कौस्तुभ जोशी
भारतीय भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसाधारण सर्वच गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत एक प्रश्न नक्की निर्माण झाला असणार तो म्हणजे, मार्केटचे टायमिंग साधायचे कसे? पण बाजाराचे टायमिंग ओळखण्यापेक्षा बाजाराला ‘फॉलो करणे’ म्हणजेच बाजाराबरोबर जाणे हा गुंतवणुकीचा खरा मार्ग असतो. पण गुंतवणूकदारांच्या मनात असे प्रश्न का येतात? काही निवडक कंपन्यांच्या शेअर्समध्ये काही वर्षांत भरमसाट वाढ झालेली दिसली किंवा एखाद्या क्षेत्रात (सेक्टर) तेजी आलेली दिसली की, गुंतवणूकदारांना आपणही या लाटेवर स्वार झालेलो असतो तर आपल्यालाही असेच लाभ पदरी पाडता आले असते अशी भावना निर्माण होते. हे यामागील महत्त्वाचे कारण आहे.
अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि उद्योगाचे चक्र
देशाच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावतील आणि अर्थव्यवस्था वाढत असताना आपोआपच वाढ होईल अशी काही हमखास लाभार्थी गुंतवणुकीची क्षेत्रे असतात. उदाहरण घ्यायचे झाले तर अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, वित्त क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र या क्षेत्रांमध्ये सतत काही ना काही नवसर्जन घडून येतच असते. व्यापारचक्र ही संकल्पना गुंतवणूकदारांनी समजून घ्यायला हवी. एखादी अर्थव्यवस्था वाढीला लागते किंवा एक दोन वर्षांच्या ‘बॅड पॅच’मधून पुन्हा आगेकूच करू लागते तेव्हा काही क्षेत्र यात आघाडीवर असतात. अर्थव्यवस्थेत तेजी यायला सुरुवात झाली तर उत्पादन वाढते, मागणी वाढते व याचा परिणाम थेट कंपन्यांच्या विक्रीत दिसून येतो आणि एकूणच गुंतवणुकीसाठी असलेली समाधानकारक चिन्हे बाजाराला नवी दिशा देणारी ठरतात. व्यापारचक्र खालच्या दिशेला झुकणारे असले तर अर्थव्यवस्थेत आणि बाजारामध्ये नकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. अत्यावश्यक क्षेत्र सोडता अन्य क्षेत्रांमध्ये भरघोस वाढ न झाल्याने बाजार बेतानेच परतावा देतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील एखाद्या घटनेचा परिणाम आपल्या देशातील एखाद्या क्षेत्रावर होतो, बदलत्या जागतिक अर्थकारणात असेही दिसून येते. एक उदाहरण समजून घेऊया, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलाद, तांबे, ॲल्युमिनियम अशा धातूंमध्ये जोरदार मागणी दिसून आली आणि नेमके त्याच वेळेला चीनसारख्या धातू उत्पादक देशांमध्ये उत्पादन कमी प्रमाणात झाले तर जागतिक बाजारात विक्रेत्यांची चलती होते आणि भारतातील धातू क्षेत्रातील कंपन्यांना वाजवून पैसे मिळतात व याच लाटेवर गुंतवणूकदार स्वार झाले तर दोन ते तीन वर्षांत प्रभावी परतावा मिळतो. पण यात एक धोका असाही आहे की, हे सुगीचे दिवस संपले की त्या शेअरची घोडदौड थांबते. म्हणजेच तो शेअर पडायला सुरुवात होते, त्याचा भाव सतत घसरणारच असतो का? असे अजिबात नाही. पण लाटेवर स्वार झाल्यावर जेवढे पैसे मिळतात तेवढे मात्र नक्की मिळणार नाहीत. दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. पहिल्या प्रकारातील गुंतवणूकदार योग्य वेळी त्या लाटेवर स्वार होतात व घसघशीत परतावा पदरात पाडून घेतात व दुसऱ्या प्रकारातील गुंतवणूकदार लाट सर्वोच्च पातळीवर असताना त्यात उतरतात व पुढील तीन ते पाच वर्षांत तसे परतावे न मिळाल्यामुळे शेअर बाजारापासून मनाने दूर जातात.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, विविध क्षेत्रीय निर्देशांकांची संख्या जवळपास २० आहे. निफ्टी ऑटो, बँक, एनर्जी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, वित्त संस्था, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, रिअल्टी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस हे प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक आहेत. उदारीकरणाच्या वेळी म्हणजे, जेव्हा राष्ट्रीय शेअर बाजार अस्तित्वातच नव्हता त्यावेळी भांडवली बाजारात असणाऱ्या कंपन्यांची संख्याच एवढी मर्यादित होती ही सगळे लक्ष सेन्सेक्सकडे असायचे. जसजसा भांडवली बाजार विकसित होऊ लागला तसतसे विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी बाजारात पदार्पण केले आणि आज गुंतवणूकदारांपुढे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी थोडीशी गुंतवणूक अधिक जोखीम घेऊन एखाद्या क्षेत्रामध्ये गुंतवणे ही रणनीती एकवेळ मान्य होऊ शकते. मात्र, पोर्टफोलिओचा मोठा भाग एकाच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणे हा अवसान घातकी निर्णय ठरू शकतो. जे गुंतवणूकदार प्रत्यक्ष शेअर खरेदी करत नाहीत ते अधिक परताव्याच्या अपेक्षेने सेक्टोरल फंड योजनांमध्ये पैसे गुंतवतात.
