विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनी बाजाराला निराश केले आणि तेव्हापासून घसरणीला सुरुवात झाली. कंपन्यांच्या समभागांचे बाजारभाव हे कंपन्यांच्या कमाईचे गुलाम असतात, (Stock prices are slave to earnings), असे म्हटले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजकीय नेत्यांची किंवा अर्थतज्ज्ञांची विधाने बाजारात तात्पुरता जीव फुंकू शकतात. मात्र जोपर्यंत कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होत नाही आणि तोपर्यंत समभागांच्या किमती वाढत नाहीत. लार्जकॅप कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीच्या निकालात थोडी सुधारणा असली तरी निर्देशांकवर जातील अशी परिस्थिती अजिबात नाही. कंपन्यांच्या कमाईने बाजार वरच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी अजून सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी जावा लागेल. याचा अर्थ सध्याची अस्थिरता पुढील डिसेंबर २०२५ पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यानच्या काळात नफ्यात वाढ दिसल्याशिवाय बाजारात सुधारणा आणि अस्थिरता कमी होईल असे वाटत नाही. सरकार रचनात्मक वित्तीय धोरणे निश्चित करणारा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. आता चालू आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे, त्याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. चालू खात्यातील तूट स्थिर, वित्तीय एकत्रीकरण, रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेली चलनवाढ यासंबंधित आकडेवारी महत्त्वाची आहे.
जागतिक पातळीवर भू-राजकीय अस्थिरता आणि मध्यवर्ती बँकांकडे व्याजदर कपातीसाठी डोळे लावून बसलेले कॉर्पोरेट जग आणि सोन्याच्या भावात आलेली तेजी पाहता कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये पोर्टफोलिओमध्ये मल्टी ॲसेट फंडाचा समावेश करण्याला प्राधान्य दिले जाऊ शकते.
भारत पुढील काही वर्षांत प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान राहणार असला तरी, कंपन्यांनी म्हणावी तशी उत्पादन क्षमतेत (कॅपेक्स) वाढ केलेली नाही. सामन्यांचा उपभोग, खासगी कंपन्यांकडून होणारा भांडवली खर्च, सरकारकडून होणारी पायाभूत सुविधांची कामे आणि निर्यात ही अर्थव्यवस्थेची चार चाके आहेत. सामन्यांच्या उपभोगातील वाढ मंदावलेली आहे. उपभोगातील वाढ मंदावल्याने भांडवली खर्च पुनरुज्जीवित झालेला नाही. निवडणुकीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सरकारी खर्चावर अवलंबून असलेल्या पायाभूत सुविधांवरील खर्च कमी झालेला असून दुसऱ्या सहामाहीतसुद्धा अर्थव्यवस्थेला चालना मिळावी इतपत सरकारी खर्चात वाढ झालेली नाही. निर्यातीतसुद्धा फारशी वाढ झालेली नाही. सरकारी खर्चांवर अवलंबून असलेले (रस्ते, रेल्वे), उत्पादनाची निगडित प्रोत्साहन उद्योग (‘पीएलआय’द्वारे चालवलेले) आणि बांधकाम क्षेत्र यांचा वेग कुंठित झाला आहे. मागील चार वर्षांत (करोनापश्चात) सूचिबद्ध कंपन्यांच्या नफ्याची टक्केवारी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.७ टक्क्यांवरून ५.२ टक्के वाढली आहे. हा वृद्धीदर मंदावल्याने बाजाराला मोठ्या घसरणीला सामोरे जावे लागले.
मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड हा म्युच्युअल फंडांच्या हायब्रीड गटात मोडणारा फंड आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या नियमानुसार या फंडाची गुंतवणूक तीन किंवा अधिक मालमत्ता वर्गांमध्ये असणे आवश्यक आहे. मल्टी ॲसेट फंडांनी किमान ३ मालमत्ता वर्गांमध्ये प्रत्येकी किमान १० टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दोन सर्वात लोकप्रिय मालमत्ता वर्ग, रोखे आणि समभागव्यतिरिक्त, या योजना सोने, चांदी, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट्झ), इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इन्व्हिट) इत्यादी मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतात. विविध मालमत्ता वर्ग एकाचवेळी नफा कमावून देत नाहीत. भिन्न मालमत्ता वर्ग वेगवेगळ्या बाजारपेठेतील / आर्थिक परिस्थितीत एकमेकांपेक्षा जास्त-कमी कामगिरी करतात. रोखे हे समभागांपेक्षा जास्त स्थिर असतात. आर्थिक धोरणांवर अवलंबून असलेले समभाग आणि रोखे यांचा काही सकारात्मक सहसंबंध असतो. तर समभाग आणि सोन्यात व्यस्त सहसबंध असतो. जेव्हा समभाग घसरतात तेव्हा सोने चांगला परतावा देते. त्याउलट. अशा तीन किंवा अधिक मालमत्ता वर्गांचे संयोजन जोखीम संतुलित करू शकते आणि फक्त समभाग किंवा रोख्यांच्या संयोजनापेक्षा अधिक तीन किंवा अधिक मालमत्ता वर्ग प्रभावी परतावा देऊ शकतात.
मल्टी ॲसेट फंडमध्ये गुंतवणूक का करावी?
हे फंड ‘ऑल-वेदर फंड’ म्हणून ओळखले जातात. तुमच्या पोर्टफोलिओला केवळ वैविध्य प्रदान करत नाहीत तर समभाग गुंतवणुकीसारख्या विशिष्ट मालमत्ता वर्गातील संभाव्य घसरणीपासून संरक्षण करण्यास सक्षम असतात. हे फंड प्रत्येक मालमत्ता वर्गामध्ये असलेल्या संधींवर अवलंबून अनेक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतात हे तुम्हाला समभाग रोखे चांदी- सोने यामध्ये स्वतःहून गुंतवणुकीचे संतुलन करण्याचा त्रास वाचवितात. तसेच, जर तुम्ही प्रत्येक मालमत्ता वर्ग-आधारित फंडामध्ये स्वतंत्रपणे गुंतवणूक केली असेल तर तुमची गुंतवणूक असलेला एक फंड कमी परतावा किंवा प्रसंगी तोटा सहन करावा लागतो. हे फंड अनेक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करत असल्याने, एकमेकांशी कमी सहसंबंध (कोरिलेशन) असल्याने, स्थिर दीर्घकालीन भांडवली लाभाची संधी अधिक चांगल्या प्रकारे देतात. एका वर्षातील कोणत्याही एका मालमत्ता वर्गाची चांगली कामगिरी इतरांच्या खराब कामगिरीला झाकोळून टाकते. त्यामुळे परतावा स्थिर होतो.
फंड सक्रियपणे व्यवस्थापित केला जातो याचा अर्थ, तो सध्याच्या बाजार परिस्थितीनुसार मालमत्ता वर्गांचे प्रमाण निश्चित करतो. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारात वेळ साधावी लागत नाही. एकापेक्षा अधिक मालमत्ता वर्गांचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन होते.
हे फंड कर कार्यक्षम आहेत. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (एका वर्षापेक्षा अधिक) गुंतवणूक असल्यास भांडवली नफ्यावर १२.५ टक्के दीर्घकालीन भांडवली लाभ कर आकारला जातो. ज्यामुळे हा फंड पारंपरिक निश्चित उत्पन्न गुंतवणुकीपेक्षा अधिक कर कार्यक्षम बनतो, विशेषत: उच्च कर कक्षेतील गुंतवणूकदारांसाठी हा फंड एक आदर्श गुंतवणूकसाधन आहे.
केवळ चांगले फंड नाही तर उत्तम ॲलोकेशन केल्यास बाजाराच्या आणि अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांत हे मालमत्ता वर्ग अधिक नफा देतात. जगभरात वाढणारी भू-राजकीय जोखीम लक्षात घेता, अनपेक्षित घटनांमध्ये मुद्दलाचा बचाव करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे प्रमाण १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढवले जाऊ शकते. इतर मालमत्ता वर्गांमध्ये तीव्र घट झाल्यास हे रोकड सुलभता देतात. तुमच्या पोर्टफ़ोलिओत सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मक मालमत्ता विभाजन करून शिस्तबद्ध मार्गक्रमण करण्यासाठी मल्टी ॲसेट फंडांत गुंतवणूक करणे हिताचे ठरेल.