गेले वर्ष शेअर्सच्या ‘बायबॅक’चे वर्ष होते असे म्हटले तर चालेल. वर्षभरात पन्नासहून अधिक कंपन्यांनी रु. ३७५१९ कोटींच्या शेअर्सची पुनर्खरेदी म्हणजे गुंतवणूकदारांकडून ‘बायबॅक’ केले. एखादी ‘कंपनी’ बाजारातून स्वतःचेच शेअर्स परत विकत घेते, त्याला बायबॅक म्हणतात. टाटा कन्सल्टन्सी आणि बजाज ऑटो लि. नंतर, पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशनने शेअर रु. ८१० या कमाल किमतीसह रु.८५० कोटीचे खुल्या बाजारातील ‘बायबॅक’ची तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने देखील त्याचे ९,३०० कोटी रुपयांचे खुल्या बाजारातील बहुचर्चित बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. हा कल यंदाच्या वर्षी देखील सुरु आहे.
बायबॅक कधी केले जाते?
कंपनीच्या ताळेबंदात जास्त रोकड रक्कम असणे चांगले मानले जात नाही. कंपनी उद्दिष्टहीन आहे व भविष्यात व्यवसाय वाढवू इच्छित नाही असा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक जमा असलेल्या रक्कमेने कंपनी स्वतःचेच शेअर्स खरेदी करते म्हणजेच ‘बायबॅक’ करते. आपली रोख रक्कम शेअर्समध्ये रूपांतरित करते. कंपनी कधीही आपला बायबॅक बाजारात आणू शकते, यासाठी कोणतीही निश्चित वेळ किंवा कालावधी नाही.
आणखी वाचा: Money Mantra: प्राप्तीकर विवरणपत्र-७ कोणी भरणे अपेक्षित आहे?
बायबॅकच्या पद्धती
सूचिबद्ध कंपन्यांच्या बाबतीत, बायबॅकसाठी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात – १. निविदा (टेंडर) मार्ग जेथे कंपनीकडून ठरविक ‘निश्चित केलेल्या किंमतीला’ कंपनीच्या प्रस्तावास प्रतिसाद म्हणून भागधारक आपले शेअर्स थेट कंपनीला पुनर्विक्री करतो. जेणेकरून गुंतवणूकदार निश्चित करमुक्त भांडवली नफा मिळवू शकतात. २. खुली बाजार खरेदी मार्ग (ओपन मार्केट): या मार्गात कंपनी बायबॅकची घोषणा करून खुल्या बाजारातील स्वतःचे समभाग एका विशिष्ट किंमतीपेक्षा जास्त नसलेल्या दराने ‘स्वतःच’ प्रचलित बाजार किमतींवर (कॅपच्या अधीन) शेअर्स घेते. शेअर बाजार प्लॅटफॉर्मद्वारे अंमलात आणले जाणारे हे बायबॅक व्यवहार इतर कोणत्याही शेअर्स खरेदी-विक्री सारखेच बाजार व्यवहार असतात.
कंपनी किंवा गुंतवणूकदाराला फायदा काय?
