कौस्तुभ जोशी
जागतिक अस्थिरतेचा परिणाम दिसलेल्या भारतीय बाजारांनी या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. शुक्रवारी बाजार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स ६४३६३ तर निफ्टी १९२३० या समाधानकारक पातळीपर्यंत पोहोचलेला होता. आठवड्याच्या अखेरीस ऑटो, मेटल, एफ.एम.सी.जी. आयटी आणि बँक हे सर्वच निर्देशांक हिरव्या रंगांमध्ये दिसले. ऑक्टोबर महिन्यात जाहीर झालेल्या निकालांवर बाजाराचे लक्ष केंद्रित झाले होते. अपेक्षेप्रमाणेच आघाडीच्या कंपन्यांचे निकाल सकारात्मक दिसले.
नेस्लेची रुर्बन नीती
नेस्ले इंडिया या कंपनीने सरस कामगिरी नोंदवताना आपल्या पुढच्या वर्षीच्या रणनीतीची घोषणा केली आहे. कंपनी ग्रामीण भारतातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी आपला सहभाग आणि हिस्सा वाढवणार आहे. एफ.एम.सी.जी. व्यवसायातील भारतात कार्यरत असलेल्या या कंपनीने कायमच गुंतवणूकदारांना फायदा करून दिला आहे. या महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कंपनीने दहा रुपये फेस व्हॅल्यूचा आपला शेअर स्प्लिट करून एक रुपयाचे दहा शेअर्स करण्यात येतील अशी घोषणा केली आहे. यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना विकत घेण्यासाठी अधिकाधिक शेअर्स उपलब्ध होतील.
टाटा मोटर्स कंपनीने आपल्या व्यवसाय वृद्धीची घोषणा करताना गुजरात मधील सानंद या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या कारखान्यातून पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत गाड्यांची निर्मिती करायला सुरुवात केली जाईल अशी शक्यता वर्तवली आहे. एमआरएफ कंपनीने तिमाही निकालांमध्ये घसघशीत वाढ नोंदवली.
आणखी वाचा-Money Mantra : इव्ही घ्यायची आहे. पण, तरीही…
रेमंड उद्योग समूहाची संरक्षण उद्योगांमध्ये पदार्पणाची घोषणा उद्योगाने केली आहे. या व्यवसायाशी संबंधित मायनी प्रिसिजन प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीमध्ये 59% हिस्सा रेमंड समूहाने खरेदी केला आहे. सुझलॉन या ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपनीचा शेअर नऊ वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सप्टेंबर अखेरीस कंपनीने नफ्यामध्ये घसघशीत ८०% ची वाढ झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या सहा महिन्याभराच्या काळात कंपनीला मिळालेल्या नवीन प्रोजेक्टमुळे शेअर हळूहळू वाढायला सुरुवात झाली होती.
उर्जा निर्मिती क्षेत्रातील आणखी एक आघाडीची कंपनी असलेल्या एन.टी.पी.सी. या सरकारी कंपनीने गेल्या सहा महिन्याच्या काळात १९ दशलक्ष टन एवढा कोळसा उत्खननाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ऐंशी टक्क्याहून अधिक होती. ही कंपनी देशात सर्वाधिक औष्णिक ऊर्जा निर्माण करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
टायटन कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निकालानुसार सप्टेंबर अखेरीस कंपनीचे उत्पन्न ९ टक्क्याने वाढून या तिमाहीसाठी ९१६ कोटी रुपये एवढे झाले आहे. कंपनीने या कालावधीत ‘तनिष्क’ या नाममुद्रेची एकूण दहा नवीन दालने सुरू केली तर ‘मीया’ नाममुद्रेची २६ नवीन दालने सुरू केली व यामुळे कंपनीचा विस्तार ५९ शहरांमध्ये झाला आहे.
आणखी वाचा-Money Mantra : कोटक महिंद्राची नवी ‘कोटक कंझम्शन फंड’ योजना – जाणून घ्या सर्वकाही
मागच्या तिमाही मध्ये पहिल्यांदाच नफा नोंदवल्यानंतर यशस्वी घोडदौड कायम ठेवताना सलग दुसऱ्या तिमाही मध्ये झोमॅटो कंपनीने आपल्या उत्पन्नामध्ये ७१ टक्के वाढ नोंदवत छत्तीस कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीच्या बाजारात प्रसिद्ध असलेल्या गोल्ड लॉयल्टी प्रोग्राम मध्ये ३८ लाख लोकांनी नोंदणी केली आहे व या नव्या नोंदणीकृत लोकांनी फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून चाळीस टक्के नव्या ऑर्डर नोंदवल्या आहेत.
या आठवड्यात पुढील शेअर्स मध्ये दमदार खरेदी झालेली दिसून आली. या कंपनीचा शेअर ५२ आठवड्याच्या उच्च्चांक पातळीवर पोहोचला. अपोलो हॉस्पिटल पाच टक्के वाढलेला दिसला, एलटीआय माईंड ट्री अडीच टक्क्याने वाढला, आयशर मोटर्स या कंपनीच्या शेअरमध्ये अडीच टक्क्याची वाढ दिसून आली, उच्च श्रेणी वाहनातील विक्रीच्या वाढीचा कंपनीच्या शेअरवर परिणाम झालेला दिसला. अदानी उद्योग समूहातील एक कंपनी असलेल्या अदानी पोर्ट या कंपनीचा शेअर अडीच टक्के वधारला. ऑक्टोबर महिन्यामध्ये विक्रमी कंटेनर हाताळणी केल्याचा परिणाम दिसून आला. एलटी फायनान्स (४.८८ %), कंटेनर कॉर्पोरेशन (४.५८ %) हे सर्वाधिक वाढलेले शेअर ठरले. आगामी आठवड्यासाठी निफ्टीसाठी १९३०० ही पातळी महत्त्वाची ठरणार आहे. निफ्टीने १९२५० ही पातळी टिकवली तर ते सकारात्मक पाऊल ठरेल.