महेंद्र लूनिया
Physical Gold vs Digital Gold: आपल्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी शतकानुशतके सोन्याकडे विश्वासार्ह मालमत्ता म्हणून पाहिले जाते. डिजिटल गोल्ड हा तंत्रज्ञानाने दिलेला आणखी एक पर्याय आहे, असे आपण म्हणू शकतो.
डिजिटल सोने हे सोन्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे, ज्यामध्ये आपण डिजिटल सोने खरेदी करू शकतो; डिमॅट अकाउंटमध्ये संभाळू शकतो किंवा वॉलेटमध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपण डिजिटल सोने भेट देऊ शकतो. हा एक सहज आणि सोपा मार्ग आपल्याला तंत्रज्ञानाने दिलेला आहे. पारंपारिक पद्धतीने सोने खरेदी केल्यास आपल्याला ते प्रत्यक्ष सांभाळावे लागते, त्याची जोखीम घ्यावी लागते.
प्रत्यक्ष सोने आणि डिजिटल सोने यांच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास करायचा असेल तर आपल्याला विविध निकष अभ्यासले पाहिजेत.
पहिला निकष- ‘गुंतवणुकीचा उद्देश काय?’
गुंतवणुकीच्या उद्देशामध्ये दोन प्रकार येऊ शकतात, एक तत्कालीन म्हणजे सोन्यामधील चढउतारांचा लाभ घेणे आणि दुसरा पर्याय म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करणे. या दोन्हीमध्ये डिजिटल गोल्ड हा पर्याय सध्या फार चांगल्या पद्धतीने समोर येत आहे. प्रत्यक्ष सोने खरेदी करताना ‘तत्कालीन गुंतवणूक’ हा जर विचार असेल तर आपले मोठे नुकसान होऊ शकते कारण, प्रत्यक्ष सोने खरेदी करताना आपल्याला जीएसटी द्यावा लागतो आणि ते सोने दागिन्यांच्या स्वरूपामध्ये असेल तर त्यावर मेकिंग चार्जेसही लागतात.
हेही वाचा… Money Mantra: बँकेमार्फत नेमक्या कोणकोणत्या सेवा उपलब्ध होतात?
शिवाय विक्री करताना मेकिंग चार्जेस किंवा जीएसटी आपल्याला परत मिळत नाही. प्रत्यक्ष सोन्याच्या भावामध्येसुद्धा विविध सोनारांकडे आपल्याला तफावत आढळते. बाजारात जो भाव चाललेला आहे त्यापेक्षा कमी भावाने प्रत्यक्ष सोने खरेदी केले जाते, तर डिजिटल सोन्यामध्ये जीएसटी किंवा घटनावळ याचा विचारच नसतो. या ठिकाणी फक्त ब्रोकरचे कमिशन लागू शकते आणि ते केवळ अर्धा टक्का इतकेच असते. या व्यतिरिक्त सोन्याची संपूर्ण किंमत आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा होते.
दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये अगदीच वाईट परिस्थिती झाली तर आपले डिजिटल सोने परत मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. या ठिकाणी अगदीच “वाईट परिस्थिती” या शब्दाचा अर्थ असा होतो की देश संपूर्णपणे दिवाळखोर झाला आहे, म्हणजेच जी परिस्थिती सध्या पाकिस्तान किंवा श्रीलंकेची झाली आहे. या ठिकाणी सरकारही त्यांचे देणे देऊ शकत नाही. यामध्ये जर त्यांनी गोल्ड बॉण्ड आणले असेल, तर ते सुद्धा विक्री होऊ शकणार नाहीत. परंतु अशी परिस्थिती भारतावर येऊ शकेल का? याचा विचार आपणच केला पाहिजे. अशी शक्यता ०.१% असू शकते.
हेही वाचा… Money Mantra: विवाहितांचे विमा नियोजन कसे असावे? (उत्तरार्ध)
आता आपण दीर्घकालीन फायद्याबद्दल जाणून घेऊयात, ‘दीर्घकालीन गुंतवणूक’ जर आपण डिजिटल स्वरूपामध्ये केली आणि त्यामध्ये सुद्धा गोल्ड बॉण्ड या प्रकारांमध्ये केली तर ते सोने सांभाळण्याची जोखीम नाहीच शिवाय त्यावर वार्षिक अडीच टक्के व्याज देखील मिळते. महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण हे बॉण्ड आठ वर्षासाठी घेतले तर त्यामध्ये होणारा फायदा हा करमुक्त आहे.
‘काळ’ हा सुद्धा महत्त्वाचा निकष
ज्यावेळेस आपल्याला गरज भासते त्यावेळी डिजिटल गोल्डची आपल्याला त्वरित विक्री करता येते आणि त्याची रक्कम २४ तासांमध्ये आपल्या हातात मिळू शकते. प्रत्यक्ष सोन्यामध्ये संबंधित सोनाराची जर क्षमता नसेल तर तुम्हाला एखादा दुसरा दिवस रक्कम मिळण्यामध्ये जाऊ शकतो. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे भाव फरक हा मोठा मुद्दा या ठिकाणी येतो.
तिसरा निकष- ‘जोखीम’
या ठिकाणी आपल्याला खाजगी आस्थापना, सरकार आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्ष सोने असा विचार करावा लागेल. प्रत्यक्ष सोने सांभाळण्यासाठी आपल्याला ते घरात ठेवणे थोडे जोखमीचे असू शकते. चोरी व्हायची शक्यता असते. त्यामुळे आपण ते बँक लॉकरमध्ये ठेवतो आणि या ठिकाणी मग त्या जोखमीची आपल्याला किंमत मोजावी लागते, म्हणजे लॉकरचे भाडे द्यावे लागते. डिजिटल स्वरूपामध्ये खाजगी व्यावसायिकांबरोबर सोन्याचे व्यवहार करत असाल आणि तेही डिजिटल पद्धतीने तर तुम्हाला ती खात्री करून घ्यावी लागेल की ही संस्था तेवढी विश्वासार्ह आहे का? म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिस्क आहेच.
सरकारचा विचार केला आजच्या परिस्थितीमध्ये भारत सरकार फक्त आपल्या देशातच नाही तर जागतिक परिस्थितीमध्ये सुद्धा चांगले कार्य करत आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जोखीम आम्हाला दिसत नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाने संरक्षित केलेले सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड हे पूर्णतः सुरक्षित आहेत आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही अशी आमची धारणा आहे.
mahendra@vgold.co.in