वरुण बीव्हरेजेस लिमिटेड (व्हीबीएल) ही पेय उद्योगातील एक प्रमुख उत्पादक असून जगातील (अमेरिकेव्यतिरिक्त) पेप्सिकोच्या सर्वात मोठ्या फ्रँचायझींपैकी एक आहे. व्हीबीएल हा आरजे कॉर्प ग्रुपचा भाग आहे, जो पेये, जलद-सेवा उपाहारगृहे, आइस्क्रीम आणि आरोग्यसेवेमध्ये स्वारस्य असलेला एक वैविध्यपूर्ण व्यवसाय समूह आहे. व्हीबीएल १९९० च्या दशकापासून पेप्सिकोशी संबंधित आहे. गेल्या २५ वर्षांत कंपनीने व्यापलेल्या परवानाधारक प्रदेश आणि उपप्रदेशांची संख्या वाढवत नेली आहे तसेच पेप्सिको पेयांची विस्तृत श्रेणी तयार करून वितरित केली आहे. कंपनी कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्सची विस्तृत श्रेणी तयार करते, वितरित करते आणि विकते, तसेच पेप्सिकोच्या मालकीच्या ट्रेडमार्कअंतर्गत विकल्या जाणाऱ्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यासह मोठ्या प्रमाणात नॉन-कार्बोनेटेड पेये तयार करते, वितरित करते आणि विकते. व्हीबीएलद्वारे उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या पेप्सिको ब्रँडमध्ये पेप्सी, पेप्सी ब्लॅक, माउंटन ड्यू, स्टिंग, सेव्हन-अप, मिरिंडा ऑरेंज, सेव्हन-अप निंबूज मसाला सोडा, कुरकुरे, सिंबा आणि एव्हरवेस यांचा समावेश आहे.
कंपनीद्वारे उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या पेप्सिको एनसीबी ब्रँडमध्ये ट्रॉपिकाना, स्लाइस, ट्रॉपिकाना ज्यूसेस (१००% आणि डिलाइट), सेव्हन-अप निंबूज, गॅटोरेड तसेच ॲक्वाफिना ब्रँडअंतर्गत पॅकेज केलेले पिण्याचे पाणी यांचा समावेश आहे. भारतातील २७ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये (पेप्सिको इंडियाच्या सुमारे ९० टक्के पेय विक्रीसाठी) पेप्सिकोच्या विविध उत्पादनांसाठी व्हीबीएलला फ्रँचायझी देण्यात आल्या आहेत. विदेशात, नेपाळ, श्रीलंका, मोरोक्को, झांबिया आणि झिम्बाब्वे या प्रदेशांसाठीदेखील व्हीबीएलला फ्रँचायझी देण्यात आली आहे. कंपनीने काही विशिष्ट सुविधांमध्ये प्रीफॉर्म्स, क्राउन्स, प्लास्टिक क्लोजर, कोरोगेटेड बॉक्स, कोरुगेटेड पॅड्स, प्लास्टिक क्रेट्स आणि श्रिंक-रॅप फिल्म्सच्या उत्पादनासाठी बॅकवर्ड इंटिग्रेशन सुविधा स्थापन केल्या आहेत जेणेकरून परिचालन कार्यक्षमता आणि उच्च-गुणवत्तेचे मानक सुनिश्चित होतील. त्यासाठी त्यांचे तीन विशेष आणि १४ एकात्मिक प्रकल्प आहेत. व्हीबीएलचा लूनरमेक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ५५ टक्के हिस्सा असून ती पीईटी बॉटल कॅप्स आणि क्राउन कॅप्सचे उत्पादन आणि विक्री करते. व्हीबीएलकडे भारतात ३६ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ उत्पादन सुविधा आहेत. कंपनीचे १३० हून अधिक मालकीचे डेपो, २५०० मालकीची वाहने तसेच २५०० हून अधिक प्राथमिक वितरकांसह एक मजबूत पुरवठा साखळी आहे आणि सध्या त्यांनी १०.२ कोटी व्हीसी-कूलर स्थापित केले आहेत. त्यांच्या या मजबूत जाळ्याची पोहोच जगातील प्रत्येक पाचव्या व्यक्तीपर्यंत आहे. गेल्याच वर्षी जुलै महिन्यात व्हीबीएलने काँगोमध्ये कार्बोनेटेड शीतपेये आणि पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. गेल्या दोन वर्षांत कंपनीची उत्पादन क्षमता ४५ टक्क्यांंनी वाढली आहे.
कंपनीने मोझांबिक तसेच दक्षिण आफ्रिकेत आपल्या उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. तसेच झिम्बाब्वे आणि झांबियामध्ये ‘सिम्बा मंचीज’चे उत्पादन, वितरण आणि विक्री करण्यासाठी पेप्सी कंपनीसोबत एक विशेष फ्रँचायझिंग करार केला आहे. सुमारे ६० कोटी भांडवली खर्च करून कंपनी ५,००० मेट्रिक टन वार्षिक क्षमतेसाठी उत्पादन प्रकल्प उभारत आहे. आर्थिक वर्ष २६ पर्यंत तो कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ७६ टक्के महसूल कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स, सुमारे ८ टक्के महसूल ज्यूस तर उर्वरित १६ टक्के महसूल पाण्याचा आहे.
कंपनीचे २०२४चे वार्षिक तसेच चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. डिसेंबर २०२४ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने ३,६८९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १९६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तो गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी जास्त आहे. तर वर्ष २०२४ मध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत व्हीबीएलच्या उलाढालीत २५.५ टक्के वाढ होऊन ती २०,००८ कोटी रुपयांवर गेली आहे तर नक्त नफ्यातही २५.३ टक्के वाढ होऊन तो २,६३४ कोटी रुपयांवर गेला आहे. आपल्या विस्तार नियोजनासाठी तसेच कर्जफेडीसाठी कंपनीने गेल्या वर्षात ७,५०० कोटी रुपये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (क्यूआयबी) उभारले होते, त्याचा तसेच गेल्या तीन वर्षांत विविध प्रकल्पांवर केलेल्या भांडवली खर्चाचा फायदा आगामी कालावधीत दिसून येईल. कंपनी प्रयागराज, दमतल, मेघालय आणि बक्सर येथे नवीन प्रकल्प उभारत असून त्यासाठी यंदाच्या वर्षात सुमारे २,००० कोटींचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. सध्या ४५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुमच्या पोर्टफोलियोला भक्कम आधार देईल यात शंका नाही.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
वरुण बीव्हरेजेस लिमिटेड
(बीएसई कोड ५४०१८०) वेबसाइट: https://varunbeverages.com/ प्रवर्तक: रवी जयपुरीया
बाजारभाव: रु. ४३५/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: पेय उत्पादन, विक्री भरणा झालेले भागभांडवल: रु. ६७६.३० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६०.२०
परदेशी गुंतवणूकदार २५.२७
बँक्स/ म्युच्युअल फंड्स/ सरकार ७.००
इतर/ जनता ७.५३
पुस्तकी मूल्य: रु. ४९.१
दर्शनी मूल्य: रु.२/- लाभांश: २५ %
प्रति समभाग उत्पन्न: रु. ७.६७ किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५६.८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.१
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१७
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ८.६२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २४.२१
बीटा : ०.६
बाजार भांडवल: रु. १,४७,३०८ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:
गुंतवणूक कालावधी : २४ महिने
Stocksandwealth@gmail.com
वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
© The Indian Express (P) Ltd