सध्या स्टार्टअप/एमएसएमईचा सगळीकडे बोलबाला आहे सरकारी पातळीवर तसेच बँका बिगर वित्तीय संस्था यासुद्धा स्टार्टअप/एमएसएमईंना प्राधान्याने वित्त पुरवठा करीत आहेत. असं असले तरी सूक्ष्म ,लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना आवश्यक असणारे पुरेसे अर्थ सहाय्य वाजवी दरात व सहजगत्या वेळेवर मिळतेच असे नाही, आणि मिळाले तरी ते उत्पादन करण्यसाठी प्रामुख्याने वापरले जाते. एमएसएमई आपले उत्पादन अथवा सेवा सर्व साधारणपणे मोठ्या उद्योगांना विकत असले तरी ही विक्री रोखीने न होता उधारीवर करावी लागते. ही उधारी साधारणपणे ३० दिवसांपासून ते ९० दिवसांपर्यंत असू शकते. व्यवसायिक गरज म्हणून एमएसएमई उद्योजक रोखीने विक्री करण्याबाबत आग्रही राहू शकत नाहीत, परिणामत: खेळत्या भांडवलात सातत्य ठेवणे उद्योजकास कठीण होऊन जाते. यावर उपाय म्हणून २०१८ सालापासून रिझर्व्ह बँकेने टीआरईडीएस (TReDS) ट्रेड रिसिव्हेबल डिस्काऊंटिंग सिस्टीम ही सुविधा एमएसएमई उद्योजकांसाठी सुरु केली आहे. आज या लेखात या सुविधेची आपण सविस्तर माहिती घेऊ.
टीआरईडीएस (TReDS) म्हणजे काय ?
टीआरईडीएस(TReDS) हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून इथे एमएसएमई उद्योजक आपल्या उधारीवर विकलेल्या मालाची/सेवेची बिले डिसकाउन्ट करून घेऊ शकतात , यामुळे एमएसएमई उद्योजकास माल विकताना देऊ केलेल्या उधारी काळापर्यंत रक्कम मिळण्यासाठी थांबावे लागत नाही व व्यवसायाची खेळत्या भांडवलाची सातत्यता राखता येते व उत्पादन अव्याहतपणे सुरु ठेवता येते. एमएसएमई उद्योजकाने मोठ्या उद्योजकास उधारीवर विकलेल्या मालाची बिले डिसकाउन्ट करून आपले उत्पादन चालू ठेवावे हा प्लॅटफॉर्म मागचा मूळ उद्देश आहे.
आता आपण बिल/ईनव्हॉईस डिसकाउन्टीग म्हणजे काय हे समजून घेऊ. जेव्हा एखादा उत्पादक आपला उत्पादित माल/सेवा दुसऱ्या कंपनीस उधारीवर विकत असतो तेव्हा त्याचे बिल खरेदीदारावर काढीत असतो व सोबत ईनव्हॉईस तसेच डिलिव्हरी चलन/ ट्रान्सपोर्ट रिसीट जोडीत असतो. ईनव्हॉईसमध्ये मालाचा तपशील(जसं कि दर/क्वान्टीटी जीएसटी नंबर ई ) दिलेला असतो. तसेच बिलामध्ये किती दिवसांची उधारी देऊ केलेली आहे याचा उल्लेख असतो. असे बिल विक्रेता आपल्या बँकेकडे देऊन त्याच्या मोबदल्यात बँकेकडून डिसकाउन्ट वजा करून मिळणारी रक्कम लगेचच घेत असतो. देय तारखेला खरेदीदाराकडून बँकेला पेमेंट केले जाते व यातून बँकेने दिलेले अल्प मुदतीचे कर्ज (बिलाच्या तारखे पर्यंतचे ) बँक वसूल करून घेते. थोडक्यात विक्रेता , खरेदीदार व बँक असे तीनजण या व्यवहारात सहभागी असतात. आता टीआरईडीएस (TReDS) मुळे बिल/ईनव्हॉईस डिसकाउन्टीग ही प्रक्रिया कसी सुलभ होते हे पाहू.
