टाटा म्युच्युअल फंडाच्या चार इंडेक्स फंडांचा ‘एनएफओ’ २२ एप्रिल रोजी समाप्त झाला. या चार इंडेक्स फंडांपैकी टाटा निफ्टी ऑटो इंडेक्स फंड हा वाहन उद्योगात गुंतवणूक करणारा फंड आहे. निफ्टी ऑटो इंडेक्स (टीआरआय) हा या फंडाचा मानदंड आहे. हा इंडेक्स फंड असल्याने निष्क्रियपणे व्यवस्थापित केलेला समभाग गुंतवणूक करणारा फंड आहे. हा सेक्टरल फंड असल्याने, या फंडाच्या गुंतवणुकीत जोखीम सर्वाधिक आहे. साहजिकच जोखीम सहिष्णुता जास्त असलेल्या गुंतवणूकदारांनी टाटा निफ्टी ऑटो इंडेक्स फंडामध्ये किमान ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ‘एसआयपी’ करण्याचा मार्ग स्वीकारायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत हा जपाननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वाहन उत्पादक देश आहे. सरलेल्या एप्रिल महिन्यात वाहन विक्रीची सर्वोच्च नोंद झाली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात एकूण वाहन किरकोळ विक्रीत १४ टक्के वार्षिक वाढ झाली. ट्रॅक्टर वगळता, वाहनांच्या सर्व श्रेणींमध्ये (प्रवासी वाहाने, वाणिज्य वाहने, दुचाकी, रिक्षा) दोन अंकी वाढ दिसून आली. ज्यामध्ये दुचाकी, तीन चाकी, प्रवासी वाहने आणि वाणिज्य वाहने अनुक्रमे १२ टक्के, १८ टक्के, १४ टक्के आणि १० टक्के दराने वाढली आहेत. ट्रॅक्टर विक्रीमध्ये केवळ ४ टक्के वाढ नोंदविली. जरी ‘टू-व्हीलर’ने वार्षिक वाढ नोंदली असली तरी, वृद्धिदर करोनापूर्व पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. दुचाकी वाहनांचे ‘बीएस ४’ वरून ‘बीए ६’ मध्ये होणारे संक्रमण आणि दुचाकी वाहनांवर २८ टक्के जीएसटीची करआकारणी ही वृद्धी न होण्याची कारणे वाहन उत्पादकांकडून सांगितली जात आहेत. सर्वाधिक १४ टक्के वाढ प्रवासी वाहने श्रेणीत नोंदवली गेली आहेत. या वर्षी दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने ग्रामीण भारतातील मागणी वाढून पुढील वर्षी वाहन विक्री अधिक होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Money Mantra: अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताना, काय काळजी घ्याल?

निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये अपोलो टायर्स (टायर), अशोक लेलँड (वाणिज्य वाहने), बजाज ऑटो (दुचाकी), बाळकृष्ण इंडस्ट्रीज (ऑफ रोड टायर), भारत फोर्ज (वाहनपूरक उत्पादने), बॉश (वाहनपूरक उत्पादने), आयशर मोटर्स (वाणिज्य वाहने), एक्साइड इंडस्ट्रीज (वाहनांच्या बॅटरी), हिरो मोटोकॉर्प (दुचाकी), एमआरएफ (टायर), महिंद्र अँड महिंद्र (प्रवासी आणि वाणिज्य वाहने) मारुती सुझुकी इंडिया (प्रवासी वाहने), संवर्धन मदरसन इंटरनॅशनल (वाहनपूरक उत्पादने ), टीव्हीएस मोटर कंपनी (दुचाकी), टाटा मोटर्स लिमिटेड डीव्हीआर (वाणिज्य आणि प्रवासी वाहने) आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचा समावेश आहे.

