सलील उरुणकर
भारतीय व्यवसायपद्धत आणि पाश्चात्य देशातील व्यवसायपद्धतीमध्ये असलेला मूलभूत फरक लक्षात घेता स्टार्टअप, व्हेन्चर कॅपिटल (व्हीसी) व अशा तत्सम संकल्पना या खरंतर आपल्या देशात नवीनच म्हणाव्या लागतील. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्याचा भारतीयांचा कल कमी होऊन, अमेरिकेतील भांडवलशाही पद्धतीचे साहसवित्त (व्हीसी) नवउद्योजकांना उपलब्ध करून देणे, त्या कंपन्या किंवा नवउद्योजकांना अपयश आल्यास त्यांना कमी न लेखणे, अपयशी नवउद्योजकांकडून नव्या प्रयत्नांची अपेक्षा ठेवणे व प्रोत्साहन देणे अशा अनेक नव्या युगाच्या गोष्टींची स्वीकार्हता भारतीयांमध्ये वाढली आहे. विशेषतः २०१४ नंतर स्टार्टअप इंडिया या योजनेला दिल्या गेलेल्या चालनेमुळे भारतातील स्टार्टअप्सची संख्या वाढू लागली. जागतिक पातळीवर विचार करायचा झाला तर स्टार्टअप्स स्थापनेच्या संख्येनुसार भारत आज तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि भारताच्या अंतर्गत विचार करायचा झाला तर बंगळूर (कर्नाटक) नव्हे तर पुणे, मुंबईचा (महाराष्ट्र) मिळून प्रथम क्रमांक आहे.
स्टार्टअप इंडिया योजनेच्या आकडेवारीनुसार, २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत भारतात एकूण २९१४६६ स्टार्टअप्सची नोंदणी झालेली आहे. त्यातील ९९३८० स्टार्टअप्सला डीपीआयआयटी म्हणजेच डिपार्टमेंट फाॅर प्रोमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड या विभागाकडून स्टार्टअप असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे, तर केवळ ११६७ स्टार्टअप्सला प्राप्तिकर कायद्याच्या ८० आयएसी कलमान्वये कर सवलत देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात ४९४८४ स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून २०१८६ स्टार्टअप्सला डीपीआयआयटी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. केवळ २४१ स्टार्टअप्सला कर सवलत मिळालेली आहे. पुण्याचा विचार करायचा झाल्यास, १२८५३ स्टार्टअप्सची नोंदणी, ५५१५ डीपीआयआयटी प्रमाणपत्र आणि ७६ स्टार्टअप्सला कर सवलत मिळाली आहे.
हेही वाचा… Money Mantra: बुल पुट स्प्रेड स्ट्रॅटेजी कशी करता येईल?
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख, तर शिक्षण व आयटी हब, मॅन्युफॅक्चरिंग व फूड प्रोसेसिंग हब, ऑटोमोटिव्ह व डिफेन्स हब अशा विविध क्षेत्रांमध्ये अव्वल असलेल्या पुणे शहरात स्टार्टअप्सची संख्या सर्वाधिक आहेत याचे तितके नवल वाटत नाही. कोणत्याही स्टार्टअपला पाहिजे असलेले कुशल मनुष्यबळ, चांगल्या पायाभूत सुविधा, मोठ्या कंपन्या तसेच गुंतवणुकदारांबरोबर सहज सोप्या पद्धतीने संपर्क आणि तुलनेने कमी खर्चिक असलेले शहर अशा सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात का स्थापन झाल्या आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
हेही वाचा… Money Mantra: करकपातीमुळे व्याजाचे नकळत होणारे आर्थिक नुकसान
उद्योग-क्षेत्रनिहाय विचार केला तर कृषीतंत्रज्ञान, शिक्षण-तंत्रज्ञान, वित्त-तंत्रज्ञान, संरक्षण-तंत्रज्ञान, सायबरसिक्युरिटी अशा सर्वच क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या पुण्या-मुंबईत मोठ्या प्रमाणावर आढळते. विशेषतः नवतंत्रज्ञानाधारित कंपन्यांची भारतीय कार्यालये, त्यांचे संशोधन विभाग, उत्पादन-विकास विभाग हे पुण्या-मुंबईत आहेत तर मुख्य कार्यालये अमेरिका, इस्राईल, दुबई अशा ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ, युरोपमधील बहुतांश शाळांमध्ये वित्त-तंत्रज्ञानाधारित सेवा पुरविणाऱ्या एका जागतिक कंपनीचे युरोपबाहेरील एकमेव कार्यालय पुण्यात आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, संगणकशास्त्र अशा अनेक अभ्यासक्रम व शाखांच्या विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबईत रोजगार उपलब्ध होत आहे. बँकाचा विचार करायचा झाल्यास बहुतांश जागतिक बँकांचे बॅक-ऑफिस पुण्यात असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.
हेही वाचा… Money Mantra: वेदांताचे ‘डीमर्जर’ होणार – व्हॅल्यू अनलॉक होणार?
आकडेवारीनिहाय बोलायचे झाले तर कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रात भारतात एकूण ५४७० स्टार्टअप्स आहेत, तर त्यापैकी महाराष्ट्रात १००३ व पुण्यात २८५ आहेत. वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स भारतात एकूण ७०९१ आहेत तर महाराष्ट्रात १६३५ आणि पुण्यात ३४९ आहेत. सामरिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षा या दोन्हीचा विचार केला तर अनुक्रमे ४४४ सामरिक सुरक्षेचे उपकरण बनविणारे स्टार्टअप्स भारतात आहेत तर ७४३ सायबरसिक्युरिटी स्टार्टअप्स आहेत. हीच संख्या अनुक्रमे महाराष्ट्रात ६४ आणि १३५ आहे, तर पुण्यात २८ व ४५ आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रांतील स्टार्टअप्स पुण्या-मुंबईत स्थापन झालेल्या आहेत व होत आहेत. साॅफ्टवेअर-अॅज-ए-सर्व्हिस (SaaS) कंपन्याही मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची एक विशेष बाब म्हणजे येथे कोणत्याही एका क्षेत्रातीलच स्टार्टअप यशस्वी होतात असे नाही, तर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झालेल्या स्टार्टअप्स आपल्याकडे आहेत.
आर्थिक-सामाजिक-औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेल्या आपल्या राज्यात आता तंत्रज्ञानाधारित उद्योग-व्यवसायांचीही प्रगती होत आहे. केवळ पुण्या-मुंबईतच स्टार्टअप्स यशस्वी होत आहेत, असे नाही. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या शहरांमध्येही अनेक चांगल्या स्टार्टअप्स स्थापन झाल्या आहेत व त्यांची संख्या वाढत आहे. या शहरांमधील स्टार्टअप्सला, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरी माहिती उपलब्ध करून देणे, साहसवित्ताची, बँकांकडून कर्ज तसेच विविध शासकीय विभागांकडून देण्यात येणाऱ्या अनुदानांची सहज उपलब्धता, ग्राहकवर्ग निर्माण करण्यासाठीची धोरणे अशा विविध पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे.