तृप्ती राणे
मागील लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे या वर्षी आपण सुबत्तेचा ध्यास घेऊन आपला आर्थिक आराखडा मांडणार आहोत. तर हा आराखडा मांडताना काही महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करूया. परताव्यांकडे तर आपण सगळेच बघत असतो. आणि जोवर बाजार वर, तोवर आपण खूश. पण ज्या वेळी आला दिवस परतावे खाली येताना दिसतात, किंवा पोर्टफोलिओची कामगिरी साजेशी वाटत नाही, तेव्हा मात्र मन चुकचुकतं. कधी कधी तर सगळं छान चाललेलं असतं, परंतु अचानक अशा काही घटना घडतात ज्यांनी सगळी आर्थिक घडी विस्कटते. आणि अशा वेळी जर आपण थोडा अभ्यास करून आपला आर्थिक आढावा घेतला तर कळतं की, कुठेतरी जोखीम व्यवस्थापन कमी पडलं. सोप्या शब्दात म्हणायचं तर फायद्याकडे लक्ष देताना तोटा कुठं-कसा-किती होईल याकडे दुर्लक्ष किंवा कमी लक्ष दिलं गेलं. अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा सगळं सहन करून पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटली तर ते सोप्पं नक्कीच नाही. म्हणून योग्यरीत्या जमेल तितक्या चांगल्या पद्धतीने जोखीम व्यवस्थापन हे प्रत्येक गुंतवणूकदाराने करायलाच हवं.
जोखीम व्यवस्थापन हा पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मी मानते. इथे मी क्रिकेट या खेळाचं उदाहरण घेते. खेळायला जायच्या आधी फलंदाज हा सर्वात पाहिलं कोणतं काम करतो? तर स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घेतो. आपले पॅड, गार्डस, हेल्मेट हे घातल्याशिवाय कधीच खेळायला जात नाही. फलंदाज जेव्हा स्वतःच्या सुरक्षिततेच्या बाबतीत निर्धास्त होतो तेव्हा तो गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने सामोरं जातो. हीच गोष्ट बाकीच्या खेळांमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तेव्हा कुठलीही कामगिरी फत्ते करायची म्हटली तर सर्वात पहिली गरज असते ती जोखीम समजून घेऊन, त्यानुसार साजेसं सुरक्षा कवच नेहमीच बाळगणं. आणि गरजेनुसार ते कमी – जास्त करणं. अर्थातच याचा खर्च हा होणारच. परंतु योग्य वेळी मिळालेली सुरक्षा ही मोठ्या परताव्यापेक्षासुद्धा जास्त सरस ठरते.
पहिले कवच विम्याचे
गुंतवणुकीच्या प्रवासात वेगवेगळे टप्पे असतात. आणि प्रत्येक टप्प्याला लागणारं सुरक्षा कवच हे वेगळं असतं. गुंतवणूक सुरू करायच्या आधी, म्हणजेच साधारणपणे वयाच्या २५-३० या कालावधीमध्ये गरज असते ती मुदत विमा, आरोग्य विमा, अपघात विमा यांची. कारण सोपं आहे – जर कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला आजार, अपंगत्व किंवा अवेळी मृत्यू आला तर कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचं काम या प्रकारच्या विमा पॉलिसी करतात. कोणताही विमा हा प्रत्येक वेळी पुरेसा आहे की नाही हे तपासावं लागतं. पुढे वयाच्या ३५-५५ च्या काळात गरज वाढली की विमा वाढवला तर तो योग्यरीत्या नुकसानभरपाई करू शकतो. परंतु हे सर्व करताना प्रीमियमकडेसुद्धा लक्ष द्यावं. मुदत विमा हा वयानुसार महाग होत जातो. शिवाय मिळकत नसेल तर तो मिळतसुद्धा नाही. किंवा काही ठिकाणी तर शिक्षणाचीसुद्धा अट ठेवली जाताना दिसते. बरं, विमा निवडताना त्याच्याबरोबर अनेक पर्याय सुचविले जातात. परंतु विमा घेणाऱ्याने दोन प्रश्नांचं समाधानकारक उत्तर विमा घ्यायच्या आधी मिळवावं – विम्याचे पैसे कोणकोणत्या परिस्थितीत मिळणार आणि अतिरिक्त गोष्टींमधून नक्की काय फायदा आणि किती खर्च असणार.
तिन्ही प्रकारच्या विम्यामध्ये कधी कधी गफलत होते. उदाहरण म्हणजे मुदत विम्याबरोबर मिळणारं अपघात कवच (ॲक्सिडेंट राइडर). हे अपघात कवच हे अपघात विम्याचं काम नाही करू शकत. कारण त्यात फक्त अपघाती मृत्यू झाल्यास पैसे मिळतात. परंतु अपघात विम्यामध्ये अपंगत्व आणि त्यामुळे कमी किंवा बंद होणारी मिळकत याचीसुद्धा सोय करता येते.
या शिवाय इतर प्रकारच्या विमा पॉलिसीसुद्धा आहेत – प्रवास, गृह, अग्नी, फिडेलिटी, कीमॅन इत्यादी. आपापल्या गरजेनुसार प्रत्येकाने हे तपासून मग योग्य ती पॉलिसी घेणं आहे. जरी प्रीमियम भरावं लागलं तरीसुद्धा त्यातून मिळणारी नुकसानभरपाई ही जास्त महत्वाची आहे.
आपत्कालीन निधीची तरतूद
सगळ्याच प्रकारच्या जोखमीसाठी काही विमा घेता येत नाही. त्यासाठी पैसे बाजूला करून ठेवावेच लागतात. यात समावेश असतो तो आपत्कालीन निधीचा. जेवढी मिळकत अशाश्वत, जेवढे जास्त अवलंबत्व तेवढा जास्त आपत्कालीन निधी असावा लागतो. तेव्हा सर्वात प्रथम याची तरतूद प्रत्येक कमावत्या व्यक्तीने केलीच पाहिजे. हल्लीच्या काळात वरिष्ठ नागरिकांसाठी साधारणपणे वयाच्या ६५ वर्षांनंतर आरोग्य विम्याच्या प्रीमियमचा खर्च खूपच वाढायला लागला आहे. मग अशा वेळी आरोग्याशी निगडित खर्चाच्या तरतुदीसाठी एक साजेशी रक्कम बाजूला ठेवणं हे जास्त सोयीचं होतं. अर्थात यालासुद्धा मर्यादा आहेत. परंतु काही नसण्यापेक्षा थोडं असणं हे महत्त्वाचं.
जोखीम व्यवस्थापनामध्ये परतावेसुद्धा सुरक्षित करावे लागतात. म्हणजेच काय तर योग्य वेळी फायदे काढून घेणं, जी गुंतवणूक महाग झाली आहे असं वाटतंय तिच्यातून बाहेर पडून, पुन्हा गुंतवणुकीची संधी कधी मिळेल यावर लक्ष ठेवणं, कधी-कुठे-किती जोखीम घ्यायची याचा वेळोवेळी आढावा घेणं – हे सर्व आपल्या पोर्टफोलिओला चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी महत्त्वाचं आहे. निवृत्तीनंतरच्या पोर्टफोलिओ आणि मासिक मिळकतीची तरतूद करताना तर जोखीम व्यवस्थापन खूपच महत्त्वाचं होतं. एका बाजूला वाढतं आयुर्मान, महागाई, आधुनिक जीवनशैलीचे खर्च तर दुसऱ्या बाजूला कमी होणारे व्याजदर यामुळे तर पैसे पुरतील की नाही हा प्रश्न अनेकांना पडायला लागला आहे.
आपल्याकडे एक म्हण आहे – आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! एकीकडे आपण गुंतवणूक करतोय आणि दुसरीकडे नुकसान सहन करतोय. या सर्वातून घ्यायचा बोध म्हणजे – नुकसान कमी ठेवून, नियमित गुंतवणूक करून, पोर्टफोलिओवर लक्ष ठेवून आणि संधीचा योग्य फायदा करून घेता आला तर सुबत्ता ही आपोआप येईल.
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com