देवदत्त धनोकर
आर्थिक व्यवस्थापन करताना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला अग्रक्रम दिला जातो. आर्थिक नियोजन करताना गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा प्रभावीपणे वापर करू शकतो. उत्तम वास्तव परतावा, तुलनेने कमी जोखीम, दरमहा गुंतवणूक करण्याची सुविधा असे विविध फायदे असल्यामुळे आबालवृद्धांचा आज म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे ओढा आहे. म्युच्युअल फंडाच्या मदतीने आपण आपली विविध आर्थिक उद्दिष्टे कशा प्रकारे साध्य करू शकतो याची माहिती आजच्या लेखाच्या मदतीने जाणून घेऊया.
सर्वप्रथम आपण म्युच्युअल फंड ही संकल्पना जाणून घेऊया-
म्युच्युअल फंड – म्युच्युअल फंड म्हणजे समान आर्थिक उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूकदारांच्या समूहाने तज्ज्ञांमार्फत केलेली गुंतवणूक. उदा. ज्या गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांतील समभागांमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करायची असते आणि त्यासाठी जोखीम घेण्याचीदेखील तयारी असते, ते गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या डायव्हर्सिफाइड फंडात गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड कंपनीतज्ज्ञ फंड मॅनेजरची नेमणूक करून त्यांच्या सल्ल्याने विविध क्षेत्रांतील समभागांमध्ये गुंतवणूक करते आणि त्यातून मिळणारा लाभ गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात देते.
विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडाचा प्रभावीपणे वापर कशा प्रकारे करता येईल याची माहिती उदाहरणाच्या मदतीने जाणून घेऊया. समीर आणि वर्षा यांची मुलगी तन्वी आज ४ वर्षांची आहे आणि तिच्या उच्च शिक्षणासाठी आजच्या २५ लाखांची आणि लग्नासाठी २० लाखांची तरतूद करायची आहे. महागाईवाढीमुळे भविष्यातील आवश्यक रक्कम आणि त्यासाठी दरमहा किती गुंतवणूक आवश्यक आहे याची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
आर्थिक उद्दिष्ट – आवश्यक रक्कम – उपलब्ध कालावधी – भविष्यातील आवश्यक रक्कम -दरमहा म्युच्युअल फंडात करावयाची गुंतवणूक
तन्वीचे उच्च शिक्षण २५ लाख – १४ वर्ष -६४.४६ लाख -१५,०००
तन्वीचे लग्न २० लाख -१९ वर्ष – १.२२ कोटी – १४,१००
( गृहीतक – म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर परतावा १२ टक्के, महागाईवाढीचा दर – उच्च शिक्षणासाठी ७ टक्के आणि लग्नाकरिता १० टक्के )
जर सध्या दरमहा १५,००० रुपयांची गुंतवणूक शक्य नसेल तर एसआयपी टॉप-अप सुविधेचा वापर करूनदेखील तन्वीच्या उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल.
एसआयपी टॉप-अप सुविधेमध्ये आपण सुरुवातीला एका रकमेने गुंतवणुकीला प्रारंभ करतो आणि दरवर्षी त्यात वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीला देतो. दरवर्षी वाढीव उत्पनासोबतच गुंतवणूक देखील वाढवल्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणुक शक्य होते आणि साहजिकच त्याचा उत्तम फायदा मिळून आपले आर्थिक उद्दिष्ट योग्य वेळेस, योग्य प्रकारे पूर्ण करणे शक्य होते. उदा. समीर आणि वर्षा दरमहा १०,००० रुपयांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून प्रारंभ करू शकतात आणि दरवर्षी गुंतवणुकीत १,००० रुपयांची वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीला देऊ शकतात. तक्त्याच्या मदतीने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.
