या स्तंभातील ९ सप्टेंबऱच्या ‘तेजीमंदीच्या चक्राचा ल.सा.वि.’ या लेखात निफ्टीवरील २६,३०० या उच्चांकाचे आणि त्या नंतर येणाऱ्या २,००० अंशांच्या मंदीचे सूतोवाच केलेले होते. त्या वेळच्या तेजीच्या वातावरणातील हर्षोन्मादात, आता चालू असलेल्या मंदीचे पूर्व-भाकित करणे म्हणजे ‘दुधात मिठाचा खडा पडल्यागत सर्वांना वाटत होतं.’ अनेकांचा होरा असा की, तेथून २,००० अंशांची घसरण तर अशक्यच! २७ सप्टेंबर २०२४ रोजी निफ्टी निर्देशांकांने २६,२७७ चा उच्चांक स्थापित करून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील इस्रायल-इराण युद्ध, भारत-कॅनडामधील राजनैतिक संबंधातील कुरबुर अशा विविध कारणांमुळे अवघ्या २० कामकाज दिवसांत निफ्टी निर्देशांकावर २६,२७७ ते २४,०७४ अशी २,२०३ अंशांची दातखिळी बसवणारी घसरण दाखवली. ही घसरण अल्पावधीत झाल्याने, आता तेजीला पूर्णविराम मिळणार की स्वल्पविराम, की बाजार मंदीच्या गर्तेत जाणार हा आजचा कळीचा प्रश्न आहे. याचे विस्तृत उत्तर जाणून घेण्याअगोदर निर्देशांकाचा सरलेल्या सप्ताहातील साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.
शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ७९,४०२.२९/ निफ्टी: २४,१८०.८०
आता चालू असलेली मंदी, त्यात येणाऱ्या सुधारणा (तेजी) ही मंदीच्या वातावरणातील ‘तेजीची झुळूक’ की, दाहक मंदीत येणारी क्षणिक स्वरूपातील सुधारणा व त्यानंतर पुन्हा सुरू होणारी मंदीची गर्तता, अशा तेजी-मंदीच्या विविध छटा आज आपण जाणून घेऊ या.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २३,८०० ते २४,००० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असेल.
हेही वाचा : माझा पोर्टफोलिओ : पोर्टफोलिओला ‘ऊर्जावान’ भविष्याची ग्वाही
आता निफ्टी निर्देशांकावर जी सुधारणा अपेक्षित आहे त्या सुधारणेचे अंतरंग जाणून घेऊ या.
१) क्षीण स्वरूपातील सुधारणा: निफ्टी निर्देशांकावर २३,८०० ते २४,००० चा स्तर राखत, २४,८०० पर्यंतची सुधारणा व त्यानंतर पुन्हा घसरण.
२) मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक: निफ्टी निर्देशांकावर २३,८०० ते २४,००० चा स्तर राखत २५,२०० ते २५,५०० पर्यंतची सुधारणा.
३) शाश्वत सुधारणा: निफ्टी निर्देशांक २५,५०० च्या स्तरावर सातत्याने १५ दिवस टिकल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २५,८०० ते २६,३०० असेल.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २५,२०० ते २५,५०० हा तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा असून, हा टप्पा पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य अनुक्रमे २३,८००, २३,२००, २२,८०० असे असतील.
शिंपल्यातील मोती
अवान्टेल लिमिटेड (शुक्रवार, २५ ऑक्टोबर भाव १६७.७५ रु.)
पुराणात जसा नारदमुनींचा वावर हा तिन्ही लोकांत होता तसाच काहीसा वावर या कंपनीचा, दूरसंचार संदेशवहन क्षेत्रात आहे. यात अवकाशातील उपग्रह, विमानसेवा, भूतलावर भ्रमणध्वनी, संरक्षण क्षेत्रातील रडार प्रणाली, तर पाण्यावरील युद्धनौका, तर पाण्याखालील पाणबुडी या सर्वांचे दूर-संदेश वहन तसेच भारताच्या संरक्षण सिद्धतेला स्वावलंबी, भारतीय बनावटीचे, आयातपर्यायी असे तंत्रज्ञान विकासासाठी विद्यासागर अबुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ‘अवान्टेल लिमिटेड’ कंपनीचा समभाग हा आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे.
हेही वाचा : Money Mantra : हेल्थ इन्शुरन्समध्ये CIS काय असतं? ते का महत्त्वाचं आहे?
आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री ५४.२० कोटींवरून ७७.२५ कोटी, करपूर्व नफा २२.८४ कोटींवरून ३२.१८ कोटी तर निव्वळ नफा १६.७१ कोटींवरून २३.५७ कोटी रुपये झाला आहे. समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती २५ रुपयांचा परीघ निर्माण केलेला आहे. जसे की १६५… १९०… २१५… २४० रुपये. अवान्टेल लिमिटेड या समभागाचा बाजारभाव सातत्याने १८५ रुपयांच्यावर १५ दिवस टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे २१० ते २३० रुपये, तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य हे ३०० ते ३५० रुपये असेल. ही कंपनी उष:कालीन (सनराइज) क्षेत्रातील असल्याने, सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या प्रत्येक दाहक मंदीत हा समभाग आपल्याला स्वस्तात मिळू शकतो तेव्हा गुंतवणूक योग्य रकमेचे २० टक्क्यांच्या ५ तुकड्यांत विभागून प्रत्येक दाहक मंदीत हा समभाग खरेदी करावा. अवान्टेल लिमिटेड या समभागामधील दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला १०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.
निकालपूर्व विश्लेषण
१) टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, २८ ऑक्टोबर
२५ ऑक्टोबरचा बंद भाव- १,०११.४५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ९९० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ९९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०६० रुपये, द्वितीय लक्ष्य १,१३० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ९९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९०० रुपयांपर्यंत घसरण
हेही वाचा : बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी
२) वेलस्पन लिव्हिंग लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, २८ ऑक्टोबर
२५ ऑक्टोबरचा बंद भाव- १४७.४९ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १४५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १४५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १६० रुपये, द्वितीय लक्ष्य १७५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: १४५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १३० रुपयांपर्यंत घसरण.
३) कॅनरा बँक
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २९ ऑक्टोबर
२५ ऑक्टोबरचा बंद भाव- ९४.२४ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ९६ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ९६ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ११० रुपये, द्वितीय लक्ष्य १२५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: ९६ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८२ रुपयांपर्यंत घसरण.
४) सिप्ला लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार,२९ ऑक्टोबर
२५ ऑक्टोबरचा बंद भाव- १,४८८.९० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,५०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १,५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३५० रुपयांपर्यंत घसरण.
५) मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २९ ऑक्टोबर
२५ ऑक्टोबरचा बंद भाव- ११,५०२.८५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १२,००० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १२,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १२,४५० रुपये, द्वितीय लक्ष्य १३,००० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १२,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०,६०० रुपयांपर्यंत घसरण.
६) पीसीबीएल लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २९ ऑक्टोबर
हेही वाचा : सोने-चांदी अजून झळकणार की झाकोळणार?
२५ ऑक्टोबरचा बंद भाव- ४२९ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४२० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४८० रुपये, द्वितीय लक्ष्य ५२५ रुपये.
ब) निराशादायक निकाल- ४२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३७५ रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.