चंद्रु तेथ चंद्रिका | शंभु तेथ अंबिका |

संत तेथ विवेका | असणें कीं जी ||

रावो तेथ कटक | सौजन्य तेथ सोइरिक |

वन्हि तेथ दाहक | सामर्थ्यता ||

दया तेथ धर्मु | धर्मु तेथ सुखागमु |

सुखीं पुरुषोत्तमु | असे जैसा ||

वसंतु तेथ वनें | वनें तेथ सुमनें |

सुमनिं पालेगनें | सारंगांचि ||

गुरु तेथ ज्ञान | ज्ञानिं आत्मदर्शन l

दर्शनीं समाधान | आथि जैसें ||

माउली (ज्ञानेश्वर महाराज) हे एक कवीदेखील होते. संस्कृतमधील गीता मराठीत आणताना त्यांनी एकाहून एक सरस दृष्टांताच्या रूपाने तत्त्वज्ञान समजावले. गीतेतील १८ व्या अध्यायातील, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम या श्लोकावर भाष्य करताना माउलींनी वरील दृष्टांत दिले आहेत. चंद्र आणि चांदणे, शंकर आणि पार्वती, संत आणि विवेक, राजा आणि सैन्य, दया आणि धर्म अशा गोष्टी जोडीने येतात. याप्रमाणे कोणत्याही बाजारात वस्तूचे भाव कमी-अधिक होतात, तसे भांडवली बाजारातदेखील कंपन्यांच्या समभागांच्या किमती कमी-जास्त होतात आणि त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. ज्यांची ओळख ‘फादर ऑफ व्हॅल्यू इंव्हेस्टमेंट’ अशी आहे ते बेंजामिन ग्रॅहम यांच्या एका वाक्याची आठवण करून द्यावीशी वाटते. जेव्हा किमतीतील चढ-उतारांचा खऱ्या गुंतवणूकदारासाठी एकच महत्त्वाचा अर्थ असतो. जेव्हा किमती झपाट्याने कमी होतात तेव्हा ते त्याला हुशारीने खरेदी करण्याची आणि जेव्हा ते मोठ्या प्रमाणात वाढतात तेव्हा हुशारीने विकण्याची संधी देतात. मागील २५ वर्षांतील कॅलेंडर परतावा सोबतच्या आलेखात दाखविला आहे.

सध्या सुरू असलेल्या बाजारातील मोठ्या घसरणीमुळे स्मॉलकॅप म्युच्युअल फंड सर्वाधिक बाधित झाले असून सर्वाधिक निव्वळ मालमत्ता मूल्यांमध्ये (एनएव्ही) घसरण दिसून आली आहे.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपलेल्या एका वर्षाच्या स्मॉलकॅप एसआयपीने -३०.६७ ते -११.५५ टक्के तोटा नोंदला आहे. तर लार्जकॅप, मिडकॅप आणि फ्लेक्सीकॅप फंड श्रेणींनी अनुक्रमे -५.३४ ते -२५.५१ टक्के, -११.९९ ते २९.६७ टक्के तोट्याची नोंद केली आहे. या अस्थिरतेने सर्व फंड गटातील नवीन गुंतवणूकदारांची झोप उडविली आहे. ज्यामुळे जानेवारी महिन्याच्या म्युच्युअल फंड आकडेवारीनुसार ‘एसआयपी’ बंद करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसले. ‘एसआयपी’ बंद करण्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे बंद करणाऱ्यांच्या आर्थिक नियोजनात व्यत्यय येण्याची शक्यता असून त्यांची दीर्घकालीन उद्दिष्टांना बाधा पोहोचू शकते. यासाठी वैयक्तिक गुंतवणूकदारांनी आपल्या जोखीम सहिष्णुतेला साजेशी गुंतवणूक करणे आवश्यक आहेत.

स्मॉलकॅप फंड हे उच्च-जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आहेत, ज्यांना दीर्घकाळ संपत्ती निर्माण करायची आहे आणि ते प्रामुख्याने स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. स्मॉलकॅप कंपन्या ‘बिझनेस लाइफ सायकल’च्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात. उच्च वाढीची क्षमता असणाऱ्या परंतु अस्थिर असतात. स्मॉलकॅप कंपन्या, लार्जकॅप किंवा मिडकॅप कंपन्यांच्या तुलनेत अधिक जोखमीच्या असतात. बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेला घाबरून ‘एसआयपी’ थांबवल्याने तुमचे दीर्घकालीन आर्थिक नियोजनात व्यत्यय येतो. गुंतवणुक तशीच ठेवून ‘एसआयपी’ बंद न करता तुम्ही बाजारातील वेळ आणि भावनिक निर्णय घेण्यापासून स्वत:ला रोखण्यासाठी तुमच्या वितरकाशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे. वित्तीय शिस्तीचे बक्षीस तीन ते पाच वर्षात नक्की मिळेल.

सोबतचा आलेख असे दर्शवितो की, बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेकडे दुर्लक्ष केल्यास बाजार जेव्हा नवीन शिखर तयार करेल तेव्हा तुमच्या ‘एसआयपी’वर लक्षणीय वाढीव परतावा मिळेल. विशेष म्हणजे, वर्ष २००८ मध्ये बाजार तत्कालीन शिखरावर असताना सुरू झालेल्या १० वर्षांच्या ‘एसआयपी’ने मार्च २००९ मध्ये भरघोस परतावा मिळविला, याचे कारण म्हणजे २००९ मध्ये निर्देशांकाची उसळी वेगवान आणि मोठी होती. तेव्हा सध्याच्या घसरणीत टिकून राहण्याचे धारिष्ट्य नक्कीच मोठा फायदा देईल. लेखाची सुरुवात माउलींच्या ओवीने केल्यावर शेवट तुकाराम महाराजांच्या अभंगाने करतो.

महापूरे झाडे जाती ! तिथे लव्हाळे वाचती !!

नम्रपणे मोठ्या संकटालासुद्धा सामोरे जाता येते. मंदीच्या संकटातदेखील ‘एसआयपी’ बंद न करता सामोरे जाऊया हे आजचे सांगणे होय.

Story img Loader