आपल्या दैनंदिन आयुष्यात मीठपासून दागिन्यांपर्यंत सगळीकडे दिसणारा ब्रँड म्हणजे टाटा. सामाजिक क्षेत्र असो किंवा शिक्षण- टाटा समूह समाजातल्या विविध स्तरांमध्ये, क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. भारताला जगाच्या नकाशावर मोठे नाव कमवून देणारा हा समूह !! अगदी विनोदाने बोलावयाचे झाले तर बोली भाषेत आपल्याला एखादी वस्तू घेणे परवडत नसेल तर आपण म्हणतो ना की आम्ही काही टाटा, बिर्ला नाही कि सहज घेऊ शकू!!
तर आजमितीला या समूहाच्या शेअर बाजारात नोंदणी झालेल्या सुमारे २९ कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या मिळून रु.२,३०,०००कोटी इतके महाप्रचंड मार्केट कॅपिटलायझेशन आहे. यावरून एकूण समूहाची व्याप्ती किती अवाढव्य आहे हे आपल्यासारखे सामान्यजन कल्पनाच करू शकतात, पण हेच आकडे आपल्या देशाची सकारात्मक बाजू बघायला देखील प्रेरित करतात. भारत म्हणजे गरीब देश, अडाणी देश अशी आपल्या देशाबद्दल असणारी प्रतिमा पुसण्यामध्ये जे अग्रणी आहेत त्यातील हा एक उद्योग समूह!! गेल्या काही वर्षांमध्ये टाटा समूहाने गुंतवणूकदारांना अक्षरशः भरभरून परतावा दिला, साहजिकच टाटाचा कोणताही आयपीओ बाजारात येणार म्हणल्यावर गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडणार हे निश्चित!! तर असाच टाटांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा घालणारी एक घटना होऊ घातली आहे ती म्हणजे त्यांची अजून एक कंपनी शेअर बाजारात प्रवेश करत आहे ती म्हणजे “टाटा टेक्नॉलॉजीज लि.”
आणखी वाचा: Money Mantra: शेअरवर मिळणाऱ्या परताव्याचे प्रकार
सुमारे १९ वर्षांपूर्वी २००४ मध्ये शेअरबाजारात टाटांनी टीसीएसचा आयपीओ आणला त्यानंतर आता बाजाराला प्रतीक्षा आहे ती त्यांची ३३ वर्ष जुनी कंपनी म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या नोंदणी होण्याची, कंपनीने नुकताच मार्चमध्ये सेबीकडे आयपीओ संबंधित अर्ज(DRHP) दाखल केला व त्याला हिरवा कंदील देखील मिळाला आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार प्रतीक्षा करत आहेत ती म्हणजे तो कधी बाजारात येतो आणि किती किंमत-पट्टा कंपनी निश्चित करते, साधारणतः पुढील १-२ महिन्यात तो यावा अशी एक अटकळ आहे कारण सध्या शेअर बाजारात तेजीची घौडदौड चालू आहे. अशावेळीच तो आणणे योग्य ठरेल असे वाटते.
आणखी वाचा: Money Mantra: मोबाईल बँकिंग आणि UPIचे फायदे
इशू आणण्यामागे कंपनीचे पुढील हेतू आहेत.
१.शेअर बाजारात नोंदणी झाल्यामुळे काही विशेष फायदे मिळतात जसे कंपनी जास्त व्हिसीबल होते त्यामुळे ब्रँड इमेज प्रस्थापित होण्यास मदत होते आणि
२.सध्याचे जे प्रवर्तक(टाटा मोटर्स) व इतर गुंतवणूकदार आहेत त्यांना अंदाजे कंपनीतील ९.५७लाख शेअर्स विकून आपला हिस्सा कमी करावयाचा आहे.
अजून तारीख देखील जाहीर झाली नाही तरी लेख लिहिण्यामागचा उद्देश काय असावा तर इतका चांगला इशू येत आहे त्यामुळे वाचक आधीच याबद्दल “वेल-रेड” असेल तर त्याला नक्कीच अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यास मोठी मदत होईल!!
सामान्य गुंतवणूकदारांना समजावे म्हणून आत्ता पर्यंत आपण कंपनीचा आयपीओ असे जरी म्हणत असलो तरी,वास्तविक पाहता टाटा टेक्नॉलॉजीजची ऑफर फॉर सेल(ofs)पद्धतीने प्राथमिक बाजारात विक्री होणार असून प्रवर्तक व आधीचे गुंतवणूकदार त्यांचा हिस्सा कमी करतील त्यामुळे इशू मधून उभा होणारा निधी कंपनीकडे न येता परस्पर प्रवर्तकांकडे जाईल. टाटा मोटर्सचा कंपनीमध्ये आत्ता ७४.६९% इतका हिस्सा आहे. तो इशू नंतर २०% नी कमी होईल. बँक ऑफ अमरिका, जेएम, सिटी ग्रुप असे नामवंत बुक रनिंग लीड मॅनेजर्स असल्यामुळे इशू मधील विश्वास वाढण्यास मोठीच मदत होणार आहे. आत्ता जे अंदाज येत आहेत त्यानुसार सुमारे ४००० कोटींची ही ऑफर असावी असे वाटते. आता एकूण इशू बद्दल ही झाली तांत्रिक माहिती!! पुढील लेखात आपण कंपनीच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला तर इशुला अर्ज करावा किंवा कसे हे आकलन होणे सोपे होईल.