वर्ष – कुटुंबाचे उत्पन्न -तन्वीच्या शिक्षणासाठी दरमहाची गुंतवणूक
२०२३ – १,००,००० – १०,०००
२०२४ – १,०८,००० – ११,०००
२०२५ – १,१६,००० – १२,०००
२०२६ – १,२५,००० – १३,०००
या प्रकारे दरवर्षी उत्पन्न वाढते तशी गुंतवणूक वाढवल्यास निश्चितच उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट योग्य प्रकारे पूर्ण करता येईल. पाल्याची शिक्षणाशी संबंधित विविध वार्षिक शुल्क भरणे या आर्थिक उद्दिष्टसाठीदेखील म्युच्युअल फंडाचा प्रभावीपणे वापर करणे शक्य आहे. ‘इंटरनॅशनल स्कूल’चे वार्षिक शुल्क १ लाख अथवा त्यापेक्षा जास्त असते साहजिकच एकरकमी शुल्क भरणे कठीण होते. बँकेतील दरमहा आवर्ती ठेव योजनेप्रमाणेच (रिकरिंग डिपॉझिट) म्युच्युअल फंडाच्या अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये एसआयपीदेखील करता येते. उदा. वार्षिक १ लाख शुल्क असेल तर दरमहा ८,००० रुपयांची एसआयपी करून देखील वार्षिक शुल्क भरता येईल.
म्युच्युअल फंड गुंतवणूक बँक रिकरिंग डिपॉझिटपेक्षा अधिक फायदेशीर का?
एसआयपी कायमस्वरूपी सुरू ठेवणे शक्य होते आणि आवश्यकतेनुसार रक्कम काढता येते. त्याचप्रमाणे अतिरिक्त रकमेची गुंतवणूक शक्य आहे. नोकरदार व्यक्ती बोनस रक्कम खात्यात भरू शकतात. व्यावसायिक व्यक्तीदेखील एखाद्या महिन्यात जास्त रक्कम मिळाल्यास ती अतिरिक्त रक्कम भरू शकतात. बँक रिकरिंगमध्ये अतिरिक्त रक्कम भरण्याची सुविधा नसते तसेच मुदतपूर्तीनंतर रक्कम खात्यात जमा होते. जर त्या वेळेस मिळालेल्या रकमेची पुनर्गुंतवणूक न केल्यास तोपर्यंत पुढील कालावधीसाठी केवळ बचत खात्यावरील व्याजदर मिळतो. म्युच्युअल फंडमध्ये मात्र आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करण्याची आणि रक्कम काढून घेण्याची सुविधा मिळते.
शाळेच्या शुल्काबाबरोबरच विम्याचा हप्ता, वार्षिक पर्यटन अशा विविध उद्दिष्टांसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. उदा. रमेश आणि वर्षा यांचा वार्षिक खर्च खालीलप्रमाणे आहे. मे महिन्यात वार्षिक पर्यटन ५०,००० रुपये, जूनमध्ये शाळेचे शुल्क १,२०,००० रुपये आणि आरोग्य विमा ३६,२५४ रुपये, ऑक्टोबर महिन्यात आयुर्विमा ५३,२६२ रुपये आणि वाहन विमा १६,३६७ रुपये याप्रमाणे असतो . यासह दरमहा मासिक खर्च असतो. त्यांना दरमहा पगाराचे उत्पन्न आणि दिवाळी बोनसचे उत्त्पन्न मिळते. जर त्यांनी योग्य नियोजन करून एकरकमी म्युच्युअल फंडाच्या अल्ट्राशॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतवली आणि एसआयपीच्या मदतीने नियमित गुंतवणूक केली तर आवश्यकतेनुसार ते रक्कम काढून घेऊ शकतात आणि त्यांची विविध आर्थिक उद्दिष्टे सहजपणे साध्य करू शकतात .
थोडक्यात महत्त्वाचे – योग्य आर्थिक नियोजन करून केलेली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते.
लेखक अर्थविषयक व्याख्याते आणि प्रशिक्षक.
ईमेल dgdinvestment@gmail.com