गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून मिडकॅप, स्मॉल कॅप आणि निफ्टी ज्या पद्धतीने एक एक पातळी ओलांडून नवे उच्चांक गाठत आहेत त्या तुलनेत दोन सेक्टर मध्ये वाढ दिसलेली नाही. त्यातील पहिले सेक्टर म्हणजे बँक आणि दुसरे आयटी म्हणजेच ‘माहिती तंत्रज्ञान’

जागतिक बाजारातील अनिश्चितता आयटी कंपन्यांच्या निकालामध्ये स्पष्टपणे दिसते आहे. आज जाहीर झालेल्या विप्रोच्या निकालामध्ये ही बाब स्पष्टपणे जाणवते. दुसऱ्या तिमाहीत विप्रोचा नफा २६४६ कोटी रुपये एवढा होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये अर्ध्या टक्क्याची घट झालेली दिसते. व्यवसायातून मिळालेले उत्पन्न या तिमाहीमध्ये २२,५१५ कोटी एवढे होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये किंचित घट झालेली दिसली. या पूर्ण वर्षासाठी विप्रोचे नफ्याचे आकडे कमीच राहतील असा अंदाज दिला आहे. विप्रो फक्त आयटी क्षेत्रात काम करत नसली तरी त्यातील महत्त्वाचा हिस्सा, नफ्याचा वाटा आयटी व्यवसायातूनच येतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्यामध्ये साडेतीन टक्क्याची घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा… Money Mantra: विमा संरक्षण वाढत जाणारी विमा पॉलिसी

एका बाजूला अशी स्थिती असली तरीही विप्रोकडे कामाचा ओघ कमी झालेला नाही असेही जाणवते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत विप्रोने नवीन २२ प्रोजेक्ट सुरू केले व या सर्वांचे मूल्य १०० दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त आहे. विप्रोकडे असलेले एकूण ऑर्डर बुक किंवा कामांचे मूल्य १.३ अब्ज डॉलर एवढे पोहोचले आहे. गेल्या काही आठवड्यात आयटी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात येत आहे. व्यवसायाच्या भाषेत याला ‘अर्टीशन रेट’ असे म्हणतात. या तिमाही अखेर विप्रोकडे जवळपास अडीच लाख कर्मचारी काम करत होते. या तिमाहीमध्ये ५००० कामगारांनी कंपनी बदलली व विप्रोतून ते दुसऱ्या कंपनीत गेले असे सांगण्यात आले.

मागच्या वर्षीच्या याच कालावधीमध्ये कालावधीत कंपनीकडे जवळपास ६०० कर्मचारी नवीन आले होते हे महत्त्वाचे. देशातील आकाराने सहाव्या क्रमांकाच्या आयटी क्षेत्रातील ‘एलटीआय माईंडट्री’ या कंपनीने सप्टेंबर अखेरीस ११६२ कोटी रुपये तिमाही नफा नोंदवला. मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये हा नफा ११८९ कोटी इतका होता यावरून नफ्यात घट झाली आहे हे दिसून येते. वर्षभरात कंपनीच्या नफ्याच्या प्रमाणामध्ये ‘प्रॉफिट मार्जिन’मध्ये सुद्धा १७.५ टक्क्यावरून १६ टक्के एवढी घट झाली आहे. जुलै महिन्यात कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या पगार वाढीमुळे खर्च वाढल्याचे कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा… Money Mantra: शेअरबाजारातील व्यवहार: गुंतवणूक की व्यवसाय?

विप्रोच्या एकूण व्यवसायापैकी २९.८% व्यवसाय अमेरिका, २८% युरोप, ११ % व्यवसाय आशिया आणि मध्य आशियातून होतो. कंपनी सात प्रमुख क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. यातील बँकिंग-वित्तक्षेत्र आणि विमा क्षेत्र यातून ३३% , ग्राहक उपयोगी वस्तू १८% , आरोग्य क्षेत्र १२ % , ऊर्जा ११ %, तंत्रज्ञान १२ %, उत्पादन क्षेत्र ७% आणि संदेशवहन क्षेत्रातून ४ % असा व्यवसाय कंपनी करते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ६० टक्के उत्पन्न अमेरिकन डॉलर्स मध्ये येते.

आकाराने मध्यम असलेली पण आपल्या वेगळ्या कामगिरीने अल्पावधीतच गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची ठरलेली ‘पर्सिस्टंट’ ही कंपनी आपल्या ऑर्डर बुकच्या बळावर अन्य कंपन्यांना मागे टाकण्यास सज्ज झाली आहे असे दिसते. कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी जवळपास ८० % व्यवसाय उत्तर अमेरिका खंडातून १०% युरोपातून आणि उरलेला भारत आणि आशिया खंडातून होतो.

भारतात कंपनीचे २०००० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने भांडवली बाजारात प्रवेश केल्यापासून आपल्या व्यवसायामध्ये सातत्याने वाढ नोंदवली आहे व ही वाढ १७% आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीचे उत्पन्न २७ टक्क्याने वाढले आहे. बँकिंग-वित्त व्यवसाय आणि विमा या पारंपारिक क्षेत्रांबरोबरच आरोग्य क्षेत्रामध्ये कंपनीचा व्यवसाय वाढताना दिसतो.

Story img Loader