नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही आकडेवारीनुसार टाटा मोटर्सने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत समाधानकारक कामगिरी बजावली आहे. टाटा मोटर्सने एकूण विक्रीमध्ये ४२ टक्क्याची वाढ नोंदवली आहे. जग्वार, लँड रोव्हर आणि वैयक्तिक वापराच्या मालकीच्या गाड्यांची विक्री वाढताना दिसली. त्यामुळे कंपनीच्या नफ्यामध्येही वाढ झालेली दिसली आहे. २०२२ यावर्षी एप्रिल आणि जुलै महिन्यात आणि २०२३मध्ये फेब्रुवारी, मे आणि जुलै या महिन्यात कंपनीने गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ केली. असे असूनही विक्री दमदार ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. पहिल्या तिमाही अखेरीस कंपनीचा एकूण नफा ३२०३ कोटी रुपये एवढा नोंदवण्यात आला. कंपनीचे सीएफओ पी. बी. बालाजी यांनी कंपनीच्या भवितव्याबाबत सूतोवाच करताना इलेक्ट्रिक व्हेहिकल्स अर्थात ईव्ही सेगमेंट मध्ये टाटा मोटर्सला उज्वल भवितव्य असल्याचे स्पष्ट केले आहे. या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत कंपनीने १९,००० इलेक्ट्रिक व्हेहिकल्सची विक्री केली. एकूण गाड्यांच्या विक्रीमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या विक्रीतून आलेला उत्पन्नाचा वाटा २४०० कोटी इतका आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीने ९००० इलेक्ट्रिक व्हेईकल्स विकली होती. असे असले तरीही कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये थोडीशी घट दिसून आली आहे. त्यातील प्रमुख कारण लिथियम बॅटरीच्या किमतींमध्ये सलग नऊ महिन्यांपासून वाढ होताना दिसते आहे. ‘ रेंज रोवर बीईव्ही’ ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार लवकरच प्री बुकिंग साठी उपलब्ध होणार आहे आणि त्याची प्रत्यक्ष विक्री २०२४ मध्ये सुरू होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Money Mantra: पन्नाशीनंतर टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी का आवश्यक?

सरकारच्या पी एल आय योजनेचे लाभार्थी टाटा मोटर्स

प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह (पी एल आय) या भारत सरकारच्या योजनेचा लाभ आता टाटा मोटर्सच्या ग्राहकांना होणार आहे. या योजनेअंतर्गत देशांतर्गत वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भारत सरकारकडून विशेष सवलत देण्यात येते. टाटा मोटर्सचे प्रतिस्पर्धी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने या योजनेचा लाभ घेण्यास अगोदरपासूनच सुरुवात केलेली असल्यामुळे टाटा मोटर्सला हा लाभ मिळायची सुरुवात होणे कंपनीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. अलीकडेच ‘टियागो’ या टाटा मोटर्सच्या ब्रँडच्या दहा हजार गाड्या विकल्या गेल्या. हा कंपनीसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरला आहे. टाटा मोटर्स या कंपनीतर्फे वैयक्तिक वापरासाठीच्या गाड्या, स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल्स (SUVs), व्यावसायिक वापरासाठीच्या ट्रक आणि बस याचबरोबर संरक्षण दलांसाठी अत्याधुनिक वाहनांची निर्मिती करण्यात येते. वैयक्तिक वापराच्या वाहनांमध्ये टियागो, अल्ट्रॉज, टिगोर, पंच, नेक्सोन, हॅरियर, सफारी या वाहनांची निर्मिती केली जाते.

आणखी वाचा: Money Mantra : कर वाचवण्यासाठी पालकांना भाडे देता येते का? नियम काय सांगतो?

बंगलोरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत टाटा मोटर्सचे नवे पाऊल

टाटा मोटर्सच्या बस गाड्यांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने बंगलोरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी आधुनिक बनावटीच्या स्मार्ट इलेक्ट्रिक बसेसची निर्मिती केली आहे. कंपनीला बंगलोर स्मार्ट सिटी कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बस गाड्या बनवण्याचे दीर्घ मुदतीचे कंत्राट मिळाले आहे. या संदर्भातील कंपनीच्या कंत्राटामध्ये बारा मीटर लांबीच्या ९२१ इलेक्ट्रिक बसेस बारा वर्षांसाठी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये छोटी वाहनेच नव्हे तर बस गाड्या निर्मितीचा अनुभव कंपनीच्या पाठीशी आहे. यापूर्वी भारतामध्ये विविध शहरांमध्ये मिळून कंपनीने ९०० इलेक्ट्रिक बस गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत व या बसेस रस्त्यावर आठ लाख किलोमीटर धावल्या आहेत !. यातूनच या तंत्रज्ञानाचे यश दिसून येते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors aims to sell one lakh electric vehicle mmdc psp
Show comments