यावर्षीच्या सुरुवातीच्या दोन तिमाहीमध्ये शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली होती पण, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अचानक वाढलेल्या विक्रीच्या फेऱ्यात सेन्सेक्स आणि निफ्टी सापडतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती पण सगळ्या नकारात्मक शंका दूर सारत गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिलोमध्ये मार्केटने भर घातली. २०१७ नंतर सर्वात जास्त वार्षिक परतावा यावर्षी मिळाला आहे. भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांचे एकंदरीत मूल्य (मार्केट कॅपिटलायझेशन) चार ट्रिलियन डॉलर्स एवढे पोहोचले आहे. अमेरिका, चीन आणि जपाननंतर आता भारतीय शेअर बाजार आकाराने सर्वाधिक मोठे शेअरबाजार झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षाच्या सुरुवातीला रशिया युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली मार्केटमधील अनिश्चितता कमी होते ना होते तोच इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आंतरराष्ट्रीय मार्केटमधल्या आशाआकांक्षांना दूषित करत होते. अल्पावधीतच या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही हे लक्षात आल्यावर तेजीचे वारे पुन्हा व्हायला सुरुवात झाली.

हेही वाचा – Money Mantra : यंदा प्राप्तिकराशी संबंधित नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल, ‘या’ १० महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

महागाई आणि रिझर्व्ह बँकेचे प्रभावी धोरण

रेपो दराचा वेळोवेळी वापर करत असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाई दर आपल्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले आहे. भविष्यात व्याजदरामध्ये वाढ होणार नाही या अपेक्षेमुळे शेअर बाजाराला एक निश्चित गती मिळण्यास मदत झाली. आगामी काळात अमेरिकेतील व्याजदर वाढीबद्दलची अनिश्चितता एकदा संपुष्टात आली आणि पश्चिमेकडून पैशाचा ओघ वाढू लागला की भारतीय बाजारांमध्ये नवचैतन्य येईल यात शंकाच नाही.

मान्सूनचा पाऊस आणि शेअर मार्केट

यावर्षी जून महिन्यात दमदार सुरुवात केलेल्या मान्सूनने ऑगस्ट महिना येईपर्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण केली होती. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा संपूर्ण डोलारा पाऊस येतो का नाही? यावर अवलंबून आहे आणि यामुळेच ग्रामीण भागातील लोकांच्या खरेदी शक्तीचा तो मुख्य आधार आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो या गृहीतकाला यावर्षी धक्का बसला. ऑक्टोबर अखेरीस जोरदार देशाअंतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीने असे एकही क्षेत्र उरले नाही की ज्यामध्ये तेजी दिसून आली नाही.

इलेक्ट्रिक व्हेईकल्सची धूम

भारतीय वाहन निर्मिती उद्योगात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पेट्रोल आणि सीएनजी या इंधनांना मागे टाकत इलेक्ट्रिक व्हेईकल्सने बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली आहे. मारुती, हुंडाई, टोयोटा या जपानी/ कोरियन कंपन्यांच्या बरोबरीने टाटा मोटर्सने या श्रेणीत आपले आघाडीचे स्थान निर्माण केले आहे. टाटा मोटर्स नेक्सन ही सर्वाधिक पसंतीची गाडी ठरत असून टाटा मोटर्स हा शेअरसुद्धा गुंतवणूकदारांना भरघोस लाभ देताना दिसत आहे. याच कंपनीची उप-कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा पब्लिक इशू याच वर्षी बाजारात आला व त्याला अर्थातच घवघवीत यश मिळाले.

आठ कोटी डिमॅट अकाउंट ! वाढता वाढता वाढे…

वर्षाखेरीस सी डी एस एल आणि एन एस डी एल या कंपन्यांकडे नोंदणीकृत असलेले आणि नियमितपणे वापरात असलेले डिमॅट अकाउंट आठ कोटींच्या घरात पोहोचले आहेत. फक्त शेअर्स ट्रेडिंगसाठी न वापरता गुंतवणूक म्हणूनही शेअर्स विकत घेऊन ठेवण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. याच बरोबरीने ऑनलाइन म्युच्युअल फंड योजनांची खरेदीसुद्धा होताना दिसत आहे. पूर्वी परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला तर भारतातील मार्केट अक्षरश: कोसळत असे, आता मात्र देशाअंतर्गत गुंतवणूकदारांचा थोडासा तरी का होईना हातभार लागायला सुरुवात झाल्याने ही परिस्थिती बदललेली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा जोर सुरू केल्यावर बाजार कोसळले की भारतीय देशाअंतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू होते.

हेही वाचा – Money Mantra : सिम कार्डपासून ITR पर्यंत ‘हे’ नियम नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून बदलणार, जाणून घ्या

मिड, स्मॉल आणि लार्ज कॅप सगळे लीडर्स

बुल मार्केटमध्ये सहसा मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या कोणत्यातरी एका प्रकारच्या कंपन्यांमध्ये तेजी दिसून येते. यावर्षी काही अपवाद वगळता सर्व प्रकारच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, यामागील प्रमुख कारण म्युच्युअल फंडामार्फत भारतीय गुंतवणूकदारांकडून केली गेलेली भरघोस गुंतवणूक हे आहे. दरवर्षी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मार्फत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढतोच आहे. या वर्षभरात मिडकॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये विक्रमी नवीन फोलिओची नोंदणी झाली. यामुळेच मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.
या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत दर महिन्याला पंधरा हजार कोटी रुपये भारतीय गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मार्फत थेट इक्विटीमध्ये गुंतवत आहेत. निफ्टी स्मॉलकॅप १०० इंडेक्सने ५४% तर निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स ने ४४% असे घसघशीत रिटर्न्स दिले आहेत.

जीडीपीतील वाढ सात टक्क्यावर

करोना जागतिक संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा कशी सावरेल ? याबाबत व्यक्त केलेल्या सर्व शंकांना दूर सारत भारताच्या अर्थव्यवस्थेने ‘यू टर्न’ घेतला आहे. जीडीपीतील वाढ साडेसहा टक्क्यांनी होईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा अंदाज वाढवून आता सात टक्क्याने अर्थव्यवस्थेत वाढ होईल असे भाकीत नोंदवले आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian stock market has reached the four trillion dollar mark mmdc ssb