Money Rules Changed from 1 November 2023 : आजपासून नवीन महिना सुरू झाला असून, नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. सध्या भारतात सणांचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयांचा थेट परिणाम लोकांच्या घरच्या बजेटवरही पडू शकतो. आजपासून कोणते आर्थिक नियम बदलले आहेत ते जाणून घेऊ यात.
एलपीजी सिलिंडरचे दर वाढले
सणासुदीच्या आधीच जनता महागाईने होरपळली आहे. आजपासून देशात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांहून अधिक वाढ होत आहे. याचा विशेषत: रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सवर परिणाम होणार आहे, ज्यामुळे सणासुदीच्या काळात बाहेरील खाद्यपदार्थांच्या किमतींवर परिणाम होईल. या निर्णयानंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १०१.५० रुपयांनी महाग झाला असून, राजधानी दिल्लीत १८३३ रुपयांना उपलब्ध आहे.
बीएसईने इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागातील व्यवहार शुल्क वाढवले
इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटवरील व्यवहार शुल्क वाढवले जात आहे, असे बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने २० ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते. हे शुल्क BSE सेन्सेक्सच्या पर्यायांवर लादले जात आहे, त्याचा थेट परिणाम किरकोळ गुंतवणूकदारांवर होणार आहे.
हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना सेवानिवृत्तीनंतर बनेल आधार, दरमहा ९२५० रुपये मिळणार, पण कसे?
बँकांना सुट्ट्या असणार
सणासुदीमुळे या महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या मिळतील. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज आदी सणांमुळे बँकांना एकूण १५ दिवस सुट्टी असेल. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत बँकांशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करायचे असेल, तर सुट्ट्यांची यादी पाहूनच घराबाहेर पडावे.
हेही वाचाः LPG Price Hike : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ, ‘एवढ्या’ रुपयांनी महागला; तुमच्या शहरातील दर काय?
जीएसटी नियमांमध्ये बदल
आता १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ नोव्हेंबर २०२३ पासून ३० दिवसांच्या आत ई-व्हॉइस पोर्टलवर GST बिल अपलोड करावे लागतील. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता.
लॅपटॉप आयातीवरील अंतिम मुदत संपुष्टात
मोदी सरकारने HSN 8741 श्रेणी अंतर्गत लॅपटॉप, वैयक्तिक संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सूट दिली होती. त्यानंतर सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यावर आज सरकार निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
ATF स्वस्त होणार
सणासुदीच्या आधी जेट इंधनाच्या (ATF) किमतीत कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत ATF च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास ते ६८५४.२५ रुपये प्रति किलोलीटरने स्वस्त आहे आणि १,११,३४४.९२ रुपये प्रति किलोलीटरने उपलब्ध आहे. ते मुंबईत १,१९,८८४.४५ रुपये प्रति किलोलीटर, कोलकाता येथे १,०४,१२१.८९ रुपये प्रति किलोलीटर आणि चेन्नईमध्ये १,१५,३७८.९७ रुपये प्रति किलोलीटर या दराने उपलब्ध आहे.