आशीष ठाकूर
निफ्टी निर्देशांक २४,००० चा स्तर राखत, २५,८०० च्या उच्चांकालाही गवसणी घालेल यावर सर्वांचाच विश्वास होता. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गुंतवणूकदारांसाठी विकसित केलेल्या, निफ्टी निर्देशांकावरील ३०० अंशांच्या परिघाचे (बॅण्डचे) सूत्र आपल्या हाताशी होते. ते लक्षात ठेवत, २५,८०० चा उच्चांक गुंतवणूकदार रेखाटत होते. जसे की निफ्टी निर्देशांकावर २४,००० चा स्तर टिकल्यास, २४,००० अधिक ३०० अंश म्हणजेच २४,३००… २४,६००… २५,५०० ते २५,८०० हे लक्ष्य नमूद केलेले होते. हे लक्ष्य आता गुंतवणूकदार स्वतःच आत्मविश्वासाने अचूकपणे रेखाटत होते. या सूत्राच्या अचूकतेची प्रत्यक्ष प्रचीतीदेखील सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या सत्रात निफ्टी निर्देशांकांनी २५,८४९ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवून दिली. हे या तांत्रिक विश्लेषण शास्त्राचे फार मोठे यश आहे. या तृप्त, कृतार्थ क्षणी तांत्रिक विश्लेषण शास्त्राची ‘आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे!’ अशी भावना प्रत्येक गुंतवणूकदारांच्या मनात नि:संशय असेल. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स : ८४,५४४.३१/ निफ्टी : २५,७९०.९५
सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांकाने ४ जूनचा २१,२८१च्या नीचांकापासून, सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या २५,८४९ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला. म्हणजेच नीचांकापासून ४,५६८ अंशांची वाढ त्याने नोंदवली. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २५,८०० ते २६,१०० हा तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा असून या स्तरावरून, अंदाजे ५०० ते १,००० अंशांची हलकीफुलकी घसरण, (४,५६८ अंशांच्या वाढीसमोर १,००० अंशांची घसरण अतिशय मामुली असल्याने या घसरणीला हलकीफुलकी असे संबोधले आहे.) अपेक्षित असून, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे २५,५०० ते २५,२०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य हे २५,००० ते २४,८०० असे असेल.
हेही वाचा >>>बाजार रंग : शास्त्र असतं ते! ‘थ्रिल’ नाही…
निफ्टी निर्देशांक सातत्याने २४,८०० च्या स्तराखाली पंधरा दिवस टिकल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे २४,३०० ते २४,००० असेल.
शिंपल्यातील मोती
देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड
(शुक्रवार, २० सप्टेंबर भाव – २०९.८८ रु.)
वर्ष १९९१ मध्ये श्री. रविकांत व श्री. वरुण जयपुरिया यांच्याकडून स्थापित, श्री. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खाद्य पदार्थाची त्वरित सेवा उपलब्ध करून देत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर १,८०० हून अधिक खाद्यगृहांची (हॉटेलची) साखळी निर्माण करणारी; तरुणाईची पहिली पसंती असलेल्या पिझ्झा हट, केएफसी, कोस्टा कॉफी अशा आंतरराष्ट्रीय नाममुद्रा आपल्या शिरपेचात धारण करणारी ‘देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीचा समभाग हा आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे.
आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास, विक्री ७५९ कोटींवरून, ८३९.८८ कोटी, करपूर्व नफा ४७.२७ कोटींवरून ३९.६४ कोटी तर निव्वळ नफा ३५.४२ कोटींवरून ३१.६५ कोटी झाला आहे.
समभागाचे आलेख वाचन करता समभागाचा परीघ (बॅण्ड) हा १६० ते १९० रुपयांमधील असून, देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड समभागाची किंमत सप्टेंबरअखेरपर्यंत २०० रुपयांच्यावर सातत्याने टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे २२५ ते २४० रुपये, तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य हे २८० ते ३२० रुपये असेल. भविष्यातील बाजारातील व समभागातील घसरणीत हा समभाग १९० ते १७० रुपयांदरम्यान प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत खरेदी करावा. देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड या समभागातील दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला १५० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.
