्युबेटर दोघांचाही फायदा होऊ शकतो. नवउद्योजकांना केवळ संसाधनेच नाही तर योग्य मार्गदर्शन देणाऱ्या व्यक्तींचा संपर्क आणि त्यांच्या सानिध्यात येण्याची गरज भासत असते. अशी संधी देणाऱ्या इन्क्युबेटर्सचा शोध घेणेही तितकेच महत्त्वाचे!