अनिल अग्रवाल या भारतीय वंशाच्या उद्योगपतीशी संबंधित असलेल्या वेदांता लिमिटेड कंपनीने आपला महा ‘डीमर्जर’चा प्लॅन जाहीर केला आहे. भारतातील शेअर बाजार आठवड्याला नवीन उच्चांक प्रस्थापित करत असताना कंपनीने हा ‘डीमर्जर’ आराखडा जाहीर करून बाजाराला धक्काच दिला आहे. वेदांताच्या या रणनीतीमुळे कंपनीचे सहा कंपन्यांमध्ये विभाजन होणार आहे. या विभाजनानंतर जी कंपनी ज्या खनिजांच्या उत्पादनामध्ये कार्यरत आहे ती कंपनी वेगळी झालेली असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल अग्रवाल यांचा व्यावसायिक प्रवास थक्क करणारा आहे. सत्तरीच्या दशकात सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आता एका महाकाय कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. ॲल्युमिनियम, जस्त, शिसे, चांदी, तेल आणि नैसर्गिक वायू, लोहपोलाद, तांबे, ऊर्जानिर्मिती या सर्वच क्षेत्रांमध्ये वेदांता कार्यरत आहे. वेदांताच्या रिस्ट्रक्चरिंग योजनेमध्ये एका कंपनीचे सहा कंपन्यांमध्ये विभाजन केले जाणार आहे. या सर्व वेगळ्या काढलेल्या कंपन्या बाजारामध्ये सूचीबद्ध म्हणजेच लिस्टेड होतील.

सध्याच्या व्यवसायातून

  • वेदांता ॲल्युमिनियम
  • वेदांता ऑइल अँड गॅस
  • वेदांता पॉवर
  • वेदांता स्टील अँड फेरस मटेरियल
  • वेदांता बेस मेटल्स
  • वेदांता लिमिटेड

अशा सहा कंपन्यांची निर्मिती केली जाणार आहे.

वेदांताच्या गुंतवणूकदारांचा फायदा काय?

वेदांता कंपनीच्या डीमर्जर प्रक्रियेमुळे एका कंपनीचे सहा कंपन्यांमध्ये विभाजन होणार आहे. म्हणजेच वेदांताच्या सध्याच्या भागधारकांना प्रत्येक नव्या निर्माण झालेल्या कंपनीचे शेअर्स मिळणार आहेत. सोप्या भाषेत ज्या शेअर होल्डर्सकडे वेदांता या कंपनीचे शेअर आहेत त्यांना नवीन तयार झालेल्या प्रत्येक कंपनीचा शेअर डिमॅट अकाउंटला क्रेडिट केला जाईल. यातून सर्वसामान्य गुंतवणूकदाराला नेमका किती आणि कसा फायदा होईल याविषयी कोणतेही विधान करणे आजच्या दिवशी धोकादायक ठरेल. ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कंपनीचे वेगवेगळे भाग पडून त्याचे शेअर गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होणे आणि त्यामुळे त्यांची योग्य किंमतही मिळणे सगळ्या भविष्यातील घटना म्हणून नोंदवून ठेवायला हव्यात!

काय करतात या कंपन्या?

  • वेदांता ॲल्युमिनियम: या कंपनीचे बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम निर्माण करण्याचे कारखाने आहेत. या कंपनीचा बालको (BALCO) या कंपनीमध्ये ५१% हिस्सा सुद्धा आहे.
  • वेदांता पॉवर: भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची वीजनिर्मिती करणारी कंपनी आहे.
  • वेदांता बेस मेटल: भारतातच नाही तर जगात विविध ठिकाणी या कंपनीचा धातू निर्माण करण्याचा व्यवसाय पसरला आहे. भारतातील तुतीकोरीन, सिल्व्हासा, विशाखापट्टणम या ठिकाणी व्यापार चालतो.
  • वेदांता स्टील अँड फेरस: भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची लोहखनिज उत्खनन करणारी कंपनी आहे. इलेक्ट्रोस्टील या कंपनीमध्ये तिचा ९५ % वाटा आहे.
  • वेदांता लिमिटेड: एलसीडी, डिस्प्ले ग्लास, सेमीकंडक्टर हा कंपनीचा मुख्य व्यवसाय असणार आहे व या कंपनीचा हिंदुस्थान झिंक या आघाडीच्या जस्त बनवणाऱ्या कंपनीमध्ये सर्वात मोठा हिस्सा असेल.

कंपनीचे पुनर्रचनेचे धोरण नेमके कशासाठी?

२०२३ आणि २०२४ या दोन वर्षात कंपनीला मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या कर्जांचे परतफेडीचे धोरण अवलंबयचे आहे. वेदांता ही मोठा कर्ज डोलारा असलेली कंपनी आहे व कंपनी जेव्हा आपल्या कर्जांची परतफेड करेल त्यावेळी आकड्यांमध्ये सुलभता यावी व नेमके कोणत्या कंपनीचे कोणते कर्ज असा अंदाज मिळावा अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा… Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरुन बचत होऊ शकते?

गुंतवणुकीचे योग्य मूल्य या पुनर्रचनेमुळे त्यांना मिळू शकेल असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी बारा ते पंधरा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. थोडक्यात एकाच कंपनीच्या छताखाली अनेक व्यवसाय करण्यापेक्षा या सर्व कंपन्यांचे वेगळे अस्तित्व असावे अशी वेदांता उद्योग समूहाची इच्छा आहे.

वेदांता आणि कर्ज

वेदांता कंपनी ज्या व्यवसायामध्ये आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉन्ग टर्म फायनान्सची गरज असते. ऊर्जानिर्मिती, खनिजांपासून शुद्ध खनिजे मिळवणे, त्यासाठी कारखाने उभारणे, खाणी ताब्यात घेणे यामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागते व देशातील आणि जागतिक बाजारात खनिजांचे दर जसे कमी जास्त होतात तसाच कंपनीच्या नफ्यावर सुद्धा परिणाम होतो.

असे असले तरी कंपनीला आपला घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा वायदा चुकवता येत नाही. जर कंपनीने वेळेवर कर्जफेड केली नाही तर कंपनीची पत ‘क्रेडिट रेटिंग’ ढासळते.

वेदांतावर एकूण कर्ज किती?

२०२४ आणि २०२५ या आगामी दोन वर्षात मिळून अंदाजे तीन अब्ज डॉलर एवढ्या कर्जाची परतफेड कंपनीला करायची आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना कंपनीचा शेअर साडेसहा टक्के वाढून २२२ रुपयांवर स्थिरावला.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vedanta limited has announced its plan for a major demerger mmdc dvr