जागरण प्रकाशन लिमिटेड ही एक मीडिया कंपनी असून कंपनी वृत्तपत्रे आणि मासिके यांची छपाई आणि प्रकाशन, एफएम रेडिओ, डिजिटल, बाह्य जाहिरात आणि प्रमोशनल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायात सक्रिय आहे.
कंपनी विविध श्रेणींमध्ये १० वेगवेगळे वृत्तपत्र चालवते. १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागरणची उपस्थिती असून कंपनीच्या पाच भाषांतून रोज ४०० हून अधिक आवृत्त्या/उप-आवृत्त्या प्रसिद्ध होतात. सुमारे ८.८६ कोटी वाचक वर्ग आहे. कंपनीचे प्रमुख वृत्तपत्र दैनिक जागरण हे सर्वात मोठे हिंदी दैनिक वृत्तपत्र आहे, तर उर्दू वृत्तपत्र इन्कलाब हे भारतातील आघाडीचे उर्दू वृत्तपत्र आहे. याखेरीज कंपनीची मिड डे, नई दुनिया, इनेक्स्ट, इंकिलाब, सखी, खेत-खलिहान असे अनेक प्रसिद्ध प्रकाशने आहेत.
रेडिओ विभाग
जागरण भारतातील एक आघाडीची रेडिओ ऑपरेटर आहे. म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड ही उपकंपनी देशातील एफएम लोकसंख्येच्या ६२ टक्के व्यापणाऱ्या विविध शहरांमध्ये ‘रेडिओ सिटी’ नाममुद्रेअंतर्गत ३९ रेडिओ स्टेशन चालवते. भारतातील रेडिओ उद्योगात तिचा बाजारातील वाटा सुमारे १९ टक्के आहे. कंपनीचे रेडिओ चॅनेल आग्रा, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पटना, पुणे, बडोदा आणि इतर शहरातून आहे.
डिजिटल व्यवसाय
या विभागात, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये बातम्या, शिक्षण, महिला, आरोग्य, तथ्य-तपासणी आणि युवा शैलींसह इतर विषयांसाठी डिजिटल सामग्री समाविष्ट आहे. त्यात जागरण, मिड-डे, हरजिंदगी, नई दुनिया आणि इतरांसाठी डिजिटल पोर्टल अर्थात संकेतस्थळे आहेत. कंपनीने व्यवसाय वृद्धीकरता ॲमेझोन, गूगल, मेटा आणि जिओबरोबर करार केले आहेत.
आऊट ऑफ होम/ इव्हेन्ट मॅनेजमेंट
कंपनी आपल्या शंभरहून अधिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘आऊट ऑफ होम’ मार्केटिंग सोल्युशन्समध्ये विशेषज्ञता आहे. कंपनी या व्यवसायात चांगली प्रगती साध्य करत असून कंपनीला नुकतेच मथुरा नगरपालिकेचे कंत्राट मिळाले आहे.
महसूल विभागणी
कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ८० टक्के महसूल मुद्रण आणि प्रकाशन व्यवसायातून असून, रेडिओ व्यवसाय १२ टक्के आणि इतर ८ टक्के आहे.
कंपनीचे डिसेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीमध्ये ५१७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६२.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत तो १५ टक्क्यांनी कमी आहे. तर नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने १,४०७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४५.३५ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ९ टक्क्यांनी कमी झाला आहे. जागरण समूहाच्या ताळेबंदात सुमारे ९०० कोटी रुपयांची रोखता आहे. सध्या पुस्तकी मूल्यापेक्षा कमी बाजारभाव असलेला आणि जवळपास ७ टक्के ‘डिव्हिडंड यील्ड’ असलेला हा शेअर सध्याचा किमतीत आकर्षक वाटतो.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
जागरण प्रकाशन लिमिटेड (बीएसई कोड ५३२७०५)
प्रवर्तक: डॉ.महेंद्र मोहन गुप्ता
संकेतस्थळ: www.jplcorp.in
बाजारभाव: रु. ७१/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: मीडिया
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ४३.५३ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६९.००
परदेशी गुंतवणूकदार २.३९
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ९.१७
इतर/ जनता १९.४४
पुस्तकी मूल्य: रु. ८७.४
दर्शनी मूल्य: रु. २/-
लाभांश: २५०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ७.७९
किंमत उत्पन्न गुणोत्तर:
१०.३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ११.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.११
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ९.९७
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): ९.१३%
बीटा :०.९
बाजार भांडवल: .१,५५५ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १३०/७०
गुंतवणूक कालावधी: २४ महिने
stocksandwealth@gmail.com
• हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.