सुधाकर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(विवाह समारंभ विमा पॉलिसी) विवाह हा नवदाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग, तर कुटुंबीयांसाठी तो एक आनंद सोहळा असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे खर्च करून हा सोहळा जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी संबंधित प्रयत्नशील असतात. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष विवाह ठरल्यानंतर पुढील ४-६ महिन्यांत विवाह समारंभ ठरविला जातो व त्यानुसार विवाह स्थळ, मंगल कार्यालय, हॉटेल किंवा एखादे विशिष्ट स्थळ (डेस्टिनेशन) ठरविले जाते. विवाह समारंभात प्रामुख्याने सोने, कपडे, मंगल कार्यालय/ हॉटेल, जेवणावळी, मेहंदी, व्हिडीओ शूटिंग यावर खर्च होणार असतो व याचे पूर्वनियोजन आणि तयारी केली जाते. अर्थात त्यासाठी आवश्यक ते पेमेंट करावे लागते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेमुळे हा समारंभ पुढे ढकलावा लागतो किंवा रद्द करावा लागतो. यातून होणारे आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब असते. या समस्येवर योग्य त्या विमा कवचाची ‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’ घेऊन संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. असे असले तरी आजही बऱ्याच जणांना अशी विमा पॉलिसी मिळू शकते याबाबत माहिती दिसून येत नाही.

‘वेडिंग पॉलिसी’मध्ये समावेश असणाऱ्या प्रमुख जोखीम घटना (रिस्क):

० विवाह समारंभ विवाहस्थळाच्या ठिकाणी भूकंप/आग/किंवा तत्सम आपत्तीमुळे नुकसान, चोरी अथवा दरोडा यामुळे सोहळा रद्द अथवा पुढे ढकलला जाणे.

० वधू/वर तसेच त्यांचे माता/पिता, बहीण/भाऊ अशा जवळच्या नातेवाईकाचे निधन अथवा गंभीर दुखापत, तातडीचे हॉस्पिटलायझेशन या कारणांमुळे विवाह रद्द अथवा पुढे ढकलला जाणे

० नवरा मुलगा/मुलगी यांना लग्न समारंभाच्या ठिकाणी – रेल्वेमध्ये झालेला बिघाड, रस्त्यावरील वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्था किंवा तत्सम कारणामुळे किंवा भूकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे उपस्थित राहणे शक्य न होणे.

० विवाहस्थळी आलेल्या आपत्तीमुळे होणारे नुकसान जसे की सजावटीची मोडतोड, दागिन्यांची /कपड्यांची खराबी तसेच पॉलिसीत समाविष्ट असणाऱ्या अन्य वस्तू.

० प्रत्यक्षात झालेला खर्च, दिलेला ॲडव्हान्स, ज्यात – हॉलचे भाडे, केटरिंग, डेकोरेटर, फोटो/व्हिडीओ, करमणूक कार्यक्रम, अन्य विवाहानुषंगिक अन्य खर्च यांचा समावेश होतो. तसेच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत – ज्यानंतर वापरता येत नाही आणि परतही करता येत नाहीत अशा. प्रवासी तिकिटे रद्द केल्याने किंवा करता न आल्याने होणारे नुकसान.

० विवाहस्थळी अपघात होऊन कोणी जखमी /मृत झाल्यास किवा अन्य काही नुकसान झाल्यास तसेच कामगार नुकसानभरपाई, यांसारख्या ‘थर्ड पार्टी क्लेम’चा समावेश असतो.

‘वेडिंग पॉलिसी’मध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी:

० वर अथवा वधू यातील एक जण विवाह समारंभास उपस्थित न राहता पळून गेल्यास अथवा लपून बसल्यास.

० वधू-वर पक्षात मतभेद होऊन ऐन वेळी विवाह रद्द झाल्यास.

० विवाह समारंभ जबरदस्तीने झाल्यास.

० मद्य अथवा अमली पदार्थ सेवन केले असल्याने विवाह फिसकटल्यास.

० समारंभप्रसंगी गुन्हेगारी कृत्य झाल्यास.

० संप अथवा दंगल झाल्याने विवाह समारंभ होऊ शकला नाही

० हलगर्जीपणामुळे नुकसान झाल्यास

० ऐन वेळी विवाहस्थळ उपलब्ध न होणे

० जन्मत:च असलेल्या आजारामुळे पॉलिसीत समाविष्ट असणारी व्यक्ती आजारी पडल्यास

पॉलिसी कव्हरमध्ये पुढील बाबींचा उल्लेख:

० विवाहाचा एकूण खर्च – ज्यामध्ये कार्यालयाचे भाडे, सजावट, व्हिडीओ/फोटो, प्रवास खर्च, निमंत्रण पत्रिका छपाई यांसारख्या आनुषंगिक खर्चाचा तपशील द्यावा लागतो.

० वस्तू/मालमत्ता ज्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. दागिन्यांची किंमत, इतर वस्तू उदाहरणार्थ, लग्नाचा पोशाख/ साड्या/ ड्रेस चांदीच्या वस्तू इत्यादी.

० आपण दिलेल्या खर्चाच्या व मालमत्तेच्या (दागिने /कपडे /भेटवस्तू) तपशिलानुसार विमा कवच ठरविले जाते.

‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’चा कालावधी सर्वसाधारणपणे ७ दिवसांचा असतो आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत पॉलिसी चालू राहते. पॉलिसी कालावधी विमा कंपनीनुसार कमीअधिक असू शकतो. बहुतेक सर्व जनरल इन्शुरन्स अर्थात सामान्य विमा कंपन्या ‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’ देऊ करतात. काही कंपन्या ‘इव्हेंट इन्शुरन्स पॉलिसी’अंतर्गत हे विमा कवच देऊ करतात. सर्वसाधारणपणे विमा रकमेच्या ०.२० टक्के ते ०.४० टक्के इतक्या दराने प्रीमियम आकारणी केली जाते. मात्र प्रीमियमची रक्कम कंपनीनुसार कमीअधिक असू शकते.

पॉलिसी क्लेम कसा करावा?

लग्न समारंभ रद्द झाला अथवा समारंभात दुर्दैवी घटना घडली आणि जर क्लेम करण्याची वेळ आली, तर विमा कंपनीला याबाबत त्वरित माहिती द्यावी. नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून ‘एफआयआर’ची प्रत विमा कंपनीला पाठवावी. प्रत्यक्ष क्लेम दाखल करताना झालेल्या नुकसानीचा तपशील, एफआयआरची प्रत, क्लेम फॉर्मसोबत जोडणे आवश्यक असते. झालेले नुकसान व दाव्याची रक्कम याची माहिती जोडून आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर विमा कंपनी त्याची पडताळणी करून आपल्या पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार क्लेमची रक्कम मंजूर केली जाते. आपला क्लेम पॉलिसी संपल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत करावा लागतो.

थोडक्यात, वेडिंग बेल विमा पॉलिसीमुळे विवाहाच्या वेळच्या परिस्थितीनुसार होणारी नुकसानभरपाई मिळू शकते. मात्र अशी पॉलिसी घेताना संबंधित कंपनीच्या एजंटकडून किंवा वेबसाइटवरून पॉलिसीत समाविष्ट असलेल्या बाबी व क्लेम न मिळणाऱ्या कारणांची पुरेशी माहिती घेऊन आपल्याला आवश्यक असणाऱ्या जोखीम संरक्षणाला साजेशी विमा पॉलिसी घ्यावी.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding bell insurance policy need of the newlyweds couple in life ysh 95
Show comments