शेअर बाजारातील तीव्र घसरण ही नेहमीच निर्देशांकांच्या इतिहासाचा एक भाग राहिले आहेत. या मोठ्या घसरणीदरम्यान बाजारातील कंपन्यांचे कोट्यवधींचे बाजार भांडवल काही तासांत लक्षणीय कमी होते. देशांतर्गत शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण ही अर्थव्यवस्थेसाठी धक्का देणारी ठरू शकते. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. शिवाय बाजारात अनिश्चितता आणि अस्थिरतेची भावना निर्माण होते.
करोना महासाथीमुळे देशातील शेअर बाजार आजवरच्या सर्वात मोठ्या घसरणीला सामोरा गेला. अवघ्या एका आठवड्यात सेन्सेक्स १३,९८५ अंकांनी घसरला. २३ मार्च २०२० रोजी, सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांची एकाच दिवसातील सर्वात मोठी घसरण अनुभवली. एकाच आठवड्यात १३ टक्क्यांहून अधिक घसरणीसह भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल १३.९५ लाख कोटी रुपयांनी घसरले. ही घसरण इतकी तीव्र होती की, सेन्सेक्समध्ये १० टक्के घसरण झाल्याने सत्रात अवघ्या ४५ मिनिटांच्या कारभारात व्यवहार थांबवावे लागले. अवघ्या दहा दिवसांत दोनदा घडलेली दुर्मीळ घटना होती. जागतिक आर्थिक मंदी आणि देशव्यापी टाळेबंदीमुळे भीती, अनिश्चितता आणि घबराट निर्माण झाली. अशीच घसरण वर्ष २०१६ मध्ये ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन चलनातील पाचशे आणि एका हजार रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण केले आणि अवघ्या चार सत्रांत ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’मध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने, गुंतवणूकदारांना फटका बसला.
वर्ष २०१५ मध्ये चीनने केलेल्या युआनचे अवमूल्यन आणि ‘ब्रेक्सिट’नंतर बाजारात तीव्र घसरण झाली. वर्ष २०१५ ते २०१६ हा काळ भारतीय शेअर बाजारासाठी आव्हानात्मक होता. फेब्रुवारी २०१६ पर्यंत, सेन्सेक्समागील अकरा महिन्यांच्या तुलनेत २५ टक्क्यांहून अधिक घसरला होता. बँकांच्या वाढत्या अनुत्पादित मालमत्ता आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मागणीचा अभाव या घसरणीला कारण ठरला. या ठळक घसरणींव्यतिरिक्त वेळोवेळी खनिज तेलाच्या घसरलेल्या किमती आणि ग्रीसची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज फेडण्यात झालेली दिरंगाई यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये लक्षणीय घट झाली. त्याचा जागतिक गुंतवणुकीसह गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. मागील ३२ वर्षांत (हर्षद मेहता घोटाळ्यापासून) गुंतवणूकदारांनी लहान मोठ्या घसरणी अनुभवल्या आहेत. या घसरणीपश्चात वेळोवेळी गुंतवणूकदारांनी मालमत्ता वर्ग बदलण्याचे आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये विविधता आणण्याचे (उदाहरणार्थ भारतीय गुंतवणूकदारांनी अमेरिकेत गुंतवणूक करण्याचे) महत्त्व अधोरेखित केले. सर्वसाधारणपणे खरेदी-विक्रीच्या चुकीच्या पद्धतीमुळे, शेअरच्या चढ-उतारामुळे मालमत्तांच्या किमतींवर कसा परिणाम होतो, हे गुंतवणूकदारांना समजत नसेल तर ते थोडेफार पैसे गमावू शकतात. सोप्या अर्थाने, गुंतवणूकदार एका विशिष्ट किंमतीला म्युच्युअल फंड युनिट खरेदी करतात आणि नंतर भांडवली नफा मिळविण्यासाठी युनिट विकू शकतात. तथापि, बाजारात भीती आणि मोह या दोन भावनांवर जर गुंतवणूकदाराने नियंत्रण ठेवले, तर शेअर बाजारातील गुंतवणुकीतून नफा कमावणे फारसे कठीण नाही.
सेन्सेक्सने २६ सप्टेंबर २०२४ रोजी ८५,९३० अंशांचे शिखर गाठल्यानंतर घसरण सुरू झाली. या घसरणीत २ मार्च २०२५ रोजी ७२,६३३ अंशांचा तळ गाठून २६ मार्च २०२५ रोजी ७८,१६७ अंशांचे शिखर गाठून सध्या बाजार ७७,६०० दरम्यान स्थिरावतांना दिसत आहे. या घसरणीदरम्यान पाच दिवस असे होते जेव्हा सेन्सेक्स १ टक्क्याहून अधिक घसरला, दोन दिवस असेही होते की, सेन्सेक्सची २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. हिंमत दाखवून या पाच दिवसांत ज्यांनी खरेदी केली त्यांना आज बऱ्यापैकी नफा दिसतो आहे.
आर्थिक विश्लेषक किंवा बाजारातील अनुभवी गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेत टिकाव धरण्यासाठी ‘बाय इन डीप’ अशी योजना कायम सांगतात. पण याचा नेमका अर्थ काय? “डीप’ या शब्दाचा अर्थ बाजारातील अल्पकालीन घसरणीशी संबंधित आहे. आपण म्युच्युअल फंडांच्या युनिटची खरेदी-विक्रीची संधी समजू. बाजाराच्या चढ-उतारांमुळे कमी किमतीत युनिट खरेदी करण्याची संधी म्हणून याकडे पाहावे. ही योजना पुराव्यावर आधारित आहे की, बाजारातील चढ-उतार आणि अल्प-मुदतीची घसरण अनेकदा कमी किमतीत खरेदी करून दीर्घकालीन नफा कमावण्याची संधी उपलब्ध करून देते. भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूकदार केवळ सामान्य जीवनातच नव्हे तर त्यांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या बाबतीत आवेशाने चुकीचे निर्णय घेतात. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात तीव्र अस्थिरता आहे. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या एसआयपी बंद किंवा नूतनीकरण न करणाऱ्याची आकडेवारी १०३ टक्के या विक्रमी पातळीवर पोहचली आहे. गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवणूक करणे सुरू ठेवावे की थांबवावे याचा विचार करण्यास भाग पाडले आहे. म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे, जे गुंतवणूकदारांना लहान गुंतवणुकीतून कर कार्यक्षम मोठी रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य देते. तथापि, जेव्हा बाजार अस्थिर होतात आणि अनेक महिन्यांसाठी अस्थिरता वाढवतात, तेव्हा गुंतवणूकदार चिंताग्रस्त होतात. अशावेळी एसआयपी बंद करण्यात येते. मात्र एखाद्याने सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीनुसार एसआयपी बंद करण्याचा निर्णय घेऊ नये. त्यामुळे सध्याची बाजारातील मंदी बाजूला ठेवून, तुमची एसआयपी गुंतवणूक थांबवण्याची चूक करू नये, हे सांगण्यासाठी हा अट्टहास. अस्थिरता निधी व्यवस्थापकाचा मित्र आहे, असे सांगितले जाते. यामुळे अस्थिरतेशी मैत्री अधिकाधिक घट्ट व्हायला हवी.