म्युच्युअल फंड योजना या भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने ठरवून दिलेल्या कोणत्या तरी एका प्रकारात मोडतात. लार्जकॅप, लार्ज अँड मिडकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, सेक्टोरल फंड, इंडेक्स फंड, हायब्रिड इक्विटी, बॅलन्स ॲडव्हांटेज, मल्टीकॅप हे त्याचे ढोबळमानाने प्रकार पडतात. आता ॲक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी पहिल्यांदा म्युच्युअल फंड योजना बाजारात आल्यावर त्यातील गुंतवणूक नेमकी कशी केली जाते ही प्रक्रिया आपण समजून घ्यायला हवी.
‘न्यू फंड ऑफर’ म्हणजेच नवीन फंड योजना बाजारात आली किंवा सध्या असलेल्या योजनेमध्ये लोकांनी अजून गुंतवणूक केली की निधी व्यवस्थापकाकडे (फंड मॅनेजर) गुंतवणूक करण्यासाठी पैसे उपलब्ध होतात. मग ते पैसे शेअर बाजारात नेमके कोणत्या क्षेत्रात, कोणत्या कंपन्यांमध्ये आणि किती प्रमाणात गुंतवायचे यावर संशोधन, चर्चा आणि निर्णय होतो.
पोर्टफोलिओमध्ये किती शेअर असावेत?

निधी व्यवस्थापकाला पोर्टफोलिओ कमीत कमी कंपन्यांचा व अधिक जोखीम घेणारा असावा असे वाटत असेल तर तो २० ते २५ किंवा ३० ते ३५ कंपन्यांचे समभाग आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतो. जर निधी व्यवस्थापकाला असे वाटले की, पोर्टफोलिओतील एका कंपनीचा हिस्सा हा दोन टक्क्यांपेक्षा अधिक नको तेव्हा आपोआपच पोर्टफोलिओत ५० ते ६० किंवा कधी त्यापेक्षाही जास्त अधिक कंपन्यांचे समभाग असतात.

ॲक्टिव्ह व्यवस्थापन कसे होते?

ॲक्टिव्ह पद्धतीने व्यवस्थापित केलेले फंड बाजारातील गुंतवणुकीचा स्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतले जातात. दोन प्रकारे हे केले जाते, त्यातील पहिला प्रकार म्हणजे आकर्षक मूल्यांकन असणाऱ्या कंपन्या हेरून कमी बाजारभाव असताना त्याची खरेदी करायची आणि जास्त बाजारभाव झाल्यावर त्यातून बाहेर पडायचे. म्हणजेच ते शेअर विकून नफा कमवायचा.

काही निधी व्यवस्थापक दोन ते तीन वर्षांचे व्यवस्थापनाचे धोरण ठरवूनच कंपन्यांची निवड करतात. म्हणजेच अल्पकालीन तेजीच्या लाटेवर स्वार होऊन गुंतवणूकदारांना अतिजोखीम घेऊन पैसा कमावून देण्यापेक्षा दीर्घकाळात उत्तम संपत्ती निर्मिती व्हावी, असे त्यांचे धोरण असते. ॲक्टिव्ह पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या फंडामध्ये कोणत्या क्षेत्राला सुगीचे दिवस येणार आहेत? त्याप्रमाणे संशोधन आणि अभ्यास करून त्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली जाते. या वेळी पोर्टफोलिओमध्ये असलेले शेअर विकणे आणि काही पुन्हा खरेदी करावे लागतात. यावरूनच आपला फंड इतर फंड योजनांपेक्षा परताव्याच्या बाबतीत कसा सरस ठरतो हे कळते.

उदाहरणार्थ, समजा मिडकॅप श्रेणीतील फंडांचा विचार केल्यास ‘सेबी’ने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे, सगळ्यांनाच मिडकॅप श्रेणीतील शेअरमध्ये पैसे गुंतवावे लागतील. मग निफ्टी मिडकॅप निर्देशांक दोन वर्षांत १८ टक्के परतावा देत असेल आणि तुमच्या फंडाने त्यापेक्षा अधिक परतावा दिला म्हणजेच त्याचे निधी व्यवस्थापक यशस्वी ठरले आहेत. कारण त्यांनी निर्देशांकांपेक्षा सरस परतावा देणे यामध्ये अपेक्षित आहे.

‘इंडेक्स फंड’ कशात मोडतात?

इंडेक्स म्हणजे निर्देशांक. निफ्टी आयटी इंडेक्स, निफ्टी मिडकॅप इंडेक्स, निफ्टी स्मॉलकॅप, बँक निफ्टी असे विविध निर्देशांक असतात. आता एखादा निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स फंड असेल तर त्या निधी व्यवस्थापकाला कोणते शेअर घ्यायचे व किती प्रमाणात शेअर घ्यायचे याचे स्वातंत्र्य नसते. निफ्टी मिडकॅप १०० या इंडेक्समध्ये ज्या १०० कंपन्यांचे शेअर ज्या प्रमाणात आहेत त्याच प्रमाणात ते पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजेच निधी व्यवस्थापकाला स्वतःच्या कौशल्याने हव्या त्या कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करून बाहेर पडण्याचे धोरण अवलंबता येत नाही. ॲक्टिव्ह पद्धतीने चालवल्या गेलेल्या फंडाचा गुंतवणूक व्यवस्थापन खर्च हा पॅसिव्ह फंडापेक्षा अर्थातच जास्त असतो.

आजकाल गुंतवणूक करताना एखाद्या निधी व्यवस्थापकाने व्यवस्थापित केलेल्या फंडांचे मागच्या तीन ते पाच वर्षांतील परतावे कसे आहेत याचा विचार करून गुंतवणूक करण्याचा कल दिसतो आहे.