रतन टाटा यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्यावरील स्मृतीपर, श्रद्धांजली वाहणाऱ्या किती लेख, भाषणांत रुसी मोदी हे नाव आले माहीत नाही. माझ्या मते या नावाचा उल्लेख आवश्यक होता. रुसी मोदी यांचे जीवन तीन वेगवेगळ्या कालखंडात विभागले जाऊ शकेल. प्रथम त्यांचे शिक्षण जे बहुतांश लंडनमध्ये झाले; त्यानंतर भारतात परत आल्यानंतर टाटा उद्योग समूहातील कंपनी – टाटा स्टील या ठिकाणी घडलेली त्यांची कारकीर्द आणि त्यानंतर १९९३ ते २०१४ (१६ मे २०१४ रोजी शेवटचा श्वास घेईपर्यंत) सार्वजनिक विस्मृतीत गेलेले त्यांचेच व्यक्तित्व.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रतन टाटा यांनी जुन्या व्यक्तींना बाजूला केले. ते करणे आवश्यकच होते, परंतु त्या वेळेस रुसी मोदी यांचा स्वाभिमान दुखावला गेला. परंतु सर्वच पारशी व्यक्तींच्या बाबतीत म्हटले जाते, ते जितके चांगले असतात तितकेच जर एखाद्या प्रसंगाने ठेच पोहोचली तर मग त्यांचे सर्व पारशी गुण उफाळून येतात. रुसी मोदी यांना पायउतार व्हावे लागले आणि त्यांचा संताप उफाळून बाहेर आला. अर्थातच काही वर्षांनंतर जे झाले ते योग्यच होते, अशी खुद्द त्यांनीच प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

जेआरडी टाटा यांनी त्यांना १९८४ ला टाटा स्टील या कंपनीचे अध्यक्ष केले. अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी टाटा स्टील या कंपनीचे व्यवस्थापन केले. काही कंपन्यांच्या अध्यक्षपदी काही व्यक्ती एवढे चांगले काम करतात की त्या कंपन्यांच्या वार्षिक सभांना उपस्थित राहणे हा एक आनंद असायचा. दुर्दैवाने आता कंपन्यांच्या पूर्वीसारख्या वार्षिक सभा होत नाहीत. २०२० मधील करोना साथीची कंपन्यांना सबब मिळाली. ‘सेबी’ने तात्पुरती परवानगी दिली. त्यानुरूप वार्षिक सभा सभागृहात घेण्याऐवजी ऑनलाइन होऊ लागल्या. आता तर काय वार्षिक सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मजाच संपली.

एका वार्षिक सभेत एका भागधारकाने वाटेल ते प्रश्न विचारायला सुरुवात केली. रुसी मोदी अध्यक्षांच्या खुर्चीत होते. त्या भागधारकाने उपस्थित असलेल्या भागधारकाकडे बघून हातवारे करण्यास सुरुवात केली. त्याचे लक्ष आपल्याकडे नाही असे रुसी मोदी यांच्या लक्षात येताच त्यांनी कानाच्यावर डोक्याजवळ बोट ठेवले आणि या भागधारकाचा स्क्रू ढिला आहे हे न बोलता सभागृहात पोहचवले. प्रचंड हास्याचा धबधबा कोसळला आणि त्या भागधारकाने प्रतिक्रिया म्हणून आणखी काही करण्याअगोदर रुसी मोदी म्हणाले, “कान भी मेरा, खुजली भी मेरी, उंगली भी मेरी तो भाईसाब आपको क्या तकलीफ हुई.” या वाक्याने पुन्हा टाळ्या घेतल्या.

वार्षिक सभा असो किंवा कंपनीचे व्यवस्थापन असो कोणत्या क्षणी मोदी काय करतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. एक दिवस कर्मचारी त्यांच्या केबिनमध्ये शिरले. कामगारांसाठी असलेले स्वच्छतागृह चांगले नाही अशी त्यांची तक्रार होती. तुमचा प्रश्न उद्या सोडवतो असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर कारखान्यात काम करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि कामगारांनी उपस्थित केलेला प्रश्न कसा सोडवायचा यासंबधी प्रश्न विचारले. अनेक प्रकारची उत्तरे मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी कारखान्यात रुसी मोदी यांनी अधिकाऱ्यांच्या स्वच्छतागृहाला, कर्मचाऱ्यांचे स्वच्छतागृह असा फलक लावला आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहाला अधिकाऱ्यांचे स्वच्छतागृह असा फलक लावला. नंतर काय घडले आणि झाले असेल ते लिहिण्याची आवश्यकताच नाही. वर्षानुवर्षे टाटा स्टील त्यांनी अशा प्रकारे सांभाळली. अशी की त्या काळात कंपनीत एक दिवससुद्धा संप झाला नाही. १९७९ ला जनता पार्टीचे सरकार आले असताना, सरकारकडे टाटा स्टीलचे ४७ टक्के भागभांडवल आहे म्हणून टाटा स्टीलचे राष्ट्रीयीकरण करावे असा प्रस्ताव पुढे आला. जमशेदपूर इथल्या कारखान्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने सरकारचा तीव्र निषेध केला. म्हणून सरकारला हा प्रस्ताव रद्द करावा लागला. टाटा स्टीलमध्ये एक काळ अशी परिस्थिती होती की, बिर्ला उद्योग समूहाकडे टाटापेक्षा जास्त प्रमाणात शेअर्स होते, परंतु बिर्ला उद्योग समूह टाटा स्टील आपल्या ताब्यात घेईल अशी भीती कधीच वाटली नाही.