टाटा टेक्नॉलॉजीज लि. ही प्युअर प्ले इंजीनिअरिंग सर्व्हिस, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डिजिटल इंजीनिअरिंग सोल्युशनस मध्ये काम करते. मॅन्युफॅक्चरिंग लेड व्हटिॅकल्स हा कामाचा केंद्रबिंदू आहे. टाटामोटर्स आणि जग्वार हेच कंपनीचे मोठे (४०%)ग्राहक असल्यामुळे साहजिकच ऑटोमोबाईल संबधित उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या ७५% इतके आहे. याव्यतिरिक्त ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, इंडस्ट्रियल हेवी मशिनरी येथेही टाटा टेक्नॉलॉजी लोकांचे जीवनमान सुधारणासाठी सुरक्षित, अधिक टिकाऊ उत्पादने निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
११०००हून अधिक मनुष्यबळ, १९ ग्लोबल डिलिव्हरी सेंटर्स, एशिया पॅसिफिक, युरोप, उत्तर अमेरिका अशा ३ खंडांमध्ये आणि २७ देशांमध्ये पसरलेला व्यवसाय यावरून देशाच्या सीमा पार करून कंपनीचा व्यवसाय कसा विस्तृत झाला आहे याची नेमकी कल्पना आपण करू शकतो.
आर्थिक वाटचाल
खालील तक्त्यावरुन जर बघितले तर आर्थिक वाटचाल उत्तमच आहे हे दिसून येत आहे. गेल्या २ ते २.५ वर्षांत इपीएस रु.६.२/-प्रती शेअर वरून रु.१०.०४/-(३१/१२/२०२२ चे ९ महिने) इतके वाढले आहे. RONW% सुमारे १३%-१५% दरम्यान आहे. EBIDTA मार्जिन १६%-१९% आहे.
जरी या इशूच्या मागे “टाटा” हे नाव असले, आर्थिक वाटचाल उत्तम असली तरी कंपनीच्या शेअर संदर्भात काही जोखीम नक्कीच संभवू शकते याचाही विचार इशूला अर्ज करताना गुंतवणूकदारांना नक्कीच करावा लागेल.
१.कंपनीचे ४०% उत्पन्न टाटा मोटर्स कडून येत असल्यामुळे या मुख्य ग्राहकाला काही व्यवसाय विषयक अडचण आली तर त्याचा प्रत्यक्ष बरा-वाईट परिणाम कंपनीच्या कामावर होईल.
२.ऑटोमोटिव्ह क्षेत्र सध्या जोरात आहे, परंतु तिथे काही मंदीची लक्षणे दिसल्यास ते धोकादायक ठरेल.
३ .या शिवाय कुशल मनुष्यबळ राखणे सध्या मोठे आव्हान ठरत आहे,तसेच वाढणाऱ्या खर्चाचे सुयोग्य नियोजन,भविष्यात होणाऱ्या अनेक बदलांना सामोरे जाणे हे एक मोठे आव्हान असेल.
हे जरी खरे आहे तरी मागचे ३३ वर्षे कंपनीचे कामकाज समर्थपणे चालू असल्यामुळे एकूण त्यांना चढ उतारांची नक्कीच सवय असणार आणि त्याचे नियोजनही कसे करावे याचे निश्चित धोरण त्यांनी ठरवलेले असावे.
रु.२/-फेस व्ह्यॅल्यु असताना कंपनीची NAV(निव्वळ मालमत्ता) रु.६७७/-(३१/१२/२०२२रोजी) प्रति शेअर आहे जी नक्कीच उत्तम आहे.ग्रे मार्केट मध्ये कंपनीच्या व्यवहारांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रे प्रीमियम रु.८०-१००/-प्रति शेअर आकारला जात आहे. साधारणतः रु.६००-८००/-ने टाटा टेकची इशू किंमत असू शकेल अशी अटकळ आहे.
तौलनिक अभ्यास
टाटा टेक्नॉलॉजीच्या व्यवसायाबरोबर साधारण तुलना होऊ शकेल अशा खालील कंपन्या शेअर बाजारात कार्यरत आहेत. त्यांचे ईपीएस, पीई रेशो, RONW%(RETURN ON NET WORTH) यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास कंपनीचे या क्षेत्रातील स्थान निश्चित करणे सोपे जाईल.
निष्कर्ष
वरील सर्व घटकांचा गोषवारा घेतला तर हे दिसून येते की टाटा टेक्नॉलॉजीजचे कामकाज सर्व आघाड्यांवर उत्तम चालू आहे. ऑटोमोबाईल क्षेत्र सध्या तेजीत असल्यामुळे कंपनीसाठी देखील येणारा भविष्य काळ उत्तम राहील. या सर्व घटकांचा विचार करता जर कंपनीने ठरवलेली इशू किंमत आकर्षक असेल तर इशूला उत्तम प्रतिसाद येणार हे नक्की दिसून येत आहे. त्यामुळे वाचकांनी इशूची तारीख कधी जाहीर होईल इकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार अर्ज करण्यासाठी तयारी ठेवावी.