टीआरईडीएस(TReDS)ची वैशिष्ट्ये
-एमएसएमई विक्रते, खरेदीदार मोठ्या कंपन्या, बँका या टीआरईडीएस(TReDS) ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संलग्न असतात.
-बिल/इनव्हॉईस डिसकाउन्टीगचा संपूर्ण व्यवहार ऑन लाईन पद्धतीने पूर्ण होतो.
-कुठली कागदपत्रे फिजिकली द्यावी लागत नाहीत.
-बँका बँकातील स्पर्धेमुळे डिसकाउन्ट रेट परवडणारे असतात.
-कार्यप्रणाली बँकेनुसार बदलत नाही (स्टॅंन्डर्ड प्रोसिजर )
-२४ ते ७२ तासात विक्रेत्याच्या रक्कम खात्यात जमा होते.
-या खेळत्या भांडवलास तारण द्यावे लागत नाही.
-बिलाचा उधारी कालावधी (क्रेडीट पिरीयड ) जितका कमी असेल त्या प्रमाणात जास्त वेळा डिसकाउन्टीगचा फायदा घेता येतो यामुळे व्यवसायाचा टर्न ओव्हर वाढविता येतो.
-टीआरईडीएस (TReDS) प्लॅटफॉर्मवर डिसकाउन्टीग नेमके कसे होते हे आता आपण पाहू.
सध्या भारतात रीसिव्हेबल एकस्चेंग ऑफ इंडिया लिमिटेड (RXIL), ट्रेडस लिमिटेड( ईनव्हॉईसमार्ट) व माइंड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (M1xchange) असे तीन आरबीआय मान्यताप्राप्त टीआरईडीएस (TReDS) प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत. एमएसएमई उद्योजकास वरीलपैकी कोणत्याही ही एका ) प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे लागते तसेच ज्या कंपनीला माल विकला आहे ती कंपनी सुद्धा याच प्लॅटफॉर्मवर रजिस्टर असणे आवश्यक असते. अनेक बँका सुद्धा या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर असतात.
समजा अल्फा इंजिनिअर्स नावाची एक मीडियम साईझ उत्पादक कंपनी आहे व ही कंपनी फोर्स मोटर्सला जीप/बस साठी लागणारे इलेक्ट्रिकल मटेरियल नियमित मागणीनुसार पुरवीत आहे. नुकतेच म्हणजे दि.५ /०१/२०२५ रोजी रु.३५ लाख इतक्या किमतीचे इलेक्ट्रिकल मटेरियल कंपनीने फोएस मोटर्सला पुरविले आहे व तसे बिल फोर्स मोटर्सवर काढले आहे त्या सोबत ईनव्हॉईस व फोर्स मोटर्सने मटेरियल स्वीकारले असल्याची पोहोच पावती (डिलिव्हरी चलन) जोडले आहे व बिलाचा क्रेडिट पिरीयड (उधारी कालावधी )४५ दिवस इतका आहे. अल्फा इंजिनिअर्स व फोर्स मोटर्स या दोन्ही कंपन्या रीसिव्हेबल एकस्चेंग ऑफ इंडिया लिमिटेड (RXIL) या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर आहेत.
