खरेतर एखाद्या चित्रपटाची शोभावी अशी कथा या घोटाळ्याची आहे, त्यामुळे तीन भाग म्हणजे काही विशेष नाही. आनंद सुब्रमणियन या माणसाचे नशीब जसे बदलले, तसे बहुधा कुठल्याच ‘कॉर्पोरेट’ कर्मचाऱ्याचे आजपर्यंत बदलले नसावे. ३१ मार्च २०१३ या दिवशी बामर लॉरी या सरकारी कंपनीच्याही उपकंपनीमध्ये अवघ्या १५ लाख वार्षिक वेतनावर काम करणाऱ्या आनंद यांची निवड झाली ते थेट राष्ट्रीय शेअर बाजारात. १ एप्रिल २०१३ रोजी त्यांचा पगार वाढून वार्षिक १.६८ कोटी रुपये झाला. म्हणजेच त्यात तब्बल ११ पट वाढ झाली. यांनी मधल्या काळात काही भांडवली बाजाराची माहिती घेतली किंवा काही परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सुद्धा ऐकिवात नाही. त्यांचा अनुभव कंपनीच्या मालमत्ता भाड्याने देणे किंवा त्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भातील होता. त्यांची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांच्या पत्नी या चित्रा रामकृष्णन यांच्या चांगल्या मैत्रीण होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवताना, त्याची फक्त चित्रा रामकृष्णन यांनीच मुलाखत घेतली. त्यांना जे पद देण्यात आले ते होते मुख्य धोरणात्मक सल्लागार. म्हणजे एक प्रकारे कर्मचारीसुद्धा नाही तर सल्लागारच आणि तेही अर्धवेळच म्हणजे आठवड्यातून ४ दिवसच. वाचकहो, अशी कुठली नोकरी असली तर मलादेखील बघा!
पुढील वर्षी जेव्हा पगार वाढ झाली तेव्हा कंपनीमध्ये सगळ्यात जास्त वाढ घेणारेसुद्धा हेच होते. कारण आनंद यांचे वरिष्ठ चित्रा रामकृष्णनच होत्या आणि त्यांनी आनंद यांना चांगले मानांकन दिले. मारुतीच्या शेपटाप्रमाणे यांचा पगार वाढत वाढत वर्ष १६-१७ मध्ये तब्बल ४.२१ कोटी रुपयांवर पोहोचला. १ एप्रिल २०१६ ला ही पगारवाढ त्यांना मिळाली, कारण त्यांचे कामाचे दिवस वाढवून आता ५ करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष त्यांना ३ दिवसच कार्यालयात यायचे होते आणि उरलेले २ दिवस इच्छेनुसार घरून काम करायचे होते. त्यातसुद्धा परदेशी जायची गरज भासल्यास त्यांना प्रथम वर्गाचे तिकीट देण्यात यायचे. जे बाजारमंचातील कुणालाच मिळायचे नाही. दर आठवड्याला आनंद चेन्नईला जायचा आणि तेसुद्धा बाजारमंचाच्या खर्चाने. या बढतीनंतर सचिवीय लेखापरीक्षणात ही बाब लक्षात आणण्यात आली होती की, आनंद यांच्याकडे इतक्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांकडे असतात. तरीही त्यांच्या नेमणुकीची कुठलीही नोंद संचालक मंडळाने किंवा त्यांनी नेमलेल्या समितीने घेतली नाही. त्यावर बाजारमंचाने उत्तर देऊन आनंद हे फक्त सल्लागार आहेत आणि कर्मचारी नाहीत, असा बचाव केला. लेखापरीक्षणातील मुद्द्यांची अशा प्रकारे नोंद न घेतल्यामुळे पुढील गोष्टी घडल्या.
हेही वाचा : Money Mantra:एनपीएस वात्सल्य योजना काय आहे आणि त्याचा फायदा कुणाला मिळू शकतो?
या गोंधळात केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) अजून एका गोष्टीची माहिती मिळाली, ती म्हणजे बाजारमंचातील ‘फोन टँपिंग’ प्रकरण. हे सिद्ध व्हायचे आहे पण आरोप असा आहे की, २००७ पासून बाजारमंचातील कर्मचाऱ्यांचे ‘फोन टॅप’ केले जायचे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे अजून एक प्रकरणदेखील सिद्ध व्हायचे आहे. एवढ्या सगळ्या प्रकरणांची सुरुवात एका जागल्याने लिहिलेल्या पत्राने झाली आणि कित्येक घोटाळे बाहेर पडले. ‘आनंदी आनंद गडे’ बहुतेक याच आनंदला भविष्यात बघून बालकवींनी लिहिले असावे!