सरलेल्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना मंदीने जे दाहक चटके दिले त्यात गुंतवणूकदारांचे आर्थिक, मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. ९ एप्रिलच्या संध्याकाळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जनक्षोभांपुढे अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त व्यापार शुल्क आकारणीचा निर्णय तीन महिन्यांनी पुढे ढकलण्याची घोषणा करताच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील भांडवली बाजारात तेजीचा फेर तर धरला. पण आपल्याकडे सरलेल्या सप्ताहातील तेजीच्या आतषबाजीने दाहक मंदीच्या ज्वाळांनी होरपळलेल्या गुंतवणूकदारांच्या मनात आता चालू असलेल्या तेजीबद्दल जीवनात ही घडी अशीच राहू दे, ही भावना निर्माण होणे साहजिकच आहे.
आता चालू असलेल्या तेजीत निफ्टी निर्देशांकाला २३,९०० ते २४,३०० अंशांचा अवघड टप्पा असून या पातळीवरून एक हलकीफुलकी घसरण अपेक्षित असून त्या घसरणीच प्रथम खालचे लक्ष्य २३,५०० ते २३,३०० हे द्वितीय खालचे लक्ष्य २३,००० असेल.या पातळीचा आधार घेत निफ्टी निर्देशांकांचे वरचे लक्ष्य २४,५०० ते २४,८०० असेल.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो हे गृहीतक काळाच्या कसोटीवर तपासून पाहूया. दि. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ३० ऑगस्ट २०१३ मध्ये सेन्सेक्स १७,४४८ व निफ्टी निर्देशांक ५,११८ पातळीवर होता. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम कालखंडाचा आढावा घेताना, संपूर्ण अर्थव्यवस्थेला हादरा देणारी घटना ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री घडली. आपल्या हातातील पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटेचे निश्चलनीकरण करण्यात आले, तो दिवस.आजही आठवून पहा.. मूलभूत, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पैशाची चणचण, चलनातून बाद झालेल्या नोटा बदलताना झालेले अतोनात हाल, लघुउद्योगांना खेळत्या भांडवलाची चणचण अशा वेळेला भांडवली बाजारातील गुंतवणूक वगैरे फार दूरची गोष्ट. या धक्क्यात देखील डिसेंबर २०१६ च्या अखेरीस सेन्सेक्स २५,७५३ तर निफ्टी निर्देशांक ७,८९३ स्थिरावला. या पातळीचा आधार घेत २३ फेब्रुवारी २०१८ ला सेन्सेक्स ३६,४४३ व निफ्टी निर्देशांक ११,१७१ च्या उच्चांकावर झेपावला,जो वर्ष २०१३ च्या नीचांकापासून दुप्पट झाला. (क्रमशः)

‘बातमीतील समभाग’

एखादी कंपनी तिच्या कामगिरीवर, कर्तृत्वावर त्या क्षेत्रात मापदंड निर्माण करत असते. अशा प्रथितयश कंपन्यांचा शब्द, संचालक मंडळाचे भविष्यकालीन मार्गदर्शन हा त्या क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरत असतो. अशा कंपन्यांना तावूनसुलाखून आपलं श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करण्याची संधी म्हणजे कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल. ज्या कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल उत्कृष्ट असतील ते समभाग बातमीत झळकणार. ‘तिमाही निकालांच्या पूर्वसंध्येला’ या प्रथितयश कंपन्यांचा- त्यांच्या समभागांचा ‘बाजार तंत्रकलाच्या’अंगाने घेतलेला आढावा.

१) एसीसी लिमिटेड

१७ एप्रिलचा बंद भाव- २,०६१.७०रु.

तिमाही वित्तीय निकाल:- गुरुवार, २४ एप्रिल

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-२,२०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास – त्या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,२०० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य २,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,४०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास – २,२०० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १,९०० रुपयांपर्यंत घसरण

२) अँक्सिस बँक लिमिटेड

१७ एप्रिलचा बंद भाव -१,१९०.८०रु.

तिमाही वित्तीय निकाल:-गुरुवार,२४ एप्रिल

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-१,२०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास – त्या सकारात्मक बातमीच्या जोरावर समभागाकडून १,२०० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य १,२८० रुपये, द्वितीय लक्ष्य १.३३५ रुपये.

निराशादायक निकाल – १,२०० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखाली राहत १,०५० रुपयांपर्यंत घसरण

३)हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेड

१७ एप्रिलचा बंद भाव-२,३७५ रु.

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार,२४ एप्रिल

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-२,३३० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास – समभागाकडून २,३३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास – २,३३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,२५० रुपयांपर्यंत घसरण

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:-शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी‘स्टाॅप लाॅस’आणी इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.