टाटा स्टील आणि रुसी मोदी हे नाते इतके घट्ट जुळलेले होते की त्यांना जेआरडी टाटांनी सर्व हक्क बहाल केले होते. ‘मला टोयोटा कार खरेदी करायची ती परदेशी बनावटीची आणि त्यासाठी मला परकीय चलन मिळाले पाहिजे,’ असे पंतप्रधानांना सांगण्याची ताकद रुसी मोदीमध्ये होती. विमान चालवणे हे जसे जेआरडी टाटांना आवडायचे तशीच आवड रुसी मोदी यांना होती. हा माणूस त्याच्या पद्धतीने आपले आयुष्य जगला आणि वयाच्या ९६ व्या वर्षी कोलकाता येथे त्यांचा मृत्यू झाला. १६ अंड्यांचे आमलेट स्वतःच्या हाताने करून खाणारा हा माणूस होता. त्याचे वागणे, बोलणे, राहणे, खाणे, वाद्य वाजवणे, काय काय उल्लेख करायचा. हॅरो स्कूलला असताना त्यांच्या शेजारच्या खोलीत अल्बर्ट आइनस्टाइन राहत होते. दोघेही पहाटे लवकर उठायचे एक दिवस आइनस्टाइन यांनी रुसी मोदी यांना विचारले, तुम्ही पियानो वाजवता का आणि मग सहा महिने आइनस्टाइन व्हायोलिन वाजवायचे आणि रुसी मोदी पियानो अशी त्यांची जुगलबंदी व्हायची.

टाटा स्टीलची स्थापना १९०७ ला झाली. भारतात रुळांची निर्मिती होऊच शकत नाही, अशी हेटाळणी त्या वेळच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. आठ हजार गुंतवणूकदारांकडून पैसा उभा करून टाटांनी टाटा स्टील सुरू केली. १९८४ ला जेआरडी टाटांनी रुसी मोदींकडे कंपनीची जबाबदारी सोपवली आणि रुसी मोदी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ही जबाबदारी सांभाळली. बिहारमध्ये त्या वेळेस माफियाराज असायचे आणि अशा परिस्थितीत रुसी मोदी यांनी कंपनीचे निर्धोक व्यवस्थापन केले. शेअर बाजार आणि टाटा स्टील हे नाते स्पष्ट करायचे तर त्यावर आणखी खूप लिहावे लागेल. मुंबई शेअर बाजार ९ जुलै १८७५ ला सुरू झाला आणि शेअर बाजाराचा निर्देशांक १९७८ / ७९ या वर्षात सुरू झाला. या मधल्या मोठ्या कालावधीत निर्देशांकाची उणीव प्रथम टाटा डिफर्ड या शेअरने आणि नंतर टाटा स्टील या शेअरने भरून काढली. कंपनीने चढ-उतार पण खूप बघितले, परंतु बाजारातला टाटा स्टीलचा भागधारक टाटा उद्योग समूह आणि रुसी मोदी यांच्यावर पूर्ण भरोसा ठेवून वर्षानुवर्षे गुंतवणूकदार भागधारक म्हणून निर्धास्त राहत होता. वर्षानुवर्षे पोलाद, सिमेंट यांच्यावर असलेले किमतीचे नियंत्रण काढून टाका ही मागणी व्हायची, परंतु दुर्दैवाने मागणी मान्य होण्यासाठी फार वर्षे निघून गेली.

फक्त ५० रुपये पगारावर लागलेले रुसी मोदी हळूहळू वेगवेगळी खाती सांभाळून प्रगती करीत राहिले आणि एक दिवस कंपनीचे अध्यक्ष झाले. कामगार व्यवस्थापन हा त्यांचा आवडीचा विषय होता. कामगार व्यवस्थापन करीत असताना कंपनीच्या अध्यक्षपदावर पोहचणे असे उदाहरण दुर्मीळच. शेवटपर्यंत या माणसाने आपला खट्याळपणा कायम ठेवला. मुंबईला रस्त्यावर गाडी उभी केली होती. पोलिसाने खवचटपणे विचारले, तुमच्या बापाचा रस्ता आहे का? दुसरा एखादा माणूस असता तर बाप काढला म्हणून पोलिसांशी भांडला असता. पण रुसी मोदी यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले – माझ्या बापाचाच रस्ता आहे आणि त्यांनी पोलिसाला मोदी स्ट्रीट हा बोर्ड दाखवला.

– प्रमोद पुराणिक

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian modi industry group company tata steel career print eco news amy