भारतातील वाहन उत्पादन तीन भौगोलिक क्षेत्रांत विभागले आहे. चेन्नईच्या आसपास सैन्यासाठी उत्पादित होणारी वाहने ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’, फोर्ड, ह्युंदाई, रेनॉ, मित्सुबिशी, निसान, बीएमडब्ल्यू, हिंदुस्तान मोटर्स, डेमलर, कॅपारो, मिनी, सिट्रोन आणि डॅटसन, इत्यादी वाहन उत्पादकांचे कारखाने असून देशातील वाहन निर्यातीपैकी ६० टक्के निर्यात या भागात उत्पादित वाहनांची होते. महाराष्ट्र वाहन उत्पादनात आघाडीचे राज्य आहे. महाराष्ट्रात मुंबई, आणि पुण्याजवळील चाकण ऑटो क्लस्टरमध्ये प्रमुख वाहन उत्पादकांचे कारखाने आहेत. महाराष्ट्राचा वाहन उत्पादनात ३३ टक्के वाटा आहे. ऑडी, फोक्सवॅगन आणि स्कोडा, बजाज ऑटो यांचे कारखाने औरंगाबादमध्ये आहेत. तर महिंद्र मुंबई, नाशिक आणि चाकण येथे असून महिंद्रचा नाशिक येथे एसयूव्ही आणि इंजिन जुळणी कारखाना आहे. जनरल मोटर्स, टाटा मोटर्स, मर्सिडीज-बेंझ, लँड रोव्हर, जग्वार, बजाज ऑटो आणि फोर्स मोटर्सचे कारखाने पुणे आणि चाकण भागात आहेत. उत्तरेकडील ऑटो क्लस्टर दिल्लीभोवती आहे आणि या विभागात साधारण ३० टक्के वाहन उत्पादन होते. हरियाणातील गुडगाव, मानेसर आणि खरखोडा इथे देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचे कारखाने आहेत. गुजरात राज्य उदोयोन्मुख ऑटो क्लस्टर म्हणून उदयाला येत आहे. हलोलमध्ये एमजी मोटर्स, राजकोटमधील अतुल ऑटो, फोर्ड, साबरकांठा येथील ऑक्युलस ऑटो, मारुती सुझुकी, आणि प्यूजिओ-सिट्रोन हे कारखाने आहेत. उर्वरित वाटा देशभरात विविध ठिकाणी उत्पादित होणाऱ्या वाहनांचा आहे. टाटा मोटर्ससह उत्तराखंड, ह्युंदाईसह तेलंगणा, ऑर्डनन्स फॅक्टरी मेडक, हैदराबाद ऑलविन आणि महिंद्र अँड महिंद्र, होंडासह नोएडा, आणि बेंगळूरु – टोयोटा, व्होल्वो आणि स्कॅनिया यांचे कारखाने कर्नाटकात आहेत. इसुझू आणि किया आंध्र प्रदेश आणि हिंदुस्तान मोटर्स उत्तरपारा, कोलकाता येथे तर टाटा मोटर्स, हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन, टाटा हिताची कन्स्ट्रक्शन मशिनरी, टीआयएल ट्रॅक्टोस, टाटा देवू आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांचे जमशेदपूर येथे वाहन उत्पादन कारखाने आहेत.

भारत सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पाच वर्षांसाठी १.९७ लाख कोटी रुपयांची उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन अर्थात पीएलआय योजना या १३ औद्योगिक क्षेत्रांसाठी जाहीर केली असून वाहन उद्योगाचा या १३ उद्योग क्षेत्रात समावेश आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये, नवीन आणि हरित तंत्रज्ञानासह ऑटोमोटिव्ह उद्योगाला चालना देण्यासाठी भारत सरकारने ३ नव्या योजना सुरू केल्या आहेत. विद्युत शक्तीवर चालणारी म्हणजेच इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी २६,००० कोटींची योजना मंजूर केली आहे. ‘विद्युत वाहनांच्या निर्मितीचे जलद रूपांतर ‘योजना म्हणजेच विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन जलद करून आणि पारंपरिक इंधन वापरणाऱ्या वाहनांच्या जागी ‘ग्रीनएनर्जी’वर चालणारी इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन इंधन वाहनांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी ही योजना असून यातून साठ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होईल असा अंदाज आहे.

हेही वाचा – Money Mantra: म्युच्युअल फंडाच्या युनिट्स विक्रीपश्चात होणारा भांडवली नफा व करदायीत्व

भारतीय उपभोगकर्ते महागड्या उत्पादनांवर पूर्वीपेक्षा जास्त खर्च करत आहेत. उच्च दर्जाच्या मद्यापासून ते विलासी मोटारीपर्यंत विविध उत्पादनांचा समावेश आहे. कंपन्यादेखील ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अवलंबत आहेत. मारुती सुझुकी इंडियाने सात आसनी बहुउद्देशीय वाहन, इन्व्हिक्टो (किंमत २५ लाख), हिरो मोटर्सने हार्ले डेव्हिडसनसमवेत भागीदारीत एक्स ४४० हे वाहन सादर केले आहे, ज्याची किंमत २.२९ लाख रुपये आहे आणि बजाज ऑटोने ट्रायम्फ मोटरसायकलबरोबरच्या भागीदारीत २.३३ लाख किंमत असलेली ४०० सीसी मोटरसायकल, ट्रायम्फ स्पीड ४०० सादर केली आहे. सध्या वाहन उद्योगाची उलाढाल ७.५५ लाख कोटींची असून ४.५ कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. वेगाने वाढणाऱ्या वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलनात ५० टक्के वाटा वाहन उद्योगाचा असून २०२८ पर्यंत या उद्योगातून होणारे जीएसटी संकलन दुप्पट करण्याचे सरकारी धोरण आहे. या बदलांचा लाभार्थी होण्यासाठी टाटा निफ्टी ऑटो इंडेक्स फंड हा एक मार्ग आहे.

आकडेवारी संदर्भ : फेडरेशन ऑफ ऑटोमोबिल डीलर्स असोशिएशन (फाडा) आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबिल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांचा वार्षिक अहवाल.

shreeyachebaba@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata nifty auto index fund is a fund that invests in the automobile industry print eco news ssb
Show comments