जानेवारी २०१४ पासून ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ ही शिफारसप्राप्त म्युच्युअल फंडांची यादी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. मागील दहा वर्षांत फंडांची मानदंड सापेक्ष कामगिरी आणि अस्थिरता (प्रमाणित विचलन) या दोन निकषांना फंड निवडीत प्राधान्य दिले. फंडांच्या रणनीतीत वेळोवेळी झालेले बदल आणि कामगिरीतील सातत्य हेसुद्धा विचारत घेतले जातात. या यादीत पंचतारांकित फंड नसतील. कारण फंडाचे तारांकन गत कामगिरीवर ठरते. हे फंड पंचतारांकित नसले तरी या फंडांनी कामगिरीत सातत्य राखलेले आढळेल. वाचकांना या यादीत बहुसंख्य फंड तीन किंवा चार तारांकन असलेले आढळतील. सामान्यपणे असे दिसते की, कामगिरी खालावते त्यावेळी निधी व्यवस्थापक कामगिरी सुधारण्यासाठी अतिरिक्त जोखीम घेऊन परतावा वाढवत असतात. म्हणूनच अशा फंडांची निवड मुद्दामहून टाळली आहे. विशेष प्रसंगी एखादा फंड वगळण्यापूर्वी किंवा एखाद्या फंडाचा समावेश करण्यापूर्वी त्या फंडाकडून झालेल्या कंपन्यांच्या निवड पद्धतीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी निधी व्यवस्थापकाशी चर्चा केली जाते. बहुतेक निर्णय हे पोर्टफोलिओचे दीर्घकालीन स्वरूप आणि रचना लक्षात घेऊन होतात आणि त्यायोगे फंड वगळले जातात किंवा नवीन फंडाचा समावेश केला जातो.
सरलेले वर्ष नि:संशय स्मॉल कॅपचे वर्ष होते. लार्ज कॅपच्या तेजीला २०२२ च्या जुलै-ऑगस्टपासून सुरुवात झाली. परंतु वर्षाच्या सुरुवातीपासूनच स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये तेजी सुरू झाली आणि वर्षअखेरपर्यंत या तेजीची व्याप्ती वाढली. ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंडांच्या यादीत लार्ज-कॅप, फ्लेक्सी-कॅप, व्हॅल्यू/कॉन्ट्रा, मल्टीकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप आणि फोकस्ड इक्विटी फंड गटातील शिफारशींचा समावेश असतो. त्रैमासिक आढावा घेताना शक्य तितके कमीत कमी बदल करण्याचा प्रयत्न असतो. कारण फंडाच्या शिफारशी स्थिर आणि दीर्घकालीन कामगिरीवर निवड करून झालेल्या आहेत. फंड रणनीतीत वैविध्य आणण्यासाठी, विशेषत: साहसी फंडांसह काही उच्च-परताव्याचे पर्याय समाविष्ट करण्यासाठी. बाजाराने ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये विस्तृत तेजी अनुभवली. याआधी निर्देशांक वर जात होता, परंतु तेजी निवडक समभागांत दिसत होती. साहजिकच निवडक लार्ज-कॅप केंद्रित फंड ‘निफ्टी १००’ पेक्षा अधिक परतावा मिळविण्यात यशस्वी ठरले. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत तेजी सर्वव्यापी झाल्याने मागील तिमाहीच्या तुलनेत अधिक लार्ज-कॅप फंडांनी ‘निफ्टी १००’ च्या तुलनेत जास्त परतावा मिळविला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत सरलेल्या तिमाहीतील कामगिरीमुळे अधिक लार्जकॅप फंडांचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. गुंतवणुकीत सक्रिय लार्ज-कॅप फंडांचा वाटा वाढविण्याची ही योग्य वेळ आहे.आजपासून सुरू झालेली तिमाही ही मतदानपूर्व तिमाहीदेखील असल्याने लार्ज-कॅप केंद्रित फंड गटात अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाटते. सरलेले वर्ष व्हॅल्यू/कॉन्ट्रा फंड गटासाठी तुलनेने चांगल्या परताव्याचे वर्ष होते. कर्त्यांच्या यादीत ‘व्हॅल्यू ओरिएंटेड’ फंड’ आहेत आणि या फंडांनी मोठा परतावा दिला आहे. मिरॅ ॲसेट लार्ज कॅप या एक मोठी मालमत्ता असलेल्या फंडाची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. मागील त्रैमासिक आढाव्यात या फंडाच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली होती. हा फंड ‘कर्त्यां’च्या यादीतून वगळल्यास यादीतील फंडांची सरासरी वार्षिक परतावा कामगिरी २८.९६ टक्के आहे. अलीकडे मिरॅ ॲसेट लार्जकॅप फंडाची कामगिरी दिवसेंदिवस खालावत असल्याचे दिसते. या फंडाची कामगिरी इतिहासात भक्कम असली तरी ती अलीकडे गचाळ बनली आहे. हा एक लार्ज-कॅप फंड आहे या फंडाच्या विद्यमान गुंतवणुकदारांनी कामगिरीवर बारीक नजर ठेवावी. भविष्यात कामगिरी खालावत गेल्यास त्या’ला ‘कर्त्यां’च्या यादीतून वगळण्यात येईल.
