इन्फ्रास्ट्रक्चर फंड गेल्या काही महिन्यांपासून नकारात्मक परतावा देत आहेत, मी गेल्या दोन वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चर प्रकारच्या फंड योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतो आहे. ती गुंतवणूक बंद करावी का ? -सुधीर म्हात्रे
-इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्युच्युअल फंडातील सेक्टरल किंवा थिमॅटिक या प्रकारात मोडतात. म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये या फंड योजना पैसे गुंतवतात. बांधकाम, ऊर्जा निर्मिती, पेट्रोलियम रिफायनरी, अवजड उद्योग, वित्त संस्था, ग्राहकपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्या यांचा समावेश अशा फंड योजनांच्या पोर्टफोलिओमध्ये असतो.
मुळातच सेक्टर फंड किंवा थिमॅटिक फंड यामध्ये गुंतवणूक एकूण पोर्टफोलिओच्या दहा ते पंधरा टक्के नसावी. या फंड योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे, जेव्हा ते क्षेत्र जोमदारपणे चालू लागते तेव्हा हे फंड निर्देशांक निफ्टी किंवा सेन्सेक्सला मागे टाकतील असा परतावा देतात. याउलट एकदा त्या थीममधील हवा निघून गेली की, या फंडांचा परतावा नकारात्मक होतो. ज्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने पाच वर्षांत सीएजीआर १३ टक्के परतावा दिला असेल त्याच फंडाचा मागच्या सहा महिन्यांतील परतावा १५ टक्केसुद्धा असू शकतो.
तुमचे गुंतवणुकीचे ध्येय नेमके किती वर्षांचे आहे? हे प्रश्नात स्पष्ट न झाल्यामुळे दोन्ही भूमिका स्पष्ट करतो. जर तुम्हाला सात ते दहा वर्षांचा विचार करून ही गुंतवणूक ठेवायची असेल तर आता एसआयपी बंद करणे हितावह नसेल. एसआयपी या व्यवस्थेचा अर्थच बाजाराच्या सर्व पातळ्यांवर म्हणजे प्रत्येक बाजार परिस्थितीमध्ये आपण सतत खरेदी करत राहणे हा आहे.
जेव्हा तुम्ही कमी एनएव्ही असताना गुंतवणूक करत असता त्यावेळी तुम्हाला अधिक युनिट मिळतात, हे तत्त्व इन्फ्रास्ट्रक्चर फंडाच्या बाबतीतही लागू पडते. त्यामुळे जेव्हा हे फंड तेजीत येतील त्यावेळी तुम्हाला पुन्हा गमावलेला परतावा पुन्हा मिळाल्याचा अनुभव येईल. मात्र दोन ते तीन वर्षांसाठी तुम्हीही गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तो विचारच मुळात चुकलेला आहे. रिस्कोमीटरचा विचार करायचा झाल्यास इन्फ्रास्ट्रक्चर प्रकारातील फंड योजना ‘व्हेरी हाय रिस्क’ या प्रकारात मोडतात. म्हणजेच अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी किमान पाच वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांसाठी नियोजन केले पाहिजे.
बॅलन्स ॲडव्हांटेज फंड आणि हायब्रिड फंड एकच असतो का? – गणेश कीर
म्युच्युअल फंड योजना कोणत्या प्रकारे गुंतवणूक करतात, यावर त्याचा प्रकार ठरतो. म्हणजेच पोर्टफोलिओमध्ये फक्त समभाग संलग्न अर्थात इक्विटी असेल तर तो इक्विटी फंड म्हणून ओळखला जातो व इक्विटी आणि रोखे संलग्न म्हणजेच डेट इन्स्ट्रुमेंट यांच्या एकत्रित गुंतवणुकीचा समावेश असलेला फंड हायब्रिड फंड म्हणून ओळखला जातो. मात्र सगळे हायब्रिड फंड एकच नसतात. बॅलन्स ॲडव्हांटेज फंड आणि अग्रेसिव्ह हायब्रिड फंड हे दोन्ही हायब्रिड फंड असले तरीही बॅलन्स ॲडव्हांटेज फंडातील गुंतवणुकीचे गणित वेगळे असते.
बाजाराची परिस्थिती जशी असेल त्यानुसार इक्विटी गुंतवणूक कमी करून रोखे योजनांमधील गुंतवणूक वाढवावी व जशी परिस्थिती सुधारेल तशी पुन्हा एकदा इक्विटी योजनांमधील गुंतवणूक वाढवावी, असे यात अभिप्रेत असते.
बॅलन्स ॲडव्हांटेज फंड योजनांमध्ये या प्रकारची गुंतवणूक ३५ टक्क्यांवर रोखली जाते म्हणजेच त्यापेक्षा जास्त गुंतवणूक रोख्यांमध्ये केली जात नाही.
इक्विटी शेअरमधील गुंतवणूक ६५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ठेवली जाते यामुळे इक्विटी टॅक्सेशनचे नियम या फंड योजनांना लागू होतात.
‘कमी किंमत असताना विकत घ्या आणि किंमत वाढली की विका’ या तत्त्वाचा वापर करून गुंतवणूकविषयक निर्णय घेतले जातात. हायब्रिड प्रकारच्या योजना या सर्वसाधारणपणे जास्त जोखीम घेण्याची इच्छा नसणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या ठरतात.