गुंतवणूक आणि सेक्टोरल म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंडातील सेक्टर किंवा एका विशिष्ट ‘थीम’द्वारे गुंतवणूक करणाऱ्या योजना गुंतवणूकदार निवडताना दिसतात. आकर्षक परतावा कमी वेळेत मिळणे हाच यामागील एकमेव हेतू असतो. मात्र तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आपले पैसे गुंतवत आहात त्या क्षेत्रातील सध्याच्या आणि भविष्यातील परताव्याविषयी कोणीही ठोस खात्री देऊ शकत नाही.
फंड योजना ३ वर्षे ५ वर्षे १० वर्षे (टक्क्यांमध्ये)
डीएसपी नॅचरल रिसोर्स अँड न्यू एनर्जी फंड^ ३१% ११% १८ %
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड^ ३७% १५ % १६ %
एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड^ ३१ % १३ % १३ %
निप्पॉन इंडिया फार्मा फंड^ १६ % १६ % १५ %
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एफएमसीजी फंड^ २३ % १४ % १४ %
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस फंड^
२८ % ९% १५ %
एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड^ ३१ % १९ % १९ %
एसबीआय ब्लू चिप फंड@ २५% १२ % १५ %
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड@ ३२% १४ % १६ %
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड@ ३३% १५ % २१ %
^ या फंड योजना एका विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या आहेत.
@ या फंड योजना मोठ्या मध्यम आणि लहान कंपन्यात गुंतवणूक करतात.
१४ जून २०२३ च्या एनएव्हीनुसार वार्षिक परतावा
तीन वर्षांत ज्या फंड योजनेने घसघशीत परतावा दिला आहे, त्याचाच पाच वर्षांचा परतावा असमाधानकारक असू शकतो. जसजसा कालावधी वाढत जातो तसतसा वार्षिक परतावा कमीच होत जातो. बऱ्याच वेळेला ॲबसल्युट रिटर्न (Absolute) आणि ॲन्युअलाइज रिटर्न (Annualize) यातील फरक न समजल्याने गुंतवणूकदारांना आपल्याला घसघशीत फायदा झाला आहे असे वाटते. मात्र असा विचार अर्थ निरक्षरतेचे लक्षण आहे.
मागच्या तीन-चार वर्षांत बँकिंग, पायाभूत सुविधा, औषधी निर्माण अशा एखाद्या क्षेत्रात घसघशीत नफा झाला आहे, म्हणून गुंतवणुकीतील मोठा भाग त्याच क्षेत्रात गुंतवणे हा अत्यंत धोकादायक निर्णय ठरू शकतो. याउलट लहान मोठ्या आणि मध्यम अशा सर्व आकारांच्या आणि सर्व क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक असणे केव्हाही कमी जोखमीचे ठरते. सेक्टरचा विचार करणे चुकीचे नाही, मात्र गुंतवणुकीवरील आकर्षक परताव्याच्या लोभी भावनेपोटी अशी गुंतवणूक करणे म्हणजे आपले कष्टाने कमावलेले पैसे धोक्यात घालण्यासारखे आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बाजारातील शेअरपैकी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या रकमेनुसार चांगल्या शेअरची खरेदी करणे हा उत्तम मार्ग आहे. जर नेमके कुठले क्षेत्र निवडावे? हे समजत नसेल तर निफ्टी एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ईटीएफ किंवा म्युच्युअल फंडाच्या निफ्टी किंवा सेन्सेक्स इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करणे हा शहाणपणाचा मार्ग आहे.
या लेखात ज्या फंड योजनांची नावे आली आहेत, ती फक्त उदाहरणादाखल देण्यात आली आहेत. गुंतवणूकदारांसाठी कोणत्याही प्रकारची शिफारस केलेली नाही. गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीनेच आपली गुंतवणूक करावी.