तर अल्फा इंजिनिअर्सने हे फोर्स मोटर्सवर काढलेले बील रीसिव्हेबल एकस्चेंग ऑफ इंडिया लिमिटेड (RXIL) या प्लॅटफॉर्मवर अपलोड करेल व लगेचच प्लॅटफॉर्मवर रजिस्टर असलेल्या बँकांना हे बिल नजरेस येईल व यातील ज्या बँकांना हे बील डिसकाउन्ट करवयाचे असेल अशा सर्व बँका आपण काय दराने डिसकाउन्ट करू याचा कोट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात. आता अल्फा इंजिनिअर्स कमीतकमी दराने डिसकाउन्ट करण्यास तयार असलेल्या बँकेस आपला होकार कळविते. होकार दिल्यापासून ७२ तासाच्या आत अल्फा इन्जिनिअर्सच्या बँक खात्यात डिसकाउन्ट वजा जाता येणारी रक्कम जमा होते. समजा बँक ऑफ बडोदाने ११% दराने डिसकाउन्टचा कोट दिला व तो कंपनी स्वीकारला असेल तर कंपनीच्या बँक खात्यावर रु. ३४५२८६२इतकी रक्कम बँकेकडून जमा केली जाईल. थोडक्यात डिसकाउन्टपोटी कंपनीने रु.४७१३८ इतकी रक्कम बँकेला मिळाली. देय तारखेआधी एकदोन दिवस बँक याची नोटीस फोर्स मोटर्सला देऊन देय तारखेस बिलाचे पेमेंट करण्यास सांगेल. देय तारखेस फोर्स मोटर्सने रु.३५लाख पेमेंट केल्यावर बँकेचा हा अल्पकालीन कर्जव्यवहार वसूल होईल. डिसकाउन्टचा रेट हा ज्या कंपनीवर बिल काढले आहे त्या कंपनीचे बाजारातील स्थान व आर्थिक सक्षमता यावर अवलंबून असते. तसंच संबंधित बँकेच्या धोरणावर अवलंबून असते. असे असले तरी बँकातील स्पर्धात्मक वातावरणामुळे ग्राहकास कमी दराने डिसकाउन्टचा फायदा मिळू शकतो.
आता आपण टीआरईडीएस(TReDS)चे कोणास व कसा फायदा होतो हे पाहू.
विक्रेत्यास होणारा फायदा :
बिलाच्या तारखे पर्यंत ( जो कालावधी ३० ते ९० दिवस इतका असू शकतो) पैशासाठी थांबावे लागत नाही. डिसकाउन्टची किरकोळ रक्कम वजा जाता बिलाची उर्वरित रक्कम लगेचच मिळत असल्याने खेळत्या भांडवलाची समस्या राहत नाही. सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने कालापव्यय होत नाही व व्यवहार पारदर्शी असतात. स्पर्धात्मक वातावरणामुळे डिसकाउन्ट रेट परवडणारा असतो.
खरेदीदारास होणारा फायदा :
खरेदीदार टीआरईडीएस(TReDS) ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संलग्न असल्याने डिसकाउन्टीगचा व्यवहार सुलभरित्या होतो तसेच देय तारखेला पेमेंट पण सुरळीतपणे होत असल्याने पुढील माल सुद्धा वेळेतच मिळत राहतो व यामुळे उत्पादनात खंड पडत नाही. खरेदीदारास आपला रोखीचा प्रवाह (कॅश फ्लो) मॅनेज करता येतो. होणारा व्यवहार ऑनलाईन व पारदर्शी होत असल्याने वेगळे रेकॉर्ड ठेवावे लागत नाही.
बँका /एनबीएफसीजना होणारा फायदा :
अल्प मुदतीचा व सेल्फ लीक्विडेटींग फायनान्स मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो अशा कर्ज व्यवहारात तुलनेने रिस्क कमी असते व यातून डिसकाउन्टच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न नफा वाढविण्यास उपयोगी पडते. होणाऱ्या व्यवहारांची संख्या जरी जास्त असली तरी ऑपरेशनल कॉस्ट कमी असते. व्यवसाय वाढीस चालना मिळते. यामुळे बोगस तसेच डुप्लीकेट बिले डिसकाउन्ट होऊ शकणार नाहीत.
सध्या सुमारे ४५००० इतक्या एमएसएमईने टीआरईडीएस (TReDS) ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन केले असून नजीकच्या भविष्यात यात आणखी वाढ होईल असी अपेक्षा आहे. थोडक्यात टीआरईडीएस (TReDS) ऑन लाईन प्लॅटफॉर्म ही एमएसएमई साठी एक उपयुक्त सुविधा आहे व तिचा जास्तीत जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा असे म्हणावे वाटते.