शेअर बाजारातील उच्च अस्थिरतेच्या काळात, गुंतवणुकीच्या मूल्यावर होणारा परिणाम कमी करायचा असेल आणि या गुंतवणुकीवर जास्त परतावाही मिळवायचा आहे, तर अशा वेळी ‘एसटीपी’चा अवलंब करणे योग्य ठरते.
मागील लेखात (अर्थवृत्तान्त, ६ जानेवारी) भाष्य करण्यात आलेली अस्थिरता इतक्या लवकर गुंतवणूकदारांना अनुभवायास मिळेल असे वाटले नव्हते. गेल्या पंधरा दिवसांत बाजारात मोठ्या वेगाने चढ-उतार झाले. या चढ-उतारांमुळे मुद्दलाला बाधा न पोहोचता मूल्य राखणे हे आव्हान असून, या आव्हानाला सामोरे जाताना ‘एसटीपी’ हा एक चांगला पर्याय आहे.
म्युच्युअल फंडात ‘एसटीपी’ म्हणजे काय?
भांडवली बाजाराच्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी ‘एसटीपी’ (सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लान) ही एक गुंतवणुकीची रणनीती आहे. ज्या वेळा तुमच्याकडे मोठी रक्कम एकरकमी गुंतवणुकीसाठी उपलब्ध असते, आणि बाजार जेव्हा अस्थिर असतो तेव्हा समभागांत गुंतवणूक करणाऱ्या अर्थात इक्विटी फंडात एकरकमी गुंतवणूक करणे हिताचे नसते. अशा वेळी ही मोठी रक्कम रोखे गुंतवणूक करणाऱ्या (लिक्विड, मनी मार्केट, ओव्हरनाइट) अशा डेट फंडात गुंतवून रोज, साप्ताहिक मासिक ठरावीक रक्कम पूर्वनिर्धारित केलेल्या इक्विटी फंडात गुंतविली जाते. हे डेट फंडातून इक्विटी फंडात निश्चित रकमेचे हस्तांतरण सहा महिने ते एक वर्ष कालावधीत पूर्ण केले जाते. डेट फंडातील रकमेवर सध्या वार्षिक ६.०० ते ६.५० टक्के परतावा मिळतो, तर इक्विटी फंडात बाजार परिस्थितीनुसार परतावा मिळतो. पैसा एकरकमी इक्विटी फंडात न गुंतवून, या गुंतवणुकीचे मूल्य घसरणीमुळे गमावण्याचा धोका टाळता येतो.
हेही वाचा :अर्थसंकल्प २०२५-२६ : अन्नधान्य, सोने आयातनिर्भरतेविरुद्ध युद्धपातळीवर उपाय गरजेचे
‘एसटीपी’ रणनीतीचे प्रकार
शेअर बाजाराचा रोख कसा असेल या अंदाजानुसार ‘एसटीपी’ रणनीती ठरत असते. फिक्स्ड ट्रान्सफर प्लान या प्रकारात निश्चित रक्कम दरमहा हस्तांतरित केली जाते, तर ‘फ्लेक्झिबल ट्रान्सफर प्लान’ प्रकारात, बाजारातील चढ-उतारानुसार रक्कम हस्तांतरण सक्रिय पद्धतीने केले जाते. उदारणार्थ निर्देशांकाच्या प्रत्येक १ टक्का घसरणीनंतर डेट फंडातील ५ टक्के रक्कम इक्विटी फंडात हस्तांतरित केली जाते. ‘कॅपिटल ट्रान्सफर प्लान’ प्रकारात रोखे गुंतवणुकीवरील केवळ भांडवली लाभाचे हस्तांतरण केले जाते. बाजारातील अस्थिरता आणि निर्देशांकाच्या वाटचालीचे अंदाज यावर एकूण गुंतवणुकीवरील परतावा (रोखे समभाग) अवलंबून असतो.
‘एसटीपी’चे फायदे
‘एसटीपी’ रणनीतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड जे आकर्षक परतावा मिळविण्यासाठी जरी एक आकर्षक पर्याय असले तरी बाजाराच्या अनिश्चिततेमुळे जोखीम घेण्यास भीती वाटते, अशा गुंतवणूकदारांसाठी ‘एसटीपी’ हा जोखीम कमी करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवायचा असेल आणि बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणूक मूल्यावर होणारा परिणाम कमी करायचा असेल तर ‘एसटीपी’चा अवलंब करणे योग्य ठरते. शेअर बाजारातील उच्च अस्थिरतेच्या काळात, गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूकयोग्य रक्कम ‘एसटीपी’द्वारे डेट फंड आणि मनी मार्केट फंड यासारख्या तुलनेने सुरक्षित गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवून एकाच वेळी स्थिर परतावा आणि इक्विटी फंडातील वृद्धी मिळवू शकतात. ‘एसटीपी’द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणुकीवर होणारा सरासरी खर्च कमी होतो. ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’ हे इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तंत्राचा यातून अवलंब केला जातो. म्हणजेच इक्विटी फंडाच्या युनिटची सरासरी किंमत यातून कमी राखता येते. ‘एसटीपी’चे उद्दिष्ट इक्विटी आणि डेट फंडाचा एक पोर्टफोलिओ तयार करणे, जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधणे हे असते. ‘एसटीपी’ रणनीतीत डेट फंडाच्या हस्तांतरण केलेल्या प्रत्येक युनिटवर भांडवली लाभ होत असतो. हा लाभ अल्प मुदतीचा भांडवली लाभ धरून कर आकारणी केली जाते.
हेही वाचा :माझा पोर्टफोलियो – पोर्टफोलिओचा भक्कम आधारस्तंभ : ओएनजीसी
कालावधी किती असावा?
‘एसटीपी’चा अवलंब करण्याचा कालावधी किमान एक ते तीन वर्षे असावा. त्याद्वारे, मोठा परतावा मिळू शकला नाही तरी तुमच्या मुदलात घट होत नाही. तसेच, जर ‘एसटीपी’ निवडताना गुंतवणूकदाराला बाजाराचा कल जाणून घेण्याबाबत पुरेसे ज्ञान असले पाहिजे. मालमत्तेचे बाजार मूल्य आणि निर्देशांकातील चढ-उतार हे समजून घेतल्याने गुंतवणूकदारांना कालावधी आणि एसटीपीचे वर उल्लेख केलेले प्रकार यांच्यातून एखाद्या प्रकाराची निवड करता येते. एसटीपी परतावा निश्चित करताना एक्झिट लोड आणि कर पात्रता लक्षात घेणे आवश्यक आहे. डेट फंडात मुदलाची रक्कम गुंतविताना परताव्यापेक्षा मुदलाची सुरक्षा महत्त्वाची असते आणि डेट फंडांचा परतावा हा गौण असतो. जरी ‘एसटीपी’द्वारा केलेली गुंतवणूक कमी जोखमीची असली तरी जोखीममुक्त नसते. म्युच्युअल फंडातील प्रत्येक गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते तशी डेट फंडातील गुंतवणूकसुद्धा पत आणि व्याजदर जोखमींच्या अधीन असते. ‘एसटीपी’च्या माध्यमातून ही बाजार जोखीम कमी करता येते, जोखमीचे निर्मूलन करता येत नाही. सेवानिवृत्तीनंतर मिळालेला निधी, एखादी मालमत्ता विकून मिळालेला निधी यासारखा मोठा निधी इक्विटी फंडात गुंतविताना बाजार जोखीम कमी करण्याचा ‘एसटीपी’ ही एक चांगला पर्याय आहे.