RBI To Withdraw Rs 2000 Notes:भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१६ मध्ये जेव्हा सरकारने नोटाबंदीची घोषणा केली, तेव्हा लोकांना नोटा बदलण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले होते. यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन २००० रुपयांची नोट जमा केली, तर त्यात कोणतीही अडचण नाही, परंतु तुमच्या खात्याचे KYC असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेचे ग्राहक नसले तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. तुम्ही एकावेळी फक्त २ हजारांच्या १० नोटा म्हणजेच २०००० रुपयांची बदली करू शकता. नोट बदलण्याची प्रक्रिया २३ मे २०२३ पासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे.

मी माझ्या नोटा कुठे बदलू शकतो?

तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. याबरोबरच तुम्ही RBI च्या १६ प्रादेशिक कार्यालयात जाऊन नोट बदलून घेऊ शकता. दुर्गम भागात म्हणजे ज्या भागात बँक नाही किंवा लांबच्या अंतरावर बँक आहे, त्या ठिकाणचे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलून घेऊ शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्याची गरज नाही, अशी महत्त्वाची माहितीही आरबीआयनं दिली आहे.

हेही वाचाः ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची परवानगी का? RBI अन् SBI विरोधात भाजप नेता पोहोचला दिल्ली कोर्टात

घरात राहूनही नोट बदलता येणार का?

तुम्ही घरी बसूनही नोटा बदलू शकता. जर तुम्हाला बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल, तर तुम्ही घरी बसून नोटा बदलून घेऊ शकता. बँक मित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्ही दररोज ४००० म्हणजे २००० रुपयांच्या दोनच नोटा बदलू शकता.

हेही वाचाः ३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटेचे काय होणार? आरबीआय गव्हर्नर म्हणतात…

२००० च्या बनावट नोटांचं काय होणार?

बँकेकडे कोणत्याही प्रकारे २००० रुपयांची बनावट नोट आढळल्यास बँक ती जप्त करेल. त्या नोटेचे कोणतेही मूल्य ग्राहकाला दिले जाणार नाही. ४ पेक्षा जास्त बनावट नोटा आढळून आल्यास बँक अधिकारी त्या नोटा पोलिसांच्या ताब्यात देतील. पोलीस त्या नोटांचा तपास करतील. बँक नोट सॉर्टिंग मशिन्सद्वारे (एनएसएम) नोटांची तपासणी करेल.

२००० रुपयांची नोट का बंद झाली?

२००० ची नोट आरबीआयने चलनातून बाद केल्यानंतर ही नोट का बंद केली जात आहे, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे की, या नोटा बाजारात कमी वापरल्या गेल्यात. त्यांचे चलन बाकीच्या नोटांच्या तुलनेत कमी होते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two thousand rupee note can now be changed at home but how vrd