काल शुक्रवार एक सप्टेंबर रोजी बंद झालेल्या बाजारामध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार खरेदी बघायला मिळाली. या आठवड्याचा सुरुवातीच्या दोन दिवसाचा बाजाराचा रंग फारसा बरा नव्हता, मात्र शेवटच्या दिवशी सेन्सेक्स ५५५.१ ने वर जाऊन ६५३८७ ला बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८१ने वाढून १९४३५ ला बंद झाला. निफ्टीने १९४०० ची पातळी पुन्हा गाठणे हे बाजारासाठी समाधानकारक चिन्ह समजले जात आहे. अमेरिकेच्या आणि युरोपातील आकडेवारीने बाजाराचा उत्साह काही दिवसांपासून कमी केला होता, पण तो पुन्हा येताना दिसत आहे त्यातच कालच सरकारने जाहीर केलेले जीडीपीचे आकडे समाधानकारक आहेत. महागाई आणि जीएसटी याची आलेली आकडेवारी बाजाराने आपल्या खरेदीमध्ये प्रतिबिंबित केली आहे. जीएसटीची आकडेवारी बघितल्यास ऑगस्ट महिन्यात जीएसटीची एकूण जमा झालेली रक्कम १.५९ लाख कोटी एवढी होती. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 10.8% वाढ दिसून आल्याने बाजाराने याचे स्वागत केले. जीएसटी आकड्यात वाढ झालेली असली तरी जुलै च्या तुलनेत जीएसटीची आकडेवारी कमीच आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण जीएसटीच्या रकमेमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे असा सरकारचा अंदाज आहे. एलपीजी सिलेंडर ची किंमत कमी करून सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संकेत दिले आहेत. टोमॅटो आणि अन्य कृषी उत्पादनाच्या दरामध्ये सुद्धा हळूहळू घट होताना दिसते आहे. सप्टेंबर महिन्याच्या नंतरच महागाईची आकडेवारी समाधानकारक दिसेल असे मत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका भाषणात आपल्या नोंदव ले आहे.
मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये या महिन्यात ऑगस्ट जोरदार ‘रॅली’ दिसून आली. बीएसई 500 या निर्देशांकातील 28 कंपन्यांचे शेअर 20% पेक्षा अधिक वाढलेले दिसले. आय.आर.एफ.सी., सुप्रीम इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू एनर्जी, जय बालाजी इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. मिडकॅप इंडेक्सचा विचार करता 19 कंपन्यांनी दहा ते वीस टक्के वाढ दर्शवली तर तब्बल 47 कंपन्यांचे भाव एक ते दहा टक्के या दरम्यान वाढलेले दिसले.
ऑगस्ट महिन्यात वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये तेजी कायम दिसून आली. आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज ऑटो या कंपन्यांचे विक्रीचे आकडे समाधानकारक आले आहेत. सर्वसाधारणपणे जून नंतर वाहन निर्मिती क्षेत्रात थोडीशी मंदी दिसून येते, पण मागील महिन्यात हा ट्रेंड बदलला.
टाटा उद्योग समूहाने ताब्यात घेतलेल्या एअर इंडिया आणि टाटा उद्योग समूहाची आणि सिंगापूर एअरलाईनची एकत्रित गुंतवणूक असलेली ‘विस्तारा एअरलाइन’ यांचे मर्जर होण्याच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘सीसीआयने’ या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. बाजारासाठी ही एक आशादायक बातमी ठरायला हवी.
अमेरिकेतील शेअर बाजाराचा विचार करायचा झाल्यास एस अँड पी 500 इंडेक्स तीन आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिकेत बेरोजगारी कमी होण्यास सुरुवात झाली असून एक लाख 77 हजार नवीन नोकऱ्या उपलब्ध झाल्या अशी आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील (जीडीपी) वाढ 2.1% एवढी झालेली दिसली. या आकडेवारीमुळे अमेरिकेतील शेअर बाजारांबरोबरच त्याचा परिणाम भारतातील बाजारांवर सुद्धा झालेला दिसला. नॅसडॅक या इंडेक्स मधील 70 कंपन्यांनी नवीन उच्चांक नोंदवले. भारत सरकारने प्रकाशित केलेली जीडीपीची आकडेवारी जेवढी महत्त्वाची आहे तेवढाच मान्सूनचा प्रवास देखील बाजारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारतातील मोठी आर्थिक उलाढाल ही मान्सूनवर अवलंबून असल्याने येत्या दोन आठवड्यात मान्सून पूर्वस्थितीत परतला नाही तर ते चिंतेचे कारण ठरू शकते.