भारतातील शेअर बाजारांनी गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. लोकसंख्येतील एका विशिष्ट गटाकडे असणारा पैशाचा ओघ मोठा आहे, यामुळेच चैनीच्या वस्तू, वस्त्रप्रावरणे, दागिने, फाईन-डाइन जेवण, पंचतारांकित आरोग्य सुविधा यांचा वापर वाढताना दिसतो आहे. यालाच गोल्डमन सॅक्स यांनी ‘अफ्लूअंट इंडियन’ असे म्हटले आहे. ‘The Rise of Affluent India’ या प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध वित्तसंस्था असलेल्या ‘गोल्डमन सॅक्स’च्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिसर्च डिव्हिजनने भारतातील लोकसंख्येतील श्रीमंतांचा वाढता टक्का लक्षात घेऊन काही लाभार्थी कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. वार्षिक दहा हजार डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येला ‘अफ्लूअंट इंडियन’ असे या अहवालात म्हटले आहे.
टायटन
श्रीमंतांसाठीच्या दागिने व्यवसायामध्ये आठ ते दहा टक्के बाजार हिस्सा असलेल्या या कंपनीने सोने, प्लॅटिनम आणि हिरे या तिन्ही व्यवसायामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. फक्त मेट्रो शहरे नाही तर दुसऱ्या फळीतील शहरांबरोबर निर्यातीतही कंपनीने चांगले व्यवसाय क्षेत्र विकसित केले आहे.
अपोलो हॉस्पिटल
बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार भारतीय तरुण वर्गात वाढत चालले आहेत व यामुळे ब्रॅण्डेड हॉस्पिटल्समध्ये जाऊन महागडे उपचार करण्याची सवय श्रीमंत वर्गाला लागली आहे. अपोलो हॉस्पिटलकडे देशभरात १३००० पेक्षा अधिक वैद्यकीय सल्लागार आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. मेडिकल इन्शुरन्स विकत घेण्यामध्ये झालेल्या वाढीचा थेट परिणाम दर्जेदार उपचार पद्धती स्वीकारण्याकडे झालेला आहे. Average Revenue Per Occupied Bed म्हणजेच प्रत्येक खाटेमागे किती उत्पन्न मिळते यामध्ये अपोलो हॉस्पिटल्सला इतरांपेक्षा अधिक संधी आहे.
फिनिक्स मिल्स
२०२४-२०२७ या वर्षात दरवर्षी व्यवसायात २५ टक्क्याने वाढ होईल असा अंदाज गोल्डमनने वर्तवला आहे. श्रीमंतांच्या संख्येत वाढ झाल्याने अधिकाधिक मॉल आणि शॉपिंग सेंटरची गरज निर्माण होईल व त्यामुळे या कंपनीला त्याचा फायदा होणार आहे. फॅशन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, खाद्यपदार्थ, सिनेमागृह हे सगळंच मॉलमध्ये असल्यामुळे नव्याने उदयाला येणाऱ्या शहरांमध्ये व्यवसाय वाढणार आहे.
मेक माय ट्रिप
दरवर्षी १३ टक्क्याने प्रवास आणि पर्यटन व्यवसायात वाढ होत आहे. पारंपरिक पर्यटन व्यवसायाबरोबरच आलिशान पर्यटनामध्ये वाढ होताना दिसते आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे बदलते धोरण आणि पैसे खर्च करून परदेशी जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत होणारी वाढ याचा थेट फायदा या कंपनीला होणार आहे. भारतातील हॉटेल, बस, विमान यांच्या बुकिंगच्या व्यवसायात ऑनलाइन स्तरावर या कंपनीचा ५० टक्के वाटा आहे व यामुळे ही कंपनी उत्तम परतावा देऊ शकेल.
झोमॅटो
वस्तू घरी मागवून खाणे, शनिवार-रविवारी विविध हॉटेलमध्ये जाऊन खाद्यपदार्थाचा आस्वाद घेणे ही नवसंस्कृती तरुणांमध्ये रुजू लागली आहे. या कंपनीचा Average Order Value हा आकडा सतत वाढता राहिला आहे. तयार खाद्यपदार्थ आणि भाजीपाला यांची डिलिव्हरी करण्यात कंपनीचा बाजारात सर्वाधिक हिस्सा आहे.
हेही वाचा – प्राप्तिकर कायद्याचे कलम ८० सी खूप महत्त्वाचे, तुम्हाला कसा मिळणार फायदा?
देवयानी आणि सफायर
केएफसी या आंतरराष्ट्रीय ब्रँडची भारतातील साखळी असलेल्या या कंपनीला गेल्या दशकभरात वार्षिक २५ टक्के दराने वाढीची संधी मिळाली. ही कंपनी अंदाजे पाच ते सहा कोटी भारतीयांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवू शकते. पिझ्झा आणि बर्गर विकणाऱ्या अन्य कंपन्यांची अंदाजे तीन हजार आउटलेट भारतात असताना केएफसीचे मात्र फक्त एक हजार ठिकाणी व्यवसाय आहेत. यामध्ये पुढच्या दहा वर्षात वाढ होणार आहे.
आयशर मोटर्स
सुरुवातीपासून ट्रक आणि प्रवासी वाहतूक वाहने बनवण्यात कंपनी आघाडीवर होती. मात्र रॉयल एनफिल्ड या ब्रँडच्या अंतर्गत ब्रॅण्डेड मोटरसायकल विकल्यामुळे कंपनीला इतरांपेक्षा जास्त व्यवसाय मिळाला आहे. ३५० सीसी आणि त्यावरील मोटरसायकल व्यवसायात कंपनीने आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या मोटरसायकलच्या सरासरी किमतीपेक्षा रॉयल इन्फिल्डची मोटर सायकल तिप्पट किमतीला असते.
- लेखात उल्लेख केलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपल्या वैयक्तिक अभ्यासावर आणि जोखमीवर गुंतवणूक करावी.