मिथुन सचेती आणि त्याच्या कुटुंबीयांनी ‘कॅरेट लेन’ या कंपनीतील आपला २७ % हिस्सा टायटन कंपनीला ४६२१ कोटी रुपयाला विकला आहे. ‘कॅरेट लेन’ ही कंपनी एकूण १७००० कोटी रुपये किंवा दोन बिलियन डॉलर्स एवढ्या मूल्याची झाली आहे.
मूळची एक स्टार्टअप कंपनी असलेली ‘कॅरेट लेन’ टायटनची उपकंपनी म्हणून काम करत होती. टायटनने २०१६ या वर्षात टायगर ग्लोबल या गुंतवणूकदाराकडून कॅरेट लेनमध्ये ६२% हिस्सेदारी विकत घेतली होती. त्यानंतर टायटनच्या तयार दागिने विकण्याच्या व्यवसायामध्ये ही कंपनी महत्त्वाची भूमिका पार पाडत होती. या कंपनीचा जन्म एक ‘स्टार्टअप कंपनी’ म्हणूनच झाला. दागिने दुकानात नेऊन विकणे किंवा लोकांनी दुकानात जाऊन विकत घेणे या पारंपरिक व्यवसायाला नवे स्वरूप देत कंपनीने संपूर्णतः ऑनलाइन माध्यमातून दागिने विकण्याचा शुभारंभ चेन्नईतून केला. त्यानंतर बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोयंबतूर या शहरांमध्ये कंपनीने आपला व्यवसाय विस्तारला. दागिने नाविन्यपूर्ण डिझाईन मध्ये हवे पण सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारे सुद्धा हवेत ही मानसिकता विचारात घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून ‘कॅरेट लेन’ आपला व्यवसाय करत आहे.
टाटा ग्रुप मधील ‘टायटन इंडस्ट्रीज’ ही कंपनी फक्त दागिने बनवण्याच्या उद्योगात नसून दागिने, घड्याळे, चष्मे ( आय केअर ) अशा व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यात म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्यवसायामध्ये २० टक्के वाढ नोंदवली आहे. ‘कॅरेट लेन’ हा ब्रँड धरून कंपनीने एकूण ६८ नवी दालने सुरू केली आहेत. कंपनीच्या एकूण दालनांची संख्या २६७८ एवढी झाली आहे. एप्रिल महिन्यात येणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्ताचा दिवस आणि नंतर येणारा लग्नसराईचा कालावधी यामुळे एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत ज्वेलरी व्यवसायामध्ये २१ टक्के वाढ नोंदवली गेली. भारतामध्ये आपले बाजारपेठेत यशस्वी स्थान निर्माण केल्यानंतर कंपनीने आता परदेशात आपला व्यवसाय विस्तार सुरू केला आहे. अमेरिकेसह आशिया खंडात, मध्य पूर्वेकडील देशात व्यवसाय वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. आखाती देशांमधील शारजाह येथे कंपनीने नवे दालन सुरू केले. घड्याळांसाठी सुरुवातीपासून प्रसिद्ध असणाऱ्या टायटनने घड्याळाच्या विक्रीत १३% ची वाढ नोंदवली आहे.
या तिमाहीत कंपनीने एकूण २६ नवीन घड्याळांच्या विक्रीची दालने सुरू केली. त्यातील १४ टायटन वर्ल्ड ९ हॅलोइस आणि ३ फास्टट्रॅक या प्रकाराची होती. टायटन आय प्लस या कंपनीने आपल्या व्यवसायातील वृद्धी दहा टक्क्याने दर्शवली आहे. गेल्या तिमाहीत टायटन आय प्लस या ब्रँडची नवी पाच दुकाने सुरू झाली आहेत.
कंपनीचा पारंपारिक व्यवसाय घड्याळ आणि दागिने हा असला तरीही नवनवीन क्षेत्रात कंपनीचे पदार्पण सुरूच आहे. फ्रेग्रंस आणि फॅशन ॲक्सेसरीज या व्यवसायात कंपनीने ११ टक्के वाढ नोंदवली आहे. मुंबई, हैदराबाद, लखनऊ, आग्रा, विजयवाडा या शहरांमध्ये कंपनीने फ्रॅग्रन्स आणि ॲक्सेसरीजची नवी दालने सुरू झाली आहेत. ‘कॅरेट लेन’ ही कंपनी मिथुन सचेती यांच्याकडून विकत घेतल्यानंतर आगामी काळात कंपनीला दमदार दिवस येणार हे निश्चित.