बायबॅकमुळे कंपनी आणि गुंतवणूकदार दोघांनाही फायदा होतो. कंपनीच्या प्रवर्तकांना नियंत्रण आणि हिस्सा वाढवण्यास ते फायदेशीर ठरते. कंपनीकडून बायबॅक केल्यामुळे बाजारातील समभागांची संख्या कमी झाल्याने प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) वाढण्याची शक्यता असते, जे अर्थात समभागांचे ‘मूल्य’ वाढविण्यासही हातभार लावते. काही कंपन्याना कधीकधी असे वाटते की तिच्या शेअर्सची किंमत कमी (undervalued) आहे. त्यामुळे बायबॅकच्या माध्यमातून त्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. गुंतवणूकदारांसाठी सर्वथा फायदेशीर आहे. परंतु, अनेक वेळा कंपन्या जाणूनबुजून कमी किमतीत बायबॅक करतात, ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान होते. बायबॅकच्या निर्णयामुळे कंपनीच्या क्षमतेवर असलेल्या अंतर्निहित विश्वासाची पुष्टी होत असल्याने, शेअर बाजार सकारात्मक प्रतिसाद देतात. शेअर्सच्या किमती अल्पावधीत वाढतात. चांगल्या गुंतवणुकीच्या संधी नसतानाही भागधारकांचे मूल्य वाढवण्याचा विचार करून कंपनीकडे श्रीमंत कंपनी म्हणून पाहिले जाते. बायबॅकमुळे बाजारात उपलब्ध समभागांची संख्या कमी होत असल्याने प्रति शेअर कमाई (EPS) सारख्या लोकप्रिय गुंतवणूकदारांच्या मेट्रिक्सला देखील ते चालना देते.
करदायित्व
अ. कंपनी: कलम ११५क्यूए अंतर्गत बायबॅक करणाऱ्या कंपनीला २०% प्राप्तिकर त्यावर १२% अधिभार व ४% शिक्षण व आरोग्य उपकर असा २३.२९६% दराने बाय-बॅकसाठी प्राप्तिकर भरावा लागेल. प्राप्तिकर नियम ४०बीबी अंतर्गत विहित केलेल्या रीतीने निर्धारित केलेल्या अशा समभागांच्या बायबॅकवर कंपनीने भागाधारकास दिलेल्या किंमतीतून इश्यू किंमत वजा करून राहिलेल्या रक्कमेवर प्राप्तिकर भरावा लागेल. उदाहरणार्थ: एका कंपनीला दहा हजार शेअर्स प्रति शेअर सोळाशे रुपये बाजारभावाने पुन्हा खरेदी करायचे आहेत. इश्यूची किंमत प्रति शेअर रु.शंभर होती. सबब दीड कोटी रुपयांच्या उत्पन्नावर कंपनीला २२.२९६ % प्राप्तिकर भरावा लागेल.
ब. भागधारक: बायबॅक कर कंपनीच्या स्तरावर लावला जातो, प्राप्तीकर कायद्याच्या कलम १०(३४ए) नुसार, भागधारकांच्या हाती मिळणारे परिणामी उत्पन्न पूर्णतः करमुक्त आहे. वरील उदाहरणातील बायबॅकमधून मिळणारे रु. दीड कोटी उत्पन्न करमुक्त राहील. त्यामुळे गुंतवणूकदार निविदा मार्गातून अधिक फायदा मिळवू शकतात. जेथे कंपनी प्रचलित बाजार किमतींवर (कॅपच्या अधीन) खुल्या बाजारातील शेअर्स घेते, तेथे खुल्या बाजाराच्या मार्गाखाली समस्या उद्भवते,. शेअर्स विकणाऱ्याला कोण खरेदीदार आहे याची कल्पना नसते, मग ती त्याचे शेअर्स परत विकत घेत असलेली कंपनी असो किंवा इतर गुंतवणूकदार असो. त्यामुळे जरी कंपनीने परत विकत घेतलेल्या शेअर्सवर बायबॅक कर भरला असला तरी शेअर्स विकणारा त्याच्या शेअर्सच्या विक्रीवर अज्ञानाने अल्पकालीन किंवा दीर्घकालीन नफ्यावर प्राप्तिकर भरत राहतो, ही या मार्गाची मर्यादा आहे. शेअर बाजार ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे अंमलात आणले जाणारे हे बायबॅक इतर कोणत्याही बाजार व्यवहारासारखेच असतात, सबब ज्या शेअर दलालामार्फत अशी विक्री होत असेल अशी शेअर्सची विक्री दलालाने चिन्हांकित केल्यास सदर बायबॅक विक्रीचा फायदा गुंतवणूकदारास करमुक्त नफा दर्शवून घेता येईल यासाठी नियोजन आवश्यक आहे.