हेही वाचा – सतर्क रहा…! तक्रारीचे ऑनलाइन निवारण
हेही वाचा – भारतीय शेअर मार्केटने गाठला चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा
कर्त्यांच्या या यादीत मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे सरासरीपेक्षा जास्त प्रमाण असलेले फंड आहेत. अशा फंडांचा विविध फंड गटात समावेश आहे. लार्ज-कॅपव्यतिरिक्त, अन्य फंड गटात या फंडांचा समावेश आहे. या यादीत केवळ स्मॉल-कॅप किंवा मिड-कॅपमध्येच गुंतवणूक करणारे फंड नाहीत. ज्यांचे ‘प्रमाणित विचलन’ जास्त आहे असे फंड अस्थिर समजले जातात. अशा फंडांचा समावेश यादीत टाळण्याचे आजपर्यंत धोरण होते. जोखीमांक जास्त असलेल्या गुंतवणूकदारांनी थेट स्मॉल-कॅपमध्ये गुंतवणूक न करता ज्या फंडात स्मॉल कॅपचे प्रमाण अधिक आहे अशा फंडांच्या माध्यमातून स्मॉल कॅप गुंतवणुकीचा लाभ घ्यावा अशी भूमिका होती. परंतु असे फंड आणि स्मॉल कॅप फंड यांच्यातील परताव्याची दरी वाढत असल्याने ज्यांनी स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक केली त्यांना याचा फायदा झाला. एक विश्लेषक या नात्याने ‘कर्त्यां’च्या २०२३ मधील कामगिरीबाबत समाधानाची भावना नाही. याचे कारण बहुसंख्य फंडांनी ‘निफ्टी ५००’ सापेक्ष चांगली कामगिरी केली तरी ‘निफ्टी २५०’ आणि ‘निफ्टी १००’ सापेक्ष कामगिरी समाधानकारक नाही. तथापि, वर्षभरात ज्या १७ फंडांची शिफारस केली ते फंड ‘टॉप’ आणि ‘अप्पर मिडल क्वारटाइल’ मध्ये स्थान मिळविलेले आहेत ही समाधानाची बाब आहे. या ‘कर्त्यां’ फंडांना अधिक वाचकाभिमुख करण्यासाठी नवीन वर्षात वाचकांच्या पसंतीच्या फंडांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न असेल. या पाक्षिक सदरातून वर्षभरात १६ ते १७ फंडांचे विश्लेषण प्रसिद्ध होते. यापैकी १० ते १२ फंड वाचक पसंतीचे असतील. तेव्हा संगणकाच्या पडद्यावर कळ फलकाच्या मदतीने तुमच्या पसंतीच्या किंवा चिंतेच्या फंडाबद्दल कळवा. अधिकाधिक ईमेल संदेशाद्वारे वाचकांकडून सुचविल्या गेलेल्या फंडांचे विश्लेषण प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. तरच खऱ्या अर्थाने ‘विचारल्याविण हेतू कळावा, तुमचा माझा स्नेह जुळावा हाती हात धरावे’ अशी परिस्थिती निर्माण होईल.