कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही अनिवार्य सेवानिवृत्ती बचत योजना आहे. त्याचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना करते. २० पेक्षा जास्त कर्मचारी काम करणार्या कोणत्याही कंपनीकडून कर्मचार्यांचा EPF कापला जातो. कंपनी दर महिन्याला कर्मचार्यांच्या मूळ पगारातून १२% कपात करते आणि ते पैसे जमा करते, तसेच ते पैसे कर्मचार्याच्या पीएफ खात्यात जास्तीत जास्त १२% ठेवते. या संपूर्ण पैशावर वार्षिक व्याज (Interest on PF Account) दिले जाते. जर कर्मचार्याला अधिक गुंतवणूक करायची असेल, तर पीएफ खात्यासह तो स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी (VPF) मध्ये देखील पैसे जमा करू शकतो.
VPF वर PF प्रमाणेच व्याज मिळते. ज्याप्रमाणे तुमच्या मूळ पगाराचा काही भाग तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जातो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पगाराचा आणखी काही भाग तुमच्या इच्छेनुसार स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी (VPF) मध्ये जमा करू शकता. कर्मचारी आपला संपूर्ण पगार आणि महागाई भत्ता VPF खात्यात जमा करू शकतो. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे VPF मध्ये काम करणारी व्यक्तीच पैसे जमा करू शकते.
व्हीपीएफचे फायदे
VPF ही एक उत्तम बचत योजना आहे. हा केवळ चांगला परतावा देत नाही तर कर सूटही मिळते. ही ट्रिपल ई श्रेणीची गुंतवणूक योजना आहे. म्हणजे त्यात केलेली गुंतवणूक, एकूण ठेव रक्कम आणि व्याज यावर कर सूट मिळते. VPF ही जोखीम मुक्त गुंतवणूक योजना आहे. त्यातून कधीही पैसे काढता येतात. VPF खाते आधारशी जोडलेले आहे. नोकरी बदलताना व्हीपीएफ खाते हस्तांतरित करणेदेखील खूप सोपे आहे. VPF खात्यात कंपनीचे कोणतेही योगदान नसते.
हेही वाचाः मुकेश अंबानींच्या RILचा रेकॉर्ड ब्रेक नफा, शेअर्स ३१२५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
VPF मध्ये गुंतवणूक कधी करावी?
तुमचे वार्षिक EPF योगदान २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास तुम्ही VPF मध्ये गुंतवणूक सुरू करावी. तुम्ही EPF मध्ये दरमहा १२,५०० रुपये गुंतवल्यास तुमची वार्षिक गुंतवणूक फक्त १.५ लाख रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही VPF मध्ये दरमहा ८,३३३ रुपये अधिक गुंतवू शकता. तुम्हाला वार्षिक २.५ लाख रुपयांवर ८.१% करमुक्त परतावा मिळू शकतो. VPF मध्ये जमा केलेली रक्कम तुम्ही वर्षातून दोनदा बदलू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या एचआर/फायनान्स विभागाशी संपर्क साधावा लागेल.