हेही वाचा >>>सुजल्यावर कळतंय मार कुठे पडला!
महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.
चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची
हल्लीच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात गुंतवणूकदारांना इच्छा असूनही आपल्या समभाग संचाकडे (पोर्टफोलिओकडे) लक्ष देता येत नाही. यात तिमाही वित्तीय निकालांचा हंगाम असेल तर जाहीर होणाऱ्या आर्थिक कामगिरीवरच त्या समभागाची भविष्यकालीन वाटचाल अवलंबून असते. अशा वेळेला गुंतवणूकदारांना समजेल, उमजेल, किचकट आर्थिक संज्ञांच्या वाटेला न जाता गुंतवणूकदारांसाठी साधी, सोपी मूलभूत विश्लेषण, तांत्रिक विश्लेषणातील सोनेरी संकल्पना एकत्र केली गेली आहे. त्यावर अभ्यास करून ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना या स्तंभातून प्रस्तुत केली गेली. प्रत्यक्ष तिमाही वित्तीय निकालानंतर समभागाच्या बाजारभावाने ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखल्यास, निकाल उत्कृष्ट व नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य होणार.
दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तरामुळे असा एक निश्चित स्तर मिळतो. भविष्यात हा स्तर समभागाच्या बाजारभावाने सातत्याने राखल्यास दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना मानसिक व आर्थिक निश्चिंतीदेखील मिळते.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ही संकल्पना दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी अशा दोन्ही वर्गांसाठी आहे, ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली का? याचे सखोल विवेचन ‘हा सूर्य हा जयद्रथ’ न्यायाने करू या.
गेल्या वर्षी म्हणजेच, २३ जानेवारी २३ ला ‘शिंपल्यातील मोती’ सदरात ‘झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड’ हा समभाग २१८ रुपयांना शिफारस केला गेला होता. २० महिन्यांच्या कालावधीत या समभागाने २१८ रुपयांवरून, १५ जुलै २०२४ ला ८३९ रुपयांचा उच्चांक नोंदवला. अर्थात २८४ टक्के वाढ नोंदवत समभागाने संपत्ती निर्माण करणाऱ्या समभागांच्या पंक्तीत स्थान पटकावले. हे दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी झाले.
आता अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी ‘निकालपूर्व विश्लेषण’ सदराचा आधार घेऊ या. या स्तंभातील २२ जुलैच्या लेखात ‘झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड’ या समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केलेले. त्या समयी झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेडचा बाजारभाव ७४७.५५ रुपये होता. निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ७२० रुपये होता. निकालापश्चात झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड ७२० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखण्यास यशस्वी ठरल्यास, त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ७८० रुपये, तर द्वितीय वरचे लक्ष्य ८३० रुपये नमूद केलेले होते. प्रत्यक्ष तिमाही वित्तीय निकाल बाजाराच्या पसंतीस उतरून झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेडने अवघ्या चार दिवसांत, २६ जुलैला द्वितीय लक्ष्यासमीप असा ८२६ रुपयांचा उच्चांक नोंदवला. अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना १० टक्क्यांचा परतावा दिला.
तांत्रिक विश्लेषण शास्त्राची ‘आभाळागत माया’ यातून प्रत्यंतरला येईल. जवळपास दोन महिन्यांनंतर देखील झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेडने ७२० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, सरलेल्या शुक्रवारी, २० सप्टेंबरचा बंद भाव ७२४ रुपये नोंदवला आहे.
अशा रीतीने ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना ही दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी २८४ टक्के परतावा, तर अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी १० टक्के परतावा मिळवून देणारी ठरली. गुंतवणूकदारांच्या दोन्ही वर्गांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली असे समजायला हरकत नाही!
आशीष ठाकूर